वास्तू शांत

वास्तु प्राप्त झाल्यावर त्यामधे सुख, शांती नांदावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपले प्रवेशद्वार कायम सज्ज असावे, यासाठी आपल्या घराचा दरवाजा मंगलचिन्हांनी सजवावा. कलश, कमळ, ध्वज, चक्र, छत्र, श्रीफळ, पाने, वेली यांचा वापर करून आपण आपल्या वास्तूचे मुख्यद्वार सुशोभित करू शकतो.

वास्तु हे नाव कसे पडले? ते पाहू.

फ़ार वर्षापूर्वी शिवशंकर यांच्या जीवनक्रमातील काही घटना त्यातील एक घटना. त्या वेळी अंधकासूर नावाच्या राक्षसाचा भगवान शंकरांनी विनाश केला. तो अंधकासुर इतका माजलेला होता, की त्याने सर्वांचे जगणे कठीण केले होते. सर्वसामान्य परिस्थितीत भोळे शिवशंकर कोणाच्या वाटेला जात नाही. पण का जात नाही? खर म्हणजे ती संहाराची देवता आहे. शंकरांची अनेक रूपे त्यातील रुद्र नावाचे रूप उग्र आहे पण सगुणाची इच्छा झाली की ध्यान लावणे व रामनाम घेणे व सोऽऽहं भावामध्ये राहणे हे शिवांच ब्रीद. पण अंधकासुर इतका माजला होता की भगवंताला उग्र रूप धारण करावे लागले. भगवंताला क्रोध आला त्यांच तुंबळयुद्ध चालू होत.

त्यावेळी शंकरांच्या भालप्रदेशात(कपाळावर) घाम आला. त्यांच्या नेत्रातून एकदा भूमीवर अश्रु पडले त्या वेळी त्या अश्रुंचे रुद्राक्ष झाले. जे आज आपण वापरतो १ मुखी ते १५ मुखी म्हणजे परमेश्वराच्या अश्रुंपासुन रुद्राक्ष होउ शकतात. तर घामापासुनही काही उत्पन्न होउ शकते. आणी युद्ध चालु असताना एक घर्मबिंदू(घामाचा थेंब) भूमीवर पडला. त्यातून भूत, पिशाच्च वाटावे अशी एक उग्र मूर्ती निर्माण झाली. ती उग्रमूर्ती लगेच मोठी होवू लागली. त्यावेळी शंकरांनी अंधकासुराचा त्रिशुलाने वध केला.

सर्व देवता आनंदी झाले. स्वर्गातुन पुष्पवृष्टी केली. भगवंत आनंदी झाले होते. पण जी उग्रमूर्ती निर्माण झाली होती ती सूड भावनेतुन निर्माण झाली होती. कारण रागाच्याभरात निर्माण झाली होती. त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा तो जो कोणी होता त्याने अंधकासुर राक्षसाचे सर्व रक्त पिउन टाकले. तरीही त्याची भूक काही शमत नव्हती. त्याला अस वाटु लागल की आपल्याला हे सर्व ब्रम्हांड जर खायला मिळाल तर. आणी तो शंकरांपासून निर्माण झाल्याने त्याला सर्व ज्ञान होते. त्याने शंकराची स्तुती करण्यास प्रारंभ केला.

शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले तुला काय हवे ते माग त्यावेळी ती उग्रमूर्ती म्हणाली माझी भूक काही शमत नाही सर्व ब्रम्हांड खाण्याची मला शक्ती द्या. भगवंत तथाssस्तु म्हणाले. तो वर मिळाल्यानंतर त्या उग्र मूर्तीला प्रचंड देह प्राप्त होतो. त्याने सर्व ब्रह्मांड व्यापून जाते. त्यावेळी शंकरांना समजते आपण हे केल चांगल्यासाठी पण काही भलतच होणार की काय? सर्व देव, आणी अंधकासुराचे जे काही उरलेले सैन्य हे सर्व घाबरले आता काय करावे? म्हणुन विचार करू लागले. आता देव आणी दानव (राक्षस) दोघांवरही संकट असल्याने ते एकत्र आले. आणी त्यात असे ठरले की सर्वांनी मिळून आपण त्या उग्र मूर्तीला थांबवले पाहिजे.

पण शंकरांपासुन निर्माण झालेल्या त्या मूर्तीला समोर जाउन थोपवण्याची भीती वाटू लागली. म्हणुन सर्व देव आणी काही राक्षस यांनी त्या मूर्तीवरती पाठून स्वारी केली. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे ते स्वारी करू लागले. ब्रह्मदेव आपल्या सर्व शक्तींसह त्याच्या पाठीवर स्वारी करतात. एकदम एवढ्या देवतांनी स्वारी केल्यामुळे तो बिचारा पालथा भूमिवर पडला. आणी सर्व देवतांना विचारू लागतो तुम्ही सर्व मला का त्रास देत आहात? आता देवांसमोर प्रश्न पडला हा आपल्याशी काही शस्त्र घेउन युद्ध करायला आलेला नाही. मग याला काय सांगावे? सर्व देव म्हणतात की तू सर्व ब्रह्मांड गिळंकृत करायला निघाला आहेस तसे केलेस तर सगळीकडे हाहाकार माजेल. म्हणुन आम्ही तुला थांबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यावर तो म्हणाला त्याला मी काय करू, माझी भूक काहीकेल्या शमत नाही आहे आणि मी आपल्याला का त्रास देईन मी तर शिवशंकरांपासून निर्माण झालोय.

अस सांगितल्यानंतर देवांना पेच (प्रश्न) पडला काय उत्तर द्यावे? म्हणुन सर्व देव भगवान शंकरांजवळ पोहोचले. आणी घडलेला सर्व वृत्तांत सांगू लागले. नंतर शंकर व इतर सर्व देव त्या मुर्तीजवळ जातात. आणी त्याला सांगतात आम्ही सर्व देव मिळुन तुला आशीर्वाद देतो की, आता तुझी भूक काहिही न खाता शमेल. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी तुझ्या शरिरावरती जिथे जिथे स्वारी केली होती तिथे आम्ही ज्योती रूपाने कयम वास करु. त्याला आता कोणत्या नावाने हाक मारावी? असा प्रश्न देवांना पडतो. ती पिशाच्चा सारखी दिसणारी उग्रमुर्ती असते. ती सर्व विश्वाला, ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली असते. सगळीकडे व्यापून राहिल्यामुळे त्याचे नाव वास्तुपुरूष असे ठेवण्यात येते.

आणि त्याला अजुन एक वरदान दिले जाते. कारण तो ज्यावेळी पालथा पडतो त्यावेळी त्याचे दोन्ही हात व पाय जोडलेले असतात. म्हणून त्याला असे वरदान दिले जाते की जो कोणी तुझ्यावर वास्तव्य करायला येइल त्याचा तू उद्धार करावास. ती जी मुर्ती आहे म्हणजेच “वास्तुपुरूष” म्हणून नवीन घर, बंगला, देवालय (मंदीर) इ. बांधल्यावर वास्तुशांत करतात.

तो ज्यावेळी भूमीवर पडला त्यावेळी ईशान्य दिशेला हात व नैर्रुत्य दिशेला पाय आहेत आणि तो शंकरांपासुन उद्भवला म्हणुन त्यांचे नाव त्यामधे असावे म्हणुन शिवं वास्तु असा मंत्र तयार झाला “घरात जर अशांतता असेल तर शिवं वास्तु हा मंत्र म्हणतात” शिवं या शब्दाचे दोन अर्थ आहेत – १) शंकर २) शुभ.

वरील सर्व कथा “मत्स्य-पुराणात” आलेली आहे. आता आपण वास्तुशांत का करावी हे पाहू. ज्यावेळी वास्तु बांधत असताना खोदकाम, पाषाण भेदन (मोठे दगड फ़ोडणे) झाडे तोडणे, असंख्य प्राणी, जीव, जंतू, मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो, वास्तु तयार करण्यासाठी खूप यंत्रे वापरावी लागतात. त्यामुळे त्या वास्तुपुरूषाच्या शरीरालासुद्धा इजा पोहोचलेली असते. या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो वास्तु विकत घेतल्यानंतर आपल्याला लागतो. म्हणुन त्याची क्षमायाचना करता यावी. त्या सर्व देवतांच पूजन करून त्यांची प्रार्थना करता यावी.

आपल्याला दोष लागु नये व वास्तुपुरुषाची कृपा प्राप्त व्हावी. म्हणून वास्तुशांत अवश्य करावी. वास्तुशांत करताना त्यामधे काय काय विधी असतात ते पाहू.

१) पंचगव्य प्राशन—

आपल शरीर, वाणी, मन शुद्ध व्हाव म्हणुन पंचगव्य प्राशन आवश्यक आहे. हे पंचगव्य गाई पासुन मिळणार्‍य़ा पाच पदार्थांपासून तयार केले जाते. गोमुत्र, गोमय(गाईचे शेण) दूध, दही, तूप, यापासुन तयार केले जाते.

२) पवित्रक धारण—

कार्य संपन्न होईपर्यंत देह पवित्र रहावा म्हणून पवित्रक अनामिकेत धारण केले जाते. पवित्रक म्हणजे दर्भांपासुन तयार केलेले असते. दर्भ म्हणजे गवताचा एक प्रकार आहे. दर्भांच्या खूप जाती आहेत. त्यात काही मउ तर कही धारदार असतात.

३) कुलदेवता वंदन—

आपल्याकडे जसे लग्नकार्य असल्यानंतर कुलदेवतेला नारळ विडा ठेवला जातो. त्याप्रमाणे घरात कोणतेही मंगलकार्य असल्यानंतर कुलदेवता, ग्रामदेवता, राहत असलेल्या परिसरातील देवता, गुरू, वास्तुदेवता या सर्वांचे आर्शीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणुन त्यांना नारळ विडे ठेवले जातात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेउन देणे अशक्य असल्याने घरात देवासमोर ठेउन नमस्कार केला जातो.

४) प्रधान संकल्प-

वास्तु बांधत असताना जे काही दोष निर्माण झाले असतील त्यांच परिमार्जन होउन ही वास्तु सर्व कुटुबियांना लाभावी. म्हणून वास्तुशांत, व सर्व ग्रहांची कृपा प्राप्त होण्यासाठी वास्तुशांतिच्या अंगभूत ग्रहशांत करतो. असा संकल्प केला जातो. संस्कृत ही देववाणी असल्याने या सर्वांचा उच्चार संस्कृत मधुन केला जातो. तसेच गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्य वरण करीन असे उपसंकल्प केले जातात.

॥ गणेशपूजन ॥

गणेशपूजन हे आपल्या नियोजित कार्यामध्ये कोणतेही विघ्न येउ नये म्हणून करतात. हे गणेशपूजन तांदुळाची रास करून त्यावर सुपारी किंवा श्रीफ़लावर करतात. त्याची नाममंत्राने षोडशोपचार पूजा करून त्याची प्रार्थना केली जाते. या नंतर पुण्याहवाचन हा विधी चालु होतो.

॥ पुण्याहवाचन ॥

पुण्याहवाचन म्हणजे आजचा दिवस पुण्यकारक असो. असे आलेल्या ब्राह्मणवर्गाने आशीर्वाद देणे. यामधे तांदुळाच्या राशीवर दोन कलश ठेउन त्यात पाणी, गंध, दूर्वा, पंचरत्न, सुपारी, नाणे, उपलब्ध झाल्यास पंचपल्लव आंबा, वड, पायर, पिंपळ, औदुंबर यांचे डहाळे(टाळे) घालुन त्यावर पूर्णपात्र म्हणजे छोटे ताम्हन तांदुळभरून त्यावर सुपारी ठेउन वरूण देवतेचे आवाहन पूजन केले जाते. नंतर आई- वडिल, गुरूजन, अतिथी यांचे स्मरण करतात.

मग अनुक्रमे अमुक –अमुक कार्यासाठी आजचा दिवस आम्हाला १)पुण्यकारक २)स्वस्तिकारक ३) ऋद्धिकारक ४)श्रीकारक असो. अशी आलेल्या ब्राह्मणांकडे प्रार्थना करून सुवासिनी कडुन यजमान दंपतीचे औक्षण केले जाते. त्यानंतर दोन्ही कलशातील पाणी काढून अभिषेक केला जातो. येथे पुण्याहवाचन विधी पूर्ण होतो. यानंतर मातृकापूजन होते.

मातृकापूजन हे हिंसानिवारण करण्यासाठी असते. आपल्या हातुन हिंसा काय घडते असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पण आपल्या रोजच्या जिवनात सुद्धा कळत-नकळत हिंसा होत असते. प्रत्यक्ष मुद्दाम केली नाही तरी चालताना, बसण्याच्याठिकाणी, चूल, यज्ञासाठी वापरण्यात येणार्‍या समिधा, तीळ याठिकाणी सूक्ष्म जीव असु शकतात. त्यांची अप्रत्यक्षपणे हिंसा होत असते. म्हणून मातृकापूजन करावे लागते. या मातृकापूजनात वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे सामान्यत: २७ क्वचित २८ देवता असतात. त्यामधे आपल्या कुलदेवतेचेही पूजन असते. या नंतर नांदीश्राद्ध केले जाते. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये आपण देवांचे, वडिलधार्‍या मंडळींचे आशीर्वाद घेतो. तसेच गत वाड-वडिलांचे स्मरण आवश्यक असते. त्यांच्यासाठी पाद्य, आसन गंध व दोन ब्राह्मण जेवतील एवढा आमान्न(शिधा) एवढे दिल्याने आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. दूर्वा ह्या वंशवृद्धिकारक असल्याने नांदीश्राद्ध करताना हातात दूर्वा धारण केल्या जातात. व पितरांची प्रार्थना केली जाते. येथे नांदीश्राद्ध विधी पूर्ण होतो. * गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध या विषयांची माहिती अनुक्रमणिकेत सविस्तर दिली आहे. यानंतर आचार्य व ऋत्विज वरण होते. (आचार्य म्हणजे मुख्यगुरूजी व ऋत्विज म्हणजे त्यांना सहाय्य करणारे गुरूजी) आचार्यांच्या व सर्व गुरूजींच्या हाती दर्भ/पवित्रक सुपारी, नाणे दिले जाते. पुढील सर्व कार्यक्रम विधियुक्त संपन्न करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते. ते देताना आपल्या गोत्राचा, नावाचा तसेच गुरूजींच्या गोत्राचा, नावाचा उच्चार करून द्यावयाचे असते. व गुरूजीसुद्धा आलेल्या अन्य गुरूजींच्या सहाय्याने हे सर्वकार्य विधियुक्त संपन्न करीन. असे वचन देतात. यानंतर यजमानदंपती यांना घरचा अहेर केला जातो. व आवाहित देवतांचे विसर्जन केले जाते. एवढे विधी यजमानांनी करावयाचे असतात. पुढीलकर्म प्रामुख्याने आचार्य व त्यांचे सहाय्यक गुरूजी यांच्या मार्फ़त केले जाते. त्यानंतर गुरूजी स्थलशुद्धी म्हणजे आपल्या जागेची शुद्धता करून घेतात. त्यावेळी पिवळी मोहरी(राई)टाकून, पंचगव्य तसेच शुद्धपाणी सगळीकडे प्रोक्षण केले जाते. त्यानंतर मुख्यदेवता वास्तुमंडलाचे आवाहन, पूजन केले जाते.त्यामधे एकूण बासष्ट देवता असतात. त्यांचे आवाहन पूजन केले जाते. यानंतर अग्निची स्थापना केली जाते. (यज्ञासाठी गृह्याग्नी (घरातील अग्नी) सुवासिनी आणत असत. गृह्याग्नी उपलब्ध नसल्याने सुवासिनींकडुन अग्नी प्रज्वलित केला जातो.) आपण दिलेली प्रत्येक आहुती अग्निनारायण त्या त्या देवतांना अमृतरूपाने नेउन देतात. म्हणून अग्निची स्थापना करण्यात येते. अग्निचे ध्यान करून आलेल्या गुरूजींच्या मार्फ़त ग्रहमंडलाची स्थापना पूजन करतात. नवग्रह मंडल बेचाळीस देवतांचे असते.

॥नवग्रह मंडल ॥

या चित्रात दाखविल्याप्रमाणे क्रमाने

सूर्य मध्यभागी असून पूर्व दिशेला मुख आहे. रंग लाल आहे. व वस्त्रसुद्धा भगव्या/लाल रंगाचे आहे. आकार वर्तुळाकार आहे.

चंद्र आग्नेय दिशेला आहे. मुख पश्चिमेला आहे. रंग सफ़ेद(पांढरा) आहे. वस्त्रसुद्धा सफ़ेद रंगाचे आहे. आकार चौरस (चौकोनी) आहे.

मंगळ दक्षिण दिशेला आहे. मुख दक्षिणदिशेला आहे. रंग लाल आहे. वस्त्रसुद्धा लाल रंगाचे आहे. आकार त्रिकोणी आहे.

बुध ईशान्य दिशेला आहे. मुख उत्तरेला आहे. रंग पिवळा आहे. वस्त्रसुद्धा पिवळे आहे. आकार बाणासारखा आहे.

गुरू उत्तर दिशेला आहे. मुख उत्तरेला आहे. रंग पिवळा आहे. वस्त्रसुद्धा पिवळे आहे. आकार आयताकृती आहे.

शुक्र पूर्व दिशेला आहे. मुख पश्चिमेला आहे. रंग सफ़ेद आहे. वस्त्रसुद्धा सफ़ेद आहे. आकार चांदणीसारखा आहे.

शनी पश्चिम दिशेला आहे. मुख पश्चिमेला आहे. रंग काळा आहे. वस्त्रसुद्धा काळे आहे. आकार धनुष्यासारखा आहे.

राहू नैऋत्य दिशेला आहे. मुख दक्षिणेला आहे. रंग काळा आहे. वस्त्रसुद्धा काळे आहे. आकार सुपासारखा आहे.

केतु वायव्यदिशेला आहे. मुख दक्षिणेला आहे. वस्त्र वेगवेगळ्यारंगाचे आहे. आकार ध्वजासारखा (झेंडा) आहे. अशी त्यांची रचना आहे. प्रत्येक ग्रहाच्या अधिदेवता (उजव्या बाजूला) व प्रत्यधिदेवता (डाव्या बाजुला) आहेत. क्रतुसाद्गुण्य (मध्यभागी अर्धवर्तुळाकार) सात देवता आहेत. क्रतुसंरक्षक अष्टलोकपाल (आठदिशेला) आहेत. त्यांच पूजन झाल्यानंतर कोणत्या देवतांना कोणत्या द्रव्याने किती आहुती देणार याचा उल्लेख केला जातो. त्याला अन्वाधान असे म्हणतात. नंतर हवनाला प्रारंभ होतो. प्रथम ग्रहमंडलातील देवतांसाठी समिधा, भात/तांदूळ, तूप यांचे हवन केले जाते.

त्यानंतर मुख्यदेवता वास्तुसाठी १) समिधा. २) दुधात शिजवलेलाभात/तांदुळात दूध-साखर घातली जाते. ३) तूप, ४) तीळ अशा चार द्रव्याने १०८/२८ या संख्येने हवन केले जाते. परत वास्तुदेवतेसाठी बेलफ़ळाचे हवन होते. येथे हवन संपन्न होते. नंतर प्रायश्चित्त हवन होते.

या नंतर बलिदान होते. जागेचे संरक्षण करणारी क्षेत्रपाल देवता आहे. वास्तुमध्ये कोणत्याहीप्रकारचे भय(भिती), पीडा राहु नये. म्हणून त्याची पुजाकरून त्याला भात त्यावर उडिद टाकून पिठाचा दिवा किंवा कापुर प्रज्वलित करून बलिदान केले जाते. या नंतर या कर्माच्या सांगतेसाठी पूर्णाहुती करण्यात येते. आवाहित देवतांची पंचोपचारांनी उत्तरपुजा केली जाते. या पंचोपचारां मध्ये १)गंध, २)फ़ूल, ३)धूप, ४)दीप ५)नैवेद्य अशा पाच उपचारांनी पुजा केली जाते. त्यानंतर देवता ज्या कलशावरती स्थापन केलेल्या असतात. त्याकलशातील पाणी घेउन यजमानदंपती व घरातील उपस्थित मंडळींवरती अभिषेक केला जातो. त्यानंतर धरापूजन केले जाते.

॥ धरापूजन ॥

धरापूजनामध्ये धराम्हणजे पृथ्वी तिची पुजा केली जाते. ही धरादेवी विष्णुची पत्नी आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण रोज उठल्यापासुन झोपे पर्यंत पृथ्वीवर म्हणजेच धरादेवीवरती वावरतो. म्हणुन त्या धरादेवीची पूजा केली जाते. शक्यअसल्यास साडी-खणाने यजमानपत्नी ओटी भरतात.

॥समुद्र वसनेदेवी पर्वत: स्तनमंडले । विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे. ॥

अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर यजमानदंपती यांच्याकडून अग्निपूजन करून विभूती धारण करून घेतली जाते. नंतर यजमानांना आशीर्वाद फ़लरूपाने दिला जातो. यानंतर हे सर्वकर्म संपादन केल्याबद्दल पूर्वी आचार्यांना(मुख्य गुरूजींना) गाय दान केली जात असे. परंतु सध्याच्यापरिस्थितीत हे शक्य होत नाही. म्हणून दक्षिणा स्वरूपात गोप्रदान दिले जाते. व बाकीपुरोहितांना दक्षिणा दिली जाते. नंतर आलेल्या सर्वगुरूजी यांच्याकडुन या वास्तुमध्ये शांतता रहावी. व ही वास्तु आमच्या सर्व कुटुंबियांना लाभावी. शुभ असावी. असे आशीर्वाद घेतले जातात. येथे वास्तुशांत प्रयोग संपन्न होतो.

॥ गृहप्रवेश ॥

विधिवत वास्तुशांत झाल्यानंतर काही शुभसूचक वस्तुंच्यासह यजमान व पत्नी यांनी घरात प्रवेश करणे. काहीवेळा हा गृहप्रवेश वास्तुशांत करण्याच्या आधीसुद्धा केला जातो. गृहप्रवेश करतेवेळी यजमान हातामध्ये देवतांचे छायाचित्र किंवा मूर्ती घेतात. यजमानपत्नी डोक्यावर वास्तुकलश घेते. घरातील अन्यमंडळी नविन केरसुणी, सप्तधान्य, पेढे इ. हातात घेऊन मुख्यद्वाराच्याबाहेर घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज होतात. मुख्यद्वाराच्याबाहेर सुवासिनीकडून यजमान-दंपतीच्या पायावर दूध-पाणी घालून देवतांना हळद-कुंकू वाहिले जाते. यजमानपत्नीला हळद-कुंकू लाउन व यजमानांना गंध, अक्षता लाउन देवतांचे व यजमान-दंपतीचे औक्षण केले जाते. गुरूजी मंगल श्लोक व “तदेव लग्नं” हा श्लोक म्हणतात. व सुवासिनींसह सपत्नीकयजमान व अन्य कुटुंबिय मंडळी उजवा पाय प्रथम घरात ठेऊन मग डावा पाय अशापद्धतीने एकामागुन एक घरात प्रवेश करतात. यानंतर संपूर्ण घरात आतून प्रदक्षिणा केली जाते. यावेळी शंख, घंटा अथवा सनई अशा मंगल वाद्यांचा नाद केला जातो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर नेहमी जेथे देव ठेवायचे आहेत अशाठिकाणी(देवघर) देवाचे छायाचित्र, मूर्ती ठेवतात. वास्तुकलश स्थापन केलेल्या ठिकाणी ठेउन देतात. केरसुणीला गंध, अक्षता, हळ्द-कुंकू लाऊन पुजा केली जाते. चुलीची किंवा सध्याच्याकाळात शेगडिची गंध, फ़ुल, हळद-कुंकू लाउन पूजा केली जाते. पत्नीकडून अग्निप्रज्वलित करून त्यावर एका लहान भांड्यात दूध ठेवले जाते. यथावकाश ते ओतू गेल्यावर भूमीला अर्पण केलेला पहिला नैवेद्य म्हणून ते सर्व दूध झाडाच्या मुळाशी विसर्जन करतात. घराच्या प्रवेशद्वारावर तसेच देवघर, स्वयंपाकघर, तिजोरी अशा ठिकाणी गृहलक्ष्मीचे(पत्नीचे) वरद हस्त उमटवले जातात. त्याकरता हळद-कुंकू यामधे पाणी घालून पत्नी ते मिश्रण स्वत:च्या दोन्ही हाताला लावते. याच मिश्रणाने दारावर स्वस्तिक, शुभ-लाभ असे लिहिले जाते. (स्वस्तिक व शुभ-लाभ यांचे प्लास्टिक अथवा रेडीयमचे स्टिकर उपलब्ध असतात.) तेसुद्धा अशाठिकाणी लाऊ शकता. यानंतर सर्वजण एकत्रजमून हात जोडून वास्तुदेवतेची प्रार्थना करून शांती, पुष्टी, तुष्टी करिता गुरूजींकडून आशीर्वाद घेतात. प्रवेशकरताना ज्या ज्या गोष्टी आपण घेतो त्यांचे काही विशिष्ट उद्देश आहेत.

1) निरांजन हे प्रकाशाचे प्रतीक आहे.

2) मूर्ती, छायाचित्र हे देवतांच्या सांनिध्याचे प्रतीक आहे.

3) कळशी ही जल संमृद्धीचे प्रतीक आहे.

4) केरसुणी स्वछता व त्याने प्राप्त होणार्‍या आरोग्याचे तसेच लक्ष्मीचेही प्रतीक आहे.

5) सप्तधान्य हे धान्य संमृद्धीचे प्रतीक आहे.

6) पेढे इ. गोड पदार्थ आनंदमय प्रसंगी वाटले जातअसल्यामुळे ते मंगलमय वातावरणाचे प्रतीक आहे.

असा गृहप्रवेश झाल्यानंतर संपूर्ण घराच्या मध्यभागापासून आग्नेय कोपर्‍यात एक वीत जागा सोडून १बोट लांब, १बोट रुंद, १बोट खोल खड्डा केला जातो. त्यात वास्तुकलशातील थोडे पाणी घातले जाते. मातीच्यापेटीत ते सप्तधान्य, दहीभात घालून त्यावर वास्तुप्रतिमा पालथी ठेवतात. ही पेटी सूत्राने वेष्टीत केली जाते. वेष्टन केल्यावर वास्तुप्रतिमेचे शिर(डोके) कोठे आहे हे कळण्यासाठी काही खूण करणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर गोंधळ होणार नाही. अशी मातीची पेटी आग्नेय दिशॆला यजमानांकडून ठेवली जाते. ठेवतेवेळी वास्तुपुरूषाचे डोके ईशान्य दिशेला व पाय नैर्रुत्य दिशेला येतील याची काळजी घेतली पाहिजे पुन्हा यापेटीवर माती घालून पाणी घालतात. जमिनीला समांतर होण्यासाठी त्यावर तेवढ्याच आकाराची लादी बसवतात. त्यावर व्हाइट सिमेंट लावले जाते. हा खड्डा करताना – याठिकाणी सांडपाणी, कचरा, चपला, अथवा अपवित्र गोष्टी संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. नेमका आग्नेय दिशेला खड्डा करणे अशक्य असल्यास दुसरा पर्याय म्हणून ईशान्य कोपरा वापरू शकतो. (संदर्भ- आश्वलायनगृह्य परिशिष्ट) या खड्ड्यावर स्वस्तिक किंवा शिवं-वास्तु असे चिन्ह असलेली लादी बसवू शकता. जेणे करून वास्तुपुरूषाचे स्थान सहज समजू शकेल. शक्य असल्यास रोज किंवा मंगलकार्य प्रसंगीतरी या ठिकाणी नैवेद्य दाखविणे अपेक्षित आहे.