ऊर्जा….
दारावरून जाणारी दिंडी पाहिली, की त्यात जाऊन सामील होऊ की नको, या द्विधा मन:स्थितीत असलेली संत जनाबाई म्हणते,
” पंढरीला जाया अवंदा, नव्हतं माझं मन
पर सावल्या इट्टलानं, चिट्या पाठवल्या दोन.
पंढरीला जाया मला सोबत नाही कुनी
कश्शाला कोन हवं, पुढं इट्टल मागं जनी…|| “
विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेली जनी, तिच्या या ध्येयातूनच ऊर्जा मिळवते…
अशी ही ऊर्जा म्हणजे चैतन्य आणि उत्तेजन देणारे, कार्यरत करणारे प्रेरक! मुख्यतः ही बाह्यऊर्जा आणि अंत:स्थ अशा दोन प्रकारची ऊर्जा असावी. बाह्यऊर्जेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सूर्यनारायण! हा संपूर्ण विश्वाला, अखंडपणे, अव्याहतपणे ऊर्जा देणारा – कधीही न संपणारा स्त्रोतच! (Solar energy) जपानसारख्या देशात याचा सर्वोत्तम उपयोग केला जातो.
अंत:स्थ ऊर्जा मात्र शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक असावी. शारीरिक ऊर्जा – अन्न, व्यायाम, आणि कामातून मिळते. तर मानसिक ऊर्जा ही गंध, सूर, चित्र, काव्य, प्रेम, विनोद, आनंद, निसर्ग, प्राणी, व्यक्ती अशा अनेक गोष्टींत मिळते.
माझ्या भाग्यमुळे मला कविवर्य कुसुमाग्रज, इंदिरा संत, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, अटलजी, माझे आईवडील, गुरू, आप्तेष्ट आणि भरभरून दाद देणारे रसिक यांच्या प्रोत्साहनातून अखंड ऊर्जा मिळतेय!
साहित्य, शास्त्र, समाजकारण, राजकारण, संगीत, चित्रकला, क्रीडा, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला ऊर्जेचे ‘अणुबॉम्बच’ जणू पहायला मिळतात! मेरी कोमसारख्या अनेक व्यक्ती आपल्या देशाला, परिवाराला, आणि स्वतःलाही उन्नत करतात. या चैतन्याचे तुषार आपल्यावर पडल्यास, आपणही ध्येयाने झपाटतो आणि ही ऊर्जास्थाने आपल्याला प्रेरित करतात. एकमेकांशी प्रेमाने, सौजन्याने वागल्याने ऊर्जा मिळते असा अनुभव येतो. ऊर्जेचे दुसरे नाव म्हणजे स्फूर्ती! संकटकाळी नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारांचे इंजेक्शन स्वतःच टोचून घेतल्यास, यश मिळण्याची शक्यता वाढते आणि यशानेच यश वाढते.
मी गायलेल्या ‘निःशंक हो निर्भयहो मना रे..’ या श्री अक्कलकोट स्वामींच्या तारकमंत्राने तर कित्येक पेशन्ट्सच्या वंचना, त्रास जाणवत नाहीत किंवा दूर होतात असे कळते. वारकऱ्यांना, ऊन, वारा, पावसात, तहानभूक विसरून अनवाणी चालण्याची ओढ (अध्यात्मिक ऊर्जा) तो परमेश्वरच देत असेल ना?
पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर.
नि:शंक हो, निर्भय हो मना रे…, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर