उपवासाचे बुंदी लाडू

साहित्य:-

साबुदाणा पीठ 1 वाटी
शिंगाडयाचे पीठ अर्धी वाटी
मीठ चिमूटभर
वेलची पावडर अर्धा चमचा
बदाम पिस्ता काप पाव वाटी
मनूका 3 चमचे
साखर 2 वाटी
तूप पाव वाटी
लिंबू 1 नग
दूध अर्धी वाटी

कृती:-

सर्व प्रथम साखरेचा एक तारी पाक करुन ठेवा. साबुदाणा व शिंगाडयाचे पीठ एकत्र करुन त्यात चिमूटभर मीठ व योग्य प्रमाणात पाणी घालून दोस्याच्या पीठाप्रमाणे भिजवून घ्या. तूप गरम करुन त्यामध्ये बुंदीच्या झा-याने या पीठाची बुंदी पाडा. नंतर ही बुंदी साखरेच्या पाकात घालून त्यामध्ये बदाम-पिस्ताचे काप, मनूका, वेलची पावडर घालून ढवळून घ्या. थोडया वेळाने बुंदी बाहेर काढून लाडू वळा.

उपवासाचे फ्रुट चाट

साहित्य:-

मोठी रताळी 2 नग
संत्र,अननस,द्राक्ष,पपई 1 वाटी
मनूका अर्धी वाटी
सैंधव मीठ अर्धा चमचा
हिरवी मिरची, जीरे, कोथिंबीरची चटणी अर्धा चमचा
बटाट्याचा किस अर्धी वाटी
भाजलेले दाणे 2 चमचे

कृती:-

रताळे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करुन ते आरारोट मध्ये बुडवून मंद आचेवर डीप फ्राय करा. त्यावर बारीक कापलेली फळे ठेवून हिरव्या मिरचीची चटणी, दाण्याचा कुट, लिंबाचा रस, मनूका, सैंधव मीठ मिसळून तयार केलेली चटणी घाला वरुन बटाट्याच्या सळ्या घालून सव्र्ह करा.

उपवासाचे आप्पे

साहित्य:-

किसलेला बटाटा 1 वाटी
साबुदाणा दीड वाटी
दाण्याचा कुट अर्धी वाटी
बारीक चिरलेला हि. मिरची, कोथिंबीर 4 चमचे
लिंबाचा रस 1 चमचा
फ्रुट साॅल्ट 1 चमचा

कृती:-

किसलेल्या बटाटयामधे साबुदाणा, दाण्याचा कुट व इतर जिन्नस एकत्र घालून सर्वात शेवटी फ्रुट साॅल्ट घालावेव लगेचच त्याचे आप्पे बनवावे. दाण्याच्या चटणी बरोबर खायला दयावे.

 इंदोरी उपवासी चाट

साहित्य:-

भिजलेला साबुदाणा 1 वाटी
शिंगाडयाचे पीठ 1 वाटी
किसलेला बटाटा 1 नग
दाण्याचा कुट अर्धी वाटी
हिरवी मिरची 1 चमचा
कोथिंबीर –
भाजलेलं जिरे 1 चमचा
मीठ, लिंबू, साखर चवीनुसार
ओलं खोबरं 2 चमचे

कृती:-

शिंगाडयाचे पीठ भिजवून त्यात चवीनुसार मीठ, तिखट घालून त्याची शेव पाडून घ्यावी. नंतर किसलेला बटाटा तळून घ्यावा. एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यावी चाळणी किंवा कापड बांधा. त्यात साबुदाणा टाकून वर झाकण ठेवा. सव्र्ह करतेवेळी त्यातला गरम साबुदाणा, दाण्याचा कुट, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर एकत्र करा. वरुन शेव, बटाटयाचा कीस व ओलं खोबरं पसरवून खायला द्या.

व-याचे गोड धिरडे

साहित्य:-

शिजलेली भगर 1 वाटी
पिकलेली केळी 2 नग
गूळ चवीनुसार
वेलची पावडर –
भरडलेले दाणे पाव वाटी
घट्ट नारळाचे दूध अर्धी वाटी
साबुदाणा पीठ अर्धी वाटी

कृती:-

भगर रवीनी घोटून त्यात केळी कुस्करुन घ्या व चवीनुसार गूळ मिसळवा. नंतर यात मिश्रण घट्ट होण्याकरीता साबुदाण्याचे पीठ मिसळवा. एक चिमटी मीठ, वेलची पावडर, दाण्याचे कुट घालून याच्या छोटया छोटया टिकीया बनवा व मंद आचेवर तूूपावर शेकून नारळाच्या दूधाबरोबर खायला द्या.

उपासाचे मुटकुळे

साहित्य:-

साबुदाणा पीठ 1 वाटी
व-याच्या तांदूळाचे पीठ 1 वाटी
शिंगाडयाचे पीठ 1 वाटी
मीठ, लिंबू साखर चवीनुसार
हिरवी मिरची –
दाण्याचा कुट पाव वाटी
जिरे 1 चमचा
उकडलेला बटाटा 1 नग

कृती:-

सर्व प्रथम 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी व-याच्या तांदूळाचे पीठ व 1 वाटी शिंगाडयाचे एकत्र करुन त्यात चवीनुसार मीठ घालून त्याच्या भाक-या बनवून घ्या. नंतर त्या भाक-या बारीक करुन त्यात बटाटा मिसळा. नंतर मिश्रणाचे मुटकुळे बनवून एक वाफ आणून घ्या. त्यावर जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर याची फोडणी घालून बोराच्या भाजी बरोबर खायला द्या.

बोराची भाजी

साहित्य:-

सुके बोर 1 वाटी
गूळ अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
भाजलेले दाणे अर्धी वाटी
जिरे 1 चमचा
हिरवी मिरची 1 चमचा
कोथिंबीर –

कृती:-

सर्व प्रथम 1 वाटी प्रथम बोर 4 तास पाण्यात भिजवून उकडून घ्यावे. नंतर त्यातील बीया काढून घ्याव्यात. त्यानंतर गूळ, मीठ, अर्धी वाटी दाणे मिसळवून वरुन जिरे व मिरचीची फोडणी द्या. वरुन थोडी कोथिंबीर घालून मुटकुळयांबरोबर खायला द्या.

 शिंगाड्याचे उपवासाचे थालीपीठ

साहित्य:-

शिंगाड्याचे पीठ 2 वाट्या
साबुदाण्याचे पीठ अर्धी वाटी
हिरवी मिरची, कोथिंबीर चवीनुसार
जीरे 1 चमचा
दही अर्धी वाटी
मीठ चवीनुसार

कृती:-

सगळे जिन्नस एकत्र करुन त्यात दही मिसळवावे. थोडे पाण्या घालून गोळा मळून घ्यावे. पाॅस्टीकच्या कागदावर ठेऊन त्याचे पोळी लाटावी. नंतर तव्यावर नेहमीच्या थालीपीठासारखे तेल घालून भाजावे.