पर्यटन उपक्रम
महाराष्ट्र राज्य हे निसर्ग समृद्ध राज्य असून येथे पर्यटनाला वाव आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन वृद्धीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी होत आहे. 2017 हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र इयर म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील पर्यटक, गुंतवणूकदार, टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स प्रतिनिधींच्या सहभागामुळे पर्यटनविषयक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
डेक्कन ओडिसी लक्झरी ट्रेन
भारतीय रेल्वे, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात डेक्कन ओडिसी लक्झरी ट्रेन 2004 पासून चालविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आनंददायी ओळख करून देणे तसेच महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची, सांस्कृतिक कला – वैभव व खाद्य संस्कृतींची ओळख जगाला व्हावी, याकरिता गाडीमध्ये महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंतरिक सुविधा आणि सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या गाडीमध्ये केबल टीव्ही, संगणक, इंटरनेट सुविधा, लायब्ररी, चॅनल म्युझिक, इंटरकॉम, सेल फोन, वाय-फाय इत्यादी आंतरराष्ट्रीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
राहण्याच्या रूम्सच्या देखील उत्तम सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहे. डेक्कन ओडिसी सहलींचा हंगाम हा प्रामुख्याने सप्टेंबर ते मे या कालावधीत असतो. या कालावधीत एक आठवड्याच्या सुमारे 35 सहली आयोजित करण्यात येतात.
विविध महोत्सव
महामंडळामार्फत राज्यातील वारसास्थळे तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येतात. आपल्या उच्च सांस्कृतिक परंपरा व अभिजात कलांचे दर्शन, महाराष्ट्रात येणारे देशी-विदेशी पर्यटक व कलाप्रेमींना घडावे तसेच या ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या विकास व प्रसार व्हावा हा यामागील उद्देश आहे.
औरंगाबाद येथील वेरुळ-औरंगाबाद महोत्सव, नागपूर येथील ‘कालिदास महोत्सव’ व मुंबई जवळील ’एलिफंटा महोत्सव’, तसेच दक्षिण मुंबईतील ’बाणगंगा महोत्सव’, पुणे महोत्सव आदी महोत्सव प्रतिवर्षी आयोजित केले जातात.
शनिवारवाडा ध्वनिप्रकाश कार्यक्रम
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात जानेवारी, 2001 पासून महाराष्ट्रातील पहिला कायमस्वरूपी ध्वनिप्रकाश कार्यक्रम शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूत सुरू करण्यात आला आहे. त्यात पेशवेकालीन इतिहासावर आधारित मराठी व इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक तासाचा कार्यक्रम सादर करण्यात येतो.
सारंगखेडा चेतक महोत्सव
राजस्थान येथे पुष्कर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व या महोत्सवाचे उंट हे प्रमुख आकर्षण असून मोठ्यासंख्येने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक या महोत्सवास उपस्थित राहतात. त्याच धर्तीवर अश्व हे प्रामुख्याने आकर्षण असलेल्या सारंगखेडा येथे चेतक महोत्सवाचे आयोजन स्थानिक जिल्हाधिकारी व महामंडळातर्फे करण्यात येते. स्थानिक लोककला, हस्तकला, खाद्यसंसकृती, वारसा जपणाऱ्या चेतक महोत्सवात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पर्यटक हजेरी लावतील. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास होण्यास मदत होईल.
अंजिठा – वेरुळ विकास प्रकल्प
अजंठा-वेरुळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळे म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे. या लेण्याचे संवर्धन व पर्यटनदृष्ट्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलण्यात येत आहे.
पर्यटक निवासस्थाने
बोधलकसा पर्यटक निवास बोधलकसा हे, ता.तिरोडा, जि.वर्धा येथे आहे. महामंडळाने पर्यटकांच्या सोयीकरिता 27 कक्ष उपलब्ध करून दिले आहेत.
वर्धा
वर्धा येथे महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. हे आश्रम पर्यटकांचे आवडीचे पर्यटन स्थळ आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीकरिता 12 कक्ष उपलब्ध करून दिले आहेत.
मोझरी पॉइंट
पर्यटक निवास मोझरी पॉइंट हे ता.चिखलदरा, जि.अमरावती येथे आहे. या निवासामध्ये एक सभागृह आणि 15 कक्ष पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग कोस्टल सर्किट
महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग कोस्टल सर्किटची निवड केली असून त्याकरिता निधीही दिला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मिठबाव, तारकर्ली, तोंडीवली, निवती किल्ला, शिरोडा, सागरेश्वर व मोचेमाड अशा विविध ठिकाणी पर्यटकांकरिता पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
समुद्रविश्व प्रकल्प
महामंडळाने तोंडवली-वायंगणी, जि.सिंधुदुर्ग येथे पर्यटकांसाठी अत्याधुनिक समुद्रविश्व प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रविश्व प्रकल्पामुळे देशी व विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने प्रकल्पाला भेट देतील व त्यामुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
हाऊसबोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाड्यांमध्ये पर्यटकांना भ्रमंती करता यावी यासाठी हाऊसबोट प्रकल्प राबवण्यात येत असून याअंतर्गत चार हाऊसबोट तारकर्ली येथे उपलब्ध आहेत. हाऊसबोटीसाठी पर्यटकांचा प्रतिसाद वाढला असल्याने महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट व दाभोळ या खाडी क्षेत्रात हाऊसबोट प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. खाडी क्षेत्रात प्रत्येकी दोन असे एकूण चार हाऊसबोट बांधणीचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी दोन हाऊसबोटचा ताबा महामंडळाने घेतला आहे.
स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग केंद्र
महामंडळाने तारकर्ली, ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. हे प्रशिक्षण केंद्र इमारतीमध्ये 11 निवासकक्ष, एक जलतरण तलाव, दोन क्लास रुम, एक अद्ययावत उपहारगृह या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षण केंद्रासाठी तीन हायस्पीड बोट व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग साहित्य पर्यटकांसाठी उपलब्ध केले आहेत. हे प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय पॅडी (प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स) या संस्थेशी संलग्न असून प्रशिक्षित झालेल्या व्यक्तींना तसे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. प्रशिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात अनुभवी इन्स्ट्रक्टर, डाइव्हमास्टर, बोटमन इ.ची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण केंद्र ऑक्टोबर, 2015 पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रास पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ॲम्फिबियन एअरक्राफ्ट
राज्यामध्ये जलविमान वाहतूक अंतर्गत ॲम्फिबियन एअरक्राफ्ट सेवा खाजगी उद्योजकांच्या सहकार्याने सुरू करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सदरची सेवा जुहू चौपाटी ते गिरगाव चौपाटी अशी सुरू करण्यात येणार आहे.
संदर्भ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
स्रोत – महान्युज
k here to add your own text