• तिथी :

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा

  • पार्श्वभूमी :

वटपौर्णिमा मागची पौराणिक कथा अशी की, सावित्री, मद्रदेशाचा राजा अश्वपती याची कन्या. सावित्रीने पती म्हणून सत्यवानाची निवड केली होती. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे वृद्ध आणि अंध होते. त्यांचे राज्य शत्रूने घेतले होते. त्यामुळे सत्यवानाला आपल्या पित्याबरोबर वनवास प्राप्त झाला होता. ‘सत्यवान अल्पायुषी आहे, लग्नानंतर बरोबर एक वषाने त्याचा मृत्यू होणार आहे’ हे नारदमुनींकडून कळल्यानंतरही सावित्रीचा सत्यवानाशीच विवाह करण्याचा निश्चय पक्का होता. ‘काहीही असले तरी मी सत्यवानाशीच विवाह’, हा तिचा सकंल्प पाहून अश्वपती राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच लावून दिला. वृद्ध सासुसासरे यांची ती मनोभावे सेवा करी. आपल्या सतत कष्टांनी आणि प्रेमळ वागणुकीने ती सत्यवानालाही अत्यंत प्रिय झाली.

सावित्रीला वनात राहून तिथल्या औषधी वनस्पती, कंदमुळे यांची चांगलीच जाण झाली होती. वनवासातील गोड सहवासात वर्ष संपत आले, सावित्रीला नारदांच्या त्या भविष्यवाणीची आठवण होतीच म्हणून तिने खडतर व्रत केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्राथर्ना केली, त्रिरात व्रत केले. एके दिवशी सत्यवानाबरोबर सावित्रीही वनात गेली. त्या दोघांनी कंदमुळे जमवली. सिमधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान वडाचे फांद्यांवर चढला. फांदीवर कुर्‍हाड चालवू लागला. पण त्या नादात तो धडकन खाली पडला आणि गतप्राण झाला. ते पाहून सावित्रीही बेशुद्ध पडली. तिच्या आत्म्याला पतीची प्राणज्योत स्पष्ट दिसत होती. ती साध्वी पतिव्रता होती. व्रतांच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्य दिसत होते. ती सत्यवानाच्या प्राणज्योतीच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, ‘बाळ, तुला या सत्यवानाच्या प्राणाबरोबर स्वगार्त येता येणार नाही; मागे फिर आणि त्यांच्या देहाचे अंत्यसंस्कार कर’. पतीच्या प्राणासाठी तिने यमराजांकडे खूप आर्जव केले. ते पाहून यमराज म्हणाले, “मुली, तुझ्या पतीनिष्ठेबद्दल मला आदर आहे पण तू पतीशिवाय अन्य मागणी माग. मी तो तुझा हट्ट अवश्य पुरवीन”. मग सावित्रीने आपल्या सासर्‍याला दृष्टी मागितली त्यांचे गेलेले राज्य परत मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागितले आणि शेवटी आपणही पुत्रवती व्हावे, असा आशीवार्द यमाजवळ मागितला.सावित्रीच्या विनयशील आणि मधुर बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले.पतीशिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्यांनी भराभर कबूल केल्या आणि शेवटी तिला, “पुत्रवती भव”असा आशीवार्द देऊन यमराज फसले. सावित्रीने मोठ्या खुबीने सत्यवानाचे प्राण परत मिळविले. अशी ही पौराणिक कथा आहे.

ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

या दिवशी स्त्रिया वट वृक्षाची पूजा करतात. आपले सौभाग्य अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात. म्हणून सौभाग्याचे लक्षण असेलेल्या हिरव्या बांगडया, शेंदूर, बुक्का, हळद-कुंकू, फुले, अक्षता, एक गळेसरी वडाच्या पूजेकरिता घेतात. याशिवाय अत्तर, कापूर, पंचामृत, वस्त्र, विडयाची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोब-याचा नैवेद्य, दुर्वा इ. साहित्य घेतात. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करतात. हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून त्याची पूजा करतात. शक्य असल्यास ब्राम्हण बोलवून पूजा करतात. या दिवशी बायका उपवास करतात. पूजा झाल्यानंतर वडाला तीन प्रदक्षिणा घालतात. वडाच्या बुंध्याला सूत गुंडाळतात.