वसंत गोवारीकर


वसंत रणछोड गोवारीकर (२५ मार्च, इ.स. १९३३; पुणे, ब्रिटिश भारत – २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे.

अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे. वयाच्या अवघ्या ११ वर्षी यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत शोधली होती. त्यांच्या या शोधासाठी त्याकाळात त्यांचे भरभरुन कौतुकही झाले होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. बीएससी आणि मग एमएससी केल्यावर गोवारीकर यांनी इंग्लंडमध्ये प्रवाही पदार्थ या विषयावर पीएचडी केली. वयाच्या २८ व्या वर्षी “ऑक्सफर्ड विद्यापीठा”मध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेत “रिसर्च सेंटर”मध्ये ते क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी गेले होते. मात्र अमेरिकेत संशोधनाच्या कार्यासाठी न थांबता गोवारीकर पुन्हा भारतात परतले.

१९६५ साली “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च” या संस्थेमध्ये डॉ.वसंत गोवारीकर यांनी उपग्रह तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली “एसएलव्ही – ३” हा उपग्रह वाहक तयार झाला व त्यांच्या कामासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुकही केले होते. “पॉलिमर केमिस्ट्री”मध्ये त्यांनी केलेले संशोधन सर्वत्र गाजले. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ.वसंत गोवारीकरांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही तयार केले. त्यानंतर या मॉडेलला “गोवारीकर मॉडेल” म्हणून नाव देण्यात आले.

१९६५ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये वसंतराव व विक्रम साराभाई उपग्रह तंत्रज्ञानावर काम करू लागले. त्याचे फलित म्हणजे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आज ते अव्वल समजले जातात. ते नंतर त्रिवेंद्रमला थुंबा येथील अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. या सर्व श्रमाचे सार्थक म्हणजे १७ एप्रिल, १९८३ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली एस.एल.व्ही.-३ हा उपग्रह वाहक कार्यान्वित झाला व स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची पाठ थोपटली.

काही काळ ते विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. १९९१ ते १९९३ या दरम्यान ते पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञांना उद्योजक बनवण्याच्या योजना, परदेशस्थ भारतीय संशेधकांना परत आणणे, सरकारचे विज्ञान धोरण ठरविणे व त्याचा प्रसार करणे ही कामे प्रामुख्याने झाली. पुढे काही वर्षे ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, तसेच खतांच्या विश्र्वकोश प्रकल्पाचे कामही त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे . १९९४-२००० या दरम्यान गोवारीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले.