यशवंतराव चव्हाण

यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र – नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. बालपणातच त्यांनी आपल्या वडिलांना गमावले. त्यानंतर विठाबाई, यशवंतराव चव्हाण यांची आई, तिने आपल्या भावाच्या मदतीने मुलांना सांभाळलं, शिकवलं. विठाबाईंनी यशवंत रावांना लहानपणापासूनच देशप्रेम आणि स्वावलंबनाचे धडे दिले. यशवंतरावांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे मराठी सोबतच संस्कृत आणि इंग्रजीचंही त्यांनी अफाट वाचन केलं.  वडील लहानपणीच गेल्यामुळे चव्हाण कुटुंबाना गरीबीचा सामना करावा लागला, शाळेचे शुल्क सुद्धा भरण त्यांना अशक्य होत होत. तरीही शिक्षण चालूच ठेवायचं निर्धार त्यानी केला होता.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे

जन्मा येणे दैवा हाती
करणी जग हासवी!
यशवंतरावांचं प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रेत झाले. तर माध्यमिक शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलात अनेक अडचणीतून झाले. तर एल. एल. बी. चे शिक्षण पुण्यातील लॉ कॉलेजात झाले. यशवंतरावजी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 1942 च्या आंदोलनात त्यांनी सारा सातारा जिल्हा उतरविला होता. 1947 साली स्वराज्य मिळाल्यानंतर काही काळ सातारा येथे वकिली करून ते 1952 पासून पूर्ण वेळ राजकारणात उतरले. द्वैभाषिक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ पुरवठा मंत्री, त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही पुरवठा मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 त्यांनी काम केले, तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 ते 1984 एवढा प्रदीर्घ काळ ते भारताचे संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र आणि व्यवहारमंत्री होते. तर काही काळ विरोधी पक्ष नेते, भारताचे उपपंतप्रधान होते. वय वर्षे सोळा ते वय वर्षे एकाहत्तर इतका काळ म्हणजे सुमारे साठ वर्षे देशसेवेत होते. यावरून त्यांच्या महान, त्यागी, समर्पित जीवनाची कल्पना येते.

कॉलेजात असताना यशवंतराव महात्मा गांधी, नेहरू, मार्क्स आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारसरणीकडे आकर्षित झाले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि गांधी, नेहरू विचारसरणीचा स्वीकार केला तो कायमचाच.
१९४६ मध्ये मुंबई प्रांताच्या विधीमंडळात यशवंतरावांनी प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. मोरारजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतरावांनी मंत्री म्हणून काम सुरू केले. मग द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना देखील राबवल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दीड-पावणे दोन वर्षे त्यांनी काम केले पण तेवढय़ा काळात या राज्याच्या जडणघडणीचा ठोस असा पाया त्यांनी घातला. एकाचवेळी शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर विकास कामांना आणि नवीन संस्थात्मक उपक्रमांचा त्यांनी प्रारंभ केला.

खंबीर नेतृत्व :
संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाल्यावर नव्या महाराष्ट्राची जडणघडण त्यांनी केली हे त्यांचे महान कार्य आहे. कृषी-औद्योगिक समाजरचना, सहकारातून समाजप्रगती, विविध औद्योगिक वसाहती, सहकारी बॅंका, पतसंस्था, पूरक संस्था यांची उभारणी कोयनानगर सारखी मोठी धरणे व छोटी गाव-शेततळी योजना, जलसंधारण कामे, विभागीय विद्यापीठांची उभारणी लेखकांना उत्तेजन आणि पुरस्कार योजना, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती, विश्वकोष निर्मिती मंडळ, अशी चौफेर दृष्टी ठेवून केलेली रचनात्मक कामे हे स्व. यशवंतरावजींचे कार्य कर्तृत्व आहे. निर्मितीक्षम प्रतिभा आहे. सामान्य लोकांचा समाजकारणात, राजकारणात सहभाग असावा म्हणून पंचायतराज, जिल्हा परिषद निर्मिती, स्थानिक नेतृत्वाला संधी व कार्यकर्तृत्वाचे डोंगर उभा करण्याचे आव्हान हे सारे यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात करून घडवून दाखविले. ही त्यांची महाराष्ट्राला मोठी देणगी आहे. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यातून कर्तबगार नेतृत्वाचा उदय झाला आणि पुढे तेच महाराष्ट्राचे राज्यकर्ते बनण्याची एक अखंड साखळी तयार झाली, होत आहे. याचे सारे श्रेय स्व. चव्हाणसाहेबांनाच आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील कर्तबगार माणसे हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. देशात महाराष्ट्र विकासाच्याबाबतीत सर्वप्रथम राहील याची दक्षता त्यांनी घेतली. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण हे आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आज महाराष्ट्र विकासाची घोडदौड करीत आहे हे त्यांचे द्रष्टेपण आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी भारतावर चीनने विश्वासघातकी आक्रमण केल्यावर देशातील एक कणखर नेता म्हणून संरक्षणमंत्रीपदी स्व. यशवंतराव यांनाच बोलावले आणि त्यांनी आपली कर्तबगारी दाखविली. 1965 साली पाकिस्तानची कुरापत काढल्यावर, तत्कालीन विमानदलप्रमुख एअरचीफ मार्शल अर्जुनसिंग यांना बॉंबफेकीची आदेश दिला आणि पेशावरपर्यंत भारतीय सैन्य गेले. ही आठवण नुकतीच मुंबई येथे झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी समारंभात अर्जुनसिंग यांनी सांगितली. तेव्हा चव्हाणसाहेबांच्या कणखर निर्णय घेण्याच्या क्षमतेची कल्पना आली. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि पंडित नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावले.1962 ते 1994 इतका प्रदीर्घ काळ ते केंद्रात मंत्री होते. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला होता. महाराष्ट्र या नावातील शक्ती देशाला दाखवून दिली. यामागे त्यांचा सखोल अभ्यास, निर्णयक्षमता, परिश्रम, प्रखर देशभक्ती व लोकहितदृष्टी होती. ते उत्तम वक्ते होते. वाचक होते आणि शैलीदार लेखकही होते. “सह्याद्रीचे वारे’, “शिवनेरीच्या नौबती’, “युगांतर’, “ऋणानुबंध’, “भूमिका’, “कृष्णाकाठ’ मिळून बारा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या संग्रहात विविध भाषांतील सुमारे वीस हजार पुस्तके होती. इतका बहुश्रुत नेता, लेखक, वक्ता, वाचक आणि सहृदयी माणूस राजकारणात सापडणे कठीण आहे. देशात आणि महाराष्ट्रात संस्थात्मक, रचनात्मक कामाचे मानदंड यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केले आहेत. खरे तर त्यांनी व त्यांच्या पत्नी सौ. स्व. वेणूताई चव्हाण यांनी देशाचा संसार केला. इतके ते देशमय, समाजमय होऊन गेले होते. त्यांची जडणघडण हा एक स्वतंत्र ग्रंथाचाच विषय आहे.

समन्वयाची भूमिका : 
स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राला लाभलेले मोठे द्रष्टे नेते होते. भारताचा, महाराष्ट्राचा त्यांचा सामाजिक अभ्यास चिकित्सक म्हणता येईल असा होता. 1966 साली ते पुण्यातील अनाथ हिंदू महिलाश्रमाच्या रौप्यमहोत्सवासाठी सन्मानीय पाहुणे म्हणून आलेले होते. मी साप्ताहिक साधनाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. समारंभातील प्रारंभिक भाग संपल्यावर ते भाषणास उभे राहिले. प्रारंभी त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. त्यात दलितदास्य, स्त्रीदास्य आणि शेतकरीदास्य याची त्यांनी कठोर मीमांसा केली आणि शेवटी त्यांनी जी विनंती केली, त्यामुळे कोणालाही साधे टाळ्या वाजविणेच जमले नाही. ते म्हणाले, आपल्या समाजात अनाथ महिलाश्रमाचा सुवर्ण, रौप्यमहोत्सव होत असेल तर आपण स्त्रीला आहे त्या ठिकाणीच शतकानुशतके ठेवले आहे. आपल्या सुधारलेल्या समाजात स्त्री अनाथ राहते हेच मोठे आश्चर्य आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की सामाजात अशी स्थिती आणू या की स्त्रीसाठी महिलाश्रमाची आवश्यता भासणार नाही. लवकरच समाज स्त्रीला आधार देऊ लागल्याने हा अनाथ महिलाश्रम बंद करावा लागला, अशी स्थिती येऊ दे. त्या समारंभाला मला जरूर बोलवा, मी जरूर येईन. दुसरा प्रसंग आठवतो. बालगंधर्व नाट्यगृहात कर्मवीर वि. रा. शिंदे जन्मशताब्दी समारंभाचा सांगता समारंभ होता. ते सन्मानीय पाहुणे होते. व्यासपीठावर समाजवादी नेते नानासाहेब गोरे उपस्थित होते. स्व. यशवंतरावांच्या भाषणापूर्वी गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात शेवटी यशवंतराव यांच्याकडे हात करून ते म्हणाले, जातीभेद संपत नाही, वर्णभेद संपत नाही, अन्याय संपत नाही तर हे स्वराज्य कसले यशवंतराव बोला ना? तुमचे हात स्वराज्यात कोणी धरलेत? सांगाना टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. यशवंतराव शांतपणे उभे राहिले, त्यांनी समाजप्रबोधनाचा शंभर वर्षाचा इतिहास मार्मिक भाष्य करीत उभा केला. नानासाहेब गोरे यांच्याकडे हात करून ते म्हणाले, नानासाहेब माझे आणि तुमचे अर्धशतक समाज जात वर्ग विरहित एक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आपले हात प्रतिगामी लोकांनी प्रयत्न करूनही समता येत नाही. त्यांचे हात कोणी धरलेत? याचा अर्थ आपणा सर्व प्रागतिक विचारी लोकांचे हात कठोर परंपरेने धरलेत. महर्षी वि. रा. शिंदे यांनी प्रहार केले. समाज थोडा हलला. आपणही प्रहार करू या. समाज बदलेल. केवळ सत्ताक्रांतीने समाजक्रांती होत नसते. समाज क्रांती समाजानेच करावयाची असते. आपण या कठोर समाज मनाला धक्के मारत राहू या. स्व. यशवंतराव हे केवळ राजकीय नेते नव्हते. समाजकारण, अर्थकारण, साहित्यकारण आणि राजकारण यासाठी लागणारी चौफेर अभ्यासू, विवेकदृष्टी त्यांच्याजवळ होती. ते स्वत: उत्तम लेखक तर होतेच, पण नव्या लेखकांनाही त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. अनेक नव्या कथा, कादंबरी, वैचारिक लेखांचे संग्रह, कविता, ऐतिहासिक ग्रंथांना त्यांनी लिहिलेल्या चिकित्सक प्रस्तावना मराठी साहित्याचे लेणे ठरल्या आहेत. आयुष्यभर त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला. लहान मोठा असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजतच त्यांनी शिक्षण घेतले होते. मातोश्री श्रीमती विठाबाईंचे संस्कार त्यांच्यावर होते. त्यामुळेच सत्तेवर असतानाही त्यांना कधीही गरीब आणि शेतकऱ्यांचा विसर पडला नाही. त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झालेला हा नेता होता. ते सर्वार्थाने लोकांचे नेते होते. यशवंतराव यांचा मृत्यू २५ नंवबर १९८४ मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने झाला तेंव्हा ते ७१ वर्षांचे होते.