यशवंतगड

सागर किनार्‍याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका आहे. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी नावाचे गाव आहे. हे रेडीगाव येथिल गणपतीच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. तसाच येथे असलेल्या मॅगेनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे.
 
रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्‍या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्‍यावर असलेला वेशिष्ठपूर्ण अशा यशवंतगडाची दुदैवाने कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे पाय यशवंतगडाकडे वळतच नाहीत.
 
हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसेसची सोय आहे. तसेच सावंतवाडी कडूनही आपल्याला शिरोडा गावामध्ये रहाण्याची तसेच जेवणाची सोय होवू शकते. रेडीपासून मालवण पर्यंत गाडीरस्ताही उत्तम आहे.
 
रेडीगावातून एक दीड किलोमीटर अंतरावार यशवंतगड आहे. रेडीच्या खाडीच्या किनार्‍यालाच लागून असलेल्या लहानशा टेकडावर यशवंतगड बांधलेला आहे. समुद्र सपाटापासून ५० मीटरची साधारण उंची आहे. गावातल्या नारळी पोफळीच्या जागा आणि त्यात असलेली कोकणी पध्दतीची वैशिष्ठपूर्ण घरे ओलांडून आपण यशवंतगडाजवळ पोहोचतो. येथ्नू एक वाट खाली पुळणीकडे जाते. उजव्या हाताला जाणारी पायवाट झाडीत शिरते. या झाडीत शिरल्यावर दोन मिनिटांमधे आपण एका बुरुजाजवळ पोहोचतो. बुरुजाला वळसा घातल्यावर गडाचे प्रवेशव्दार नजरेत भरते. हे कमानयुक्त प्रवेशव्दार आहे. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडामधे केलेले असल्यामुळे प्रवेशव्दारही जांभ्यादगडामधे बांधलेले आहे.
 
प्रवेशव्दारामधून आत गेल्यावर पहारेकर्‍याच्या रहाण्याच्या जागांचे अवशेष दिसतात. गडाच्या आत बाहेर मोठय़ाप्रमाणावर झाडी झुडपे वाढलेली असल्यामुळे आतिल सर्व भाग झोकाळून गेलेला आहे. या प्रवेशव्दाराच्या आत शिरल्यावर डावीकडे बालेकिल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. ही पायवाट जाभ्यांदगडात बांधून काढलेली आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेर बुजत चाललेला खंदकही दिसतो. येथेही एक प्रवेशव्दार आहे. त्याला काही पायर्‍याही आहेत. येथूनआत शिरल्यावर डावीकडे भक्कम बांधणीचा दरवाजा आहे.
 
हा दरवाजा वैशिष्ठपूर्ण आहे. दरवाजा बंद असल्यास बाजूला दिंडी दरवाजा केलेला आहे. हा वळणदार मार्ग दरवाजाच्या आत निघतो. अशा प्रकारच्या रचना महाराष्ट्रामधे दुर्मीळ आहे. कर्नाटकातील पारसगडाला अशा प्रकारची रचना केलेली आढळते. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांसाठी असलेली जागा आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून सरंक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे.
 
येथे समोरच दोन गोलाकार बुरुजांच्या मधे बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा आहे. गोलाकार बुरुजांमुळे त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवडय़ा असून पुढील मार्ग कातळ कोरुन तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दरवाजाच्या मधील जागेत बंदिस्त चौक आहे. या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे.
 
बालेकिल्ल्याच्या तिसर्‍या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डावीकडे मोठी इमारत आहे. सरळ जाणारी वाट तटबंदी कडे जाते. तटबंदीवर झाडी खूप वाढल्यामुळे तटबंदीवर फरी मारता येत नाही. या तटबंदीवरुन फेरी मारताना काही ठिकाणी पंचविस ते तीस फुट उंचीची तटबंदी आहे. शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या केलेल्या दिसतात तसेच मजबूत बुरुजही दिसतात. तटबंदीवर वाढलेल्या झाडीमुळे मात्र त्यांची पार रया गेलेली आहे.
 
मधल्या भागामधे भव्य वाडा त्याच्या काही भिंतीसकट उभा असलेला दिसतो. त्याचे दरवाजे, तुळ्या कालौघात नामशेष झालेले असले तरी वाडय़ाची भव्यता लक्षवेधक आहे.