विजय पांडुरंग भटकर


विजय पांडुरंग भटकर (ऑक्टोबर ११, इ.स. १९४६ – हयात) हे मराठी, भारतीय संगणकशास्त्रज्ञ आहेत.नांलदा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. भटकर हे तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ. विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.

विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा (ग्राहकहित-‘अंबाला’ ) या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली, असे म्हणतात. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकर्‍यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.

विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले.

भटकरांनी १९९३मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.

त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.

विज्ञान व तंत्रज्ञानात रमणारा हा शास्त्रज्ञ भारतीय संस्कृती, वेद-उपनिषदे, संत साहित्य व अध्यात्मविचार यांच्यातही रस घेणारा आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी यातायात कमी व्हावी, या विचाराने त्यांनी सी-डॅक मधून मुक्त होऊन ‘एज्युकेशन टु होम’ (ETH) या प्रकल्पाला वाहून घेतले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जबाबदार्‍या सांभाळताना त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. केंद्र शासनाने त्यांना पद्मश्रीने गौरविले, तर महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित बहुमान केला. ७० हून अधिक शोधनिबंध व आठ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

संत गाडगे महाराजांचा आदर्श समोर ठेवून विज्ञान व अध्यात्माची सांगड घालीत ते कार्यरत आहेत. संपूर्ण देशातील तीर्थक्षेत्रे ‘ज्ञानतीर्थक्षेत्रे’ व्हावीत यासाठी आळंदीपासून त्या स्वरूपाचे काम त्यांनी सुरू केले आहे.

भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान २००० मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी १९९९ व २००० ला “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानासह राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.युरोपिअन संस्कृतीचा अभ्यास करणारे, तसेच आध्यात्मिक अनुभूतीसाठी ध्यानधारणा करणारे डॉ.विजय भटकर हे एकमेवाद्वितीय असंच म्हणू शकतो.