Posts

, , ,

सोलापूर जिल्हा पर्यटन

सोलापूर जिल्हा: पंढरीचा पांडुरंग…स्वामी समर्थ…दामाजीपंतांची भूमी…

 

सोलापूर जिल्हा

पंढरीचा पांडुरंग…स्वामी समर्थ…दामाजीपंतांची भूमी… सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सोलापूरला भारताच्या पर्यटन नकाशावर अतिशय महत्वाचे भौगोलिक स्थान लाभले आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे सोलापूर शहर बहुभाषिक आहे. मराठी, हिंदी, तेलगू आणि कानडी या भाषा सोलापूर शहरात बोलल्या जातात. सोलापूर संपूर्ण देशाला रेल्वे मार्गाने आणि रस्त्याने जोडले आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातात. त्यामुळे पर्यटनास आवश्यक वाहतुकींच्या सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत. पंढरीचा पांडुरंग…अक्कलकोटचे स्वामी समर्थ…मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांची भूमींनी संपन्न जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाकडे पाहिले जाते.

पंढरपूर

पंढरपूर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातीलही भाविकांचे जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान आहे. वारकरी संप्रदायाचे हे केंद्र आता परकीस नागरिकांनाही आकर्षित करु लागले आहे. विशेषत: आषाढी आणि कार्तिकी एकादशीला व माघ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते आठ लाखांच्या घरात आहे. पंढरपूर हे सोलापूर शहरापासून केवळ 72 कि.मी. अंतरावर आहे. सोलापूरमधून स्थानिक दळणवळणाच्या सोयी भरपूर उपलब्ध आहेत. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरून पंढरपूर येथे जाण्याची सोय आहे. तसेच मोहोळ येथून एसटीने व खाजगी वाहनाने देखील जाता येते. तसेच मिरजमार्गे थेट रेल्वेनेही पंढरपूर येथे येता येते. पंढरपूर शहरात विविध मठ, धर्मशाळा, भक्तनिवास, खासगी हॉटेल्स आणि शासकीय विश्रामगृह राहण्याकरिता उपलब्ध आहेत.
संपर्क: सार्वजनिक बांधकाम विभाग- रेस्ट हाऊस 02186- 226975, एम.टी.डी.सी.(भक्त निवास) 02186-223312, वेदांत (भक्त निवास) 02186-224478, तनपूरे महाराज मठ 02186-223123 )

अक्कलकोट

सोलापूरपासून 38 किलोमीटर अंतरावर असलेले अक्कलकोट हे देशभरातील स्वामी समर्थ भक्तांचे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 19 व्या शतकातील वटवृक्ष महाराजांची समाधी हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. येथे अन्नछत्र आणि राहण्याचीही व्यवस्था आहे. याशिवाय अक्कलकोट शहरामध्ये असलेले दोन राजवाडे आणि नव्या राजवाड्यामध्ये असलेले हत्यारांचे संग्रहालय हेही पर्यटकांचे आकर्षण आहे. नव्या राजवाड्यातील या संग्रहालयात 17 व्या शतकापासूनची विविध हत्यारे जमा करण्यात आली आहेत. अक्कलकोटला जाण्याकरिता सोलापूर रेल्वे स्थानकांवरून अनेक रेल्वे आणि बससेवा उपलब्ध आहेत. राहण्याकरिता धर्मशाळा, भक्तनिवास आणि खाजगी हॉटेल्स उपलब्ध आहेत.

सिद्धेश्वर मंदिर

महान संत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेले मंदिर हे शहराचे महत्वाचे धार्मिक पर्यटकांचे आकर्षण आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातूनही दर्शनासाठी पर्यटक वर्षभर येत असतात. मंदिराचा तलावाने वेढलेला आणि किल्ल्याची पार्श्वभूमी लाभलेला रम्य परिसर, जवळच असलेली सिद्धरामेश्वरांची समाधी ही धार्मिक पर्यटकांची श्रद्धास्थाने आहेत. जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या सुमारास महिनाभर भरणारी जत्रा हे या पर्यटनस्थळाचे आणखी एक जबरदस्त आकर्षण आहे. जत्रेच्या निमित्ताने निघणारी काठ्यांची नेत्रदिपक मिरवणूक, आतषबाजी, विवाहसोहळा आणि इतर धार्मिेक समारंभ, यामुळे या स्थळाला धार्मिक पर्यटनाचे महत्व प्राप्त झाले आहे. मंदिराभोवतीच्या तलावात जलविहाराची सोय आहे. हे मंदिर शहराच्या मध्यवस्तीत असून रेल्वे स्थानक व बस स्टँड पासून सुमारे एक किमी अंतरावर आहे. शहर बससेवा आणि खाजगी तीन चाकी रिक्षांमधून पर्यटक येथे येऊ शकतात.

किल्ले सोलापूर

सोलापूर शहरात आल्यानंतर काय पहावे हा प्रश्नच पडू नये, अशी वास्तू याठिकाणी दिमाखाने उभी आहे ती म्हणजे किल्ले सोलापूर. ज्या शहरास व किल्ल्यास मध्ययुगीन कालखंडात फार महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. त्या शहरामध्ये इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी आणि हौशी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंदू-मुस्लिम या सत्तांच्या राजकारणात गाजलेला आणि ब्रिटीश काळातही महत्वाचा ठरलेला किल्ले सोलापूर हा भुईकोट पद्धतीचा किल्ला आहे. या किल्ल्याला गावावरुन किल्ले सोलापूर असे नाव पडलेले आहे. किल्यास दुहेरी तटबंदी आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ 320 बाय 176 यार्ड एवढे आहे. किल्ल्याचा बाहेरील तट सर्वात जुना असून तो 14 व्या शतकाच्या सुरुवातीला बांधला गेला आहे. या तटास चारी बाजुंनी चार मोठे बुरुज आणि मध्ये 23 बुरुज आहेत. या तटबंदीमध्येच किल्ल्याचे पहिले आणि मोठे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार गेामुख पद्धतीचे आहे. यास खिळ्यांचा दरवाजा, बाबा कादर दरवाजा, खानी दरवाजा, हत्ती दरवाजा अशी वेगवेगळी नावे आहेत.
शहराच्या मध्यवस्तीत असणारा हा किल्ला बस स्टँड व रेल्वे स्टेशन पासून 1 कि.मी. अंतरावर असून शहर बससेवा आणि खाजगी अटोरिक्षामधून पर्यटकांना येथे जाता येते.

सोलापूर विज्ञान केंद्र

केगांव येथील सोलापूर विद्यापीठाच्या मागे हिरज रोडवरील पाच एकर जागेत मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राच्यावतीने हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. हे केंद्र बाल-गोपाळ व विद्यार्थी वर्गाचे आकर्षण ठरले आहे.
संपूर्ण देशभरात एकूण 27 विज्ञान केंद्रे असून महाराष्ट्रात मुंबई व नागपूर नंतर सोलापुरातील हे तिसरे विज्ञान केंद्र केगांव येथे आहे. मुंबईच्या नेहरू तारांगणाच्या धर्तीवरील हे केंद्र असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाच एकराच्या परिसरातील तीन एकर जागेत ‘सायन्स पार्क’ तर उर्वरित दोन एकरावर इमारतीमध्ये ‘तारांगण’ साकारण्यात आले आहे. विज्ञान केंद्रासमोरील पार्कमध्ये एकूण 36 वैज्ञानिक गोष्टींचा समावेश असून बाल गोपाळांसाठी ती एक वैज्ञानिक मेजवानीच आहे.
सावलीचे घड्याळ, सूर्यप्रकाशाद्वारे वेळेची जाणीव, आवाजाचा प्रतिध्वनी, काष्ठ तरंग, कुजबुजणारी बाग, गुरुत्व खुर्ची, यांत्रिक तापमापक, चंद्राची बाजू ओळखणारे यंत्र, पिंजऱ्यातील पक्षी, खुर्चीत बसून वेगवान गिरकी घ्या, क्रिकेटची किमया, प्रतिध्वनी निर्माण करणारे उपकरण, संगीत लहरी निर्माण करणारे उपकरण, वैज्ञानिक रहस्ये सांगणारी खेळणी या सायन्स पार्कमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय डायनॉसोरच्या आठ विविध जातीची माहिती सांगणारे ‘डायनो कॉर्नर’ हे सुद्धा विज्ञान केंद्रातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. याशिवाय खगोलशास्त्रीय विज्ञानाची रहस्ये सांगणारी फलके आणि प्रतिकृतीही इमारतीमध्ये ‘फन सायन्समध्ये’ ठेवण्यात आल्या आहेत. कसरती दांडा, धूर्नी सुटकेस, सर्व रस्ते रोमकडे, होलोग्राम, उसळणारी तबकडी, अनंत विहीर, स्थिर सावली यांचा समावेश आहे. आकाशातील ग्रह, तारे, पृथ्वीवरील घडामोडी तसेच भूगर्भातील हालचालींची माहिती हसत खेळत विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घेता यावी हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
तारामंडलमधून उतरणारी ध्रुवांची कहाणी, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचे महत्त्व काय? आणि ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय सांगण्याचा प्रयत्न आहे. या केंद्रात विज्ञान प्रसाराचे कार्यक्रम, वैज्ञानिक प्रयोग, आकाश निरीक्षण कार्यक्रम, संगणक जागरुकता कार्यक्रम, विज्ञान प्रश्नमंजुषा, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त विज्ञान चित्रपट, विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या काळात कृतीप्रवण क्षमता कार्यक्रम आदी उपक्रम घेतले जातात. विद्यार्थी व सामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक विचारांची आवक निर्माण होण्यासाठी विज्ञान केंद्र उपयुक्त ठरले आहे.
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात संशोधनाची वृत्ती जोपासावी या उद्देशाने हे विज्ञान केंद्र साकारण्यात आले आहे. या विज्ञान केंद्रापर्यत जाण्यासाठी तीन चाकी रिक्षा, खाजगी वाहने आणि बस सेवा उपलब्ध आहेत.
संपर्क- 0217 – 2351493.

सिद्धेश्वर वनविहार प्रकल्प

सोलापूर-विजापूर महामार्गावर सोलापूर शहरापासून 5 कि. मी. अंतरावर वन विभागाच्यावतीने 125 हेक्टर परिसरात सिद्धेश्वर वनविहार प्रकल्प उभारण्यात आला आहे. जंगली झाडांबरोबरच खाद्य फळांच्या झाडांची या वनविहारात लागवड करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या नक्षत्रांचे वृक्ष येथे लावण्यात आले असून त्यास नक्षत्रवन असे नाव दिले आहे. श्री गणेशाला 33 प्रकारची फुले व वनस्पती आवडतात. त्‍याची लागवड स्वतंत्ररित्या गणेशवनात करण्यात आली आहे. या वनविहारात निसर्ग निर्वाचन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये विविध औषधी वनस्पती, जगली प्राणी, पक्षी, फुले तसेच विविध प्रकारचे लाकूड, वेगवेगळ्या प्रकारची मृदा याची माहिती देणारे सचित्र फलक लावण्यात आले आहेत. एक दिवसाच्या निसर्गाच्या सहलीचा आनंद या वनविहारात लुटता येईल.
नान्नज :
सोलापूर पासून 15 कि.मी. अंतरावर उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे जगप्रसिद्ध माळढोक पक्षी अभयारण्य आहे. नान्नज येथील क्षेत्र माळढोक पक्ष्यांकरिता पर्यावरण विभागाकडून विशेषरित्या आरक्षित करण्यात आले आहे. माळढोक बरोबरच हरिण, काळवीट, कोल्हा आदी प्राणी येथे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.

करमाळा

सोलापूरपासून 120 कि. मी. अंतरावर करमाळा येथे अष्टकोनी विहिर व कमलादेवीचे हेमाडपंथी मंदिर व किल्ला ही प्रेक्षणीय स्थळे आहे. पंढरपूर-अकलूज रस्त्यावर वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मदिरातील नटेश्वराची मूर्ती कोरीव व सुबक आहे.

कुडल संगम

सोलापूरपासून 40 कि.मी. विजापूर रोडवर दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले हत्तरसंग कुडल संगम हे तीर्थक्षेत्र नव्याने उदयास आले आहे. 11 व्या शतकातील उत्कृष्ट कोरीव काम केलेले हरिहरेश्वर आणि संगमेश्वर मंदिर ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळी येथे जत्रा भरते. यावेळी लाखो भाविक जमा होतात. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाबरोबर सूर्यकिरणे सात दरवाजे ओलांडून गर्भगृहातील शिवपिंडीवर पडतात. हे एक आश्चर्यच मानावे लागेल. याठिकाणी उत्खननात मिळालेले शिवलिंग हेही या देवस्थानाचे खास वैशिष्टय आहे. या एकाच चार फूटी शिवलिंगावर शिवाची 359 मुखे आणि उभ्या किंवा बैठ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवलिंगाला वर्षातून एकदाच अभिषेक केला की वर्षभराचे अभिषेक झाले अशी त्यामागची श्रद्धा आहे. जगामध्ये कुठेही असे शिल्प नाही. तसेच येथील संगमेश्वर मंदिरात ज्ञात आद्य मराठी आलेख आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे हे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी जलविहाराचीही सोय आहे. या ठिकाणी पर्यटकांना खाजगी वाहने, एसटीने जाता येते.

मंगळवेढा

इ.स. 1460 च्या दुष्काळामध्ये सरकारी धान्याची कोठारे उघडून गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करत लोकांचे प्राण वाचविणारे दामाजीपंत, संत कान्होपात्रा हे मंगळवेढ्याचे. मंगळवेढा येथे श्री संत दामाजीपंताचे सुंदर मंदिर आहे.

बार्शी

येथे भगवंतांचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. बार्शीच्या परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची मंदिरे आहेत. सोलापूरपासून बार्शीचे अंतर 65 किलोमीटर आहे.