वारकरी – दिंडी


महाराष्ट्राचं लाडक दैवत पंढरपूरचा विठोबा. आषाढि-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोहचण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्या निघतात. त्या त्या संतांची प्रतीके म्हणून चांदीच्या पादुका पालखित घालून टाळ मृदंगाच्या गजरात गावोगावचे वारकरी त्यात सहभागी होतात.पालखी बरोबरच्या एका अधिकारी, संत व्यक्‍तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा-राहणारा लोकांचा समूह म्हणजे दिंडी. ठराविक वेळेला देवाच्या भेटीला जाणे म्हणजे वारी.वारी करणारा वारकरी.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात तेराव्या शतकापासून दिंडी रूढ आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या व संतांच्या पालखीपुढे वारकरी भजने म्हणत व नाचत जातात. वीणा व मृदंग वाजवणारे मध्यभागी असतात व त्यांच्याभोवती वारकरी हरिनामाचा गजर करीत बेहोश होऊन टाळ वाजवत गोलाकार फेर धरतात. पालखी पुढे निघते, तेव्हा दिंडीतील वारकरी दोन रांगा करून समोरासमोर उभे राहतात व मृदंग-वीणा वाजविणारे रांगांच्या मध्यभागी पुढच्या बाजूला असतात. सर्वजण मृदंगाच्या साथीवर टाळ वाजवत व भजने म्हणत मागेपुढे लयबद्ध पावले टाकीत, धीम्या गतीने पुढे सरकत असतात. भजनात संतांचे अभंग व गौळणी गायिल्या जातात. मधूनमधून विठ्ठलनामाचा गजर होतो. वारकरी स्त्रियांचीही दिंडी असते.

वारी एकसुरी नसते. त्यात नाट्य, गोलरिंगण, उभं रिंगण हि खास आकर्षण असतात.

संत ज्ञानेश्वर – आळंदी, निवृत्तीनाथ – त्र्यंबकेश्वर, सोपानदेव – सासवड, मुक्ताबाई – एदलाबाद, विसोबा खेचर – ओंढ्या नागनाथ, गोरा कुंभार – तेर, चांगदेव-पुणतांबे, भानुदास आणि एकनाथ – पैठण, तुकाराम महाराज-देहू, जगन्मित्र नागा-परळी वैजनाथ, राघव चैतन्य-आळंद गुंजौटी, केशव चैतन्य-ओतूर, बोधलेबुवा-धामगाव, मुकुंदराय-आंबेजोगाई, जोगा परमानंद-बार्शी, कान्होराज महाराज-केंदूर, संताजी जगनाडे-सुंदुंबरे या पालख्यांचा प्रामुख्याने समावेश असतो या सार्‍या पालख्या वाखरी जवळ एकत्र येतात, विठूरायाच्या नामाने अवघे आसमंत भक्‍तिमय होऊन जाते. टाळमृदंगाच्या गजराने माणसाच्या मनात भक्‍ती जागृत होते. हा गजर कानापासून मनापर्यंत, भूमीला स्पर्शून आकाशात जातो. वार्‍याच्या लहरीत मिसळतो. सूर्य किरणांच्या वर्षावात एकरुप होतो आणि विठ्‍ठलाच्या चरणाला येऊन बिलगतो. आपणही कळत-नकळत या विलक्षण, दिव्य अनुभवांचा अंश बनतो.

स्वत:चे अस्तित्व विसरायला लावणारी ही वारी स्वावलंबन शिकवते, समाजमनात मिसळायला शिकवते, वृत्तीतील ताठरपणा; अहंकार बाजूला सारुन अंतर्मुख व्हायला शिकवते, सर्वांशी एकरुप होऊन स्वत:कडे विनम्रता घ्यायला शिकवते, जीवनातील खरा प्रामाणिकपणा शिकवते. समाजात हरवलेली अनेक जीवनमूल्ये मिळवता येतात.पालखी सोहळा महाराष्‍ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळून सागर रूप होते विठ्ठलभक्‍तीची ही गंगा विठ्ठलाशी एकरुप होते.

पालखी राष्‍ट्रीय एकात्मतेची गंगोत्री आहे. खांद्यावरील पताका एकात्मतेचे प्रतिक आहे. संत समाजशिक्षण होते म्हणून त्यांनी पालखीसारख्या माध्यमांतून सामाजिक समतेची परंपरा प्रस्थापित केली. हा अध्यात्मिक उन्नतीचा प्रवाह अविवेकाकडून विवेकाकडे, अविचारांकडून विचारांकडे, अद्न्यानाकडून द्न्यानाकडे, सूक्ष्मातून व्यापकत्वाकडे ऊर्ध्व दिशेने झेपावतो आहे. हेच वारीसोहळ्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे.