वसंतगड

पुणे बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यामधून जातो. या महामार्गावर सातारा उंब्रज कर्हाड अशी गावे आहेत. यात उंब्रज आणि कर्हाड यांच्या मधे पश्चिमेकडे इतिहास प्रसिद्ध तळबीड हे गाव आहे. तळबीड गाव वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कर्हाडवरुन एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगडइतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा एक रांगडा किल्ला होय.तळबीड गावाने मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाला दोन अमूल्य रत्ने अर्पण केली. ते म्हणजे युद्धशास्त्रनिपुण सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई होय

कसे जाल?

* वसंतगडास भेट देण्यासाठी आपण आधी कराड गाठावे. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तळबीड गावात दाखल व्हायचं. येथे समोरच आपणास सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लागतात.
* दुसरा रस्ता सुपने या गावातून ही आहे.
* तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे.कोकणात जाताना खिडींत असणारा हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग होता.

इतिहास

वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. वसंतगडाजवळच मसूरला सुलतानजी जगदाळे राहत होता. अफजलखान चालून आला त्यावेळी वतनाच्या लोभाने जगदाळे फितुर झाला. वसंतगड घेतल्यावर मराठ्यांनी अकस्मात छापा घालून जगदाळेस पकडून गडावर आणले व फितुरीबद्दल त्याचा गडावर शिरच्छेद केला. शिवरायांच्या कठोर न्याय वसंतगडाने याची देहा याची डोळा अनुभवला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छ. राजाराम महाराज वसंतगडावर काही दिवस मुक्कामास होते.

इ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे

गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदीर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदीर परिसर पाहून डाव्या बाजून मंदीराच्या बाहेरील वाटेने आपण पुढे जायचं. वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाधी व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.