वसंतपंचमी
भगवती सरस्वतीमाता उत्सव , ओम नमो भगवते वासुदेवाय !
वसंत पंचमीचा योग हा सृष्टीसाठी नवनिर्माणाचा आनंदच … आपल्यासाठी आई भगवती सरस्वती मातेच्या पूजनाचा..
उत्तर प्रांतामध्ये पिके आनंदाने भरभरून डोलू लागतात..
त्याच्यासाठी कृतार्थ होण्याचा..आनंदोत्सव.
माघ मासातील पंचमी ही विशेष कारण शरद ऋतू संपून वसंत ऋतू सुरु होतो. श्रीहरी चराचरात भरला असला तरी ज्यामध्ये त्याचे श्रेष्ठत्व भरलेले आहे असा हा वसंत ऋतू .
श्रीमद्भागवत गीतेमध्ये आपल्या ऐश्वर्यअंगांचे वर्णन सांगितल्याप्रमाणे ..
” सर्व ऋतूमध्ये मी वसंत आहे” .
हा सर्व आनंदोत्सव साजरा करण्यामागे पौराणिक सत्यकथांचेही योगदान व अर्थ आहेच.
ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली पण सृष्टी सर्व अंगाने जीवनपूरक असेल, परिपूर्ण असेल अशी नव्हती.
सर्व काही शांत.
या सृष्टीमध्ये आनंदासाठी चैतन्य हवे , त्यासाठी नाद हवा, त्यासाठी पूरक संगीत हवे , त्यासाठी ज्ञान हवे व त्यासाठी वाणी.
तेव्हा महाविष्णू नेहमीप्रमाणे ब्रह्मदेवाच्या मदतीला आले. या सृष्टीच्या चैतन्याची परिपूर्णता फक्त मातृस्वरूपिणी करणार कारण हा सृष्टीचा नियम.
जे जे उत्पन्न होईल ते केवळ मातृशक्तीनेच. म्हणूनच दोघांनी आई भगवतीची प्रार्थना केली.
त्या भक्तीने तेज निर्माण झाले व मातृस्वरूपिणी प्रकटली.
चार भुजांच्या सुंदर स्वरूपासहित , एक हातामध्ये वीणा व एकामध्ये ज्ञानभांडार. एक हातामध्ये माला व एक हाताने मुद्रा करत आई सरस्वती उभी राहिली.
आई सरस्वतीने वीणा वादन सुरु केले व त्या नाद झंकारामुळे सर्वत्र चैतन्य सुरु झाले. पंचमहाभूते आनंदली. सृष्टीतील प्रत्येक जीवांमध्ये चैतन्यनाद सुरु झाला. सृष्टीतील झाडे, पक्षी. जलस्तोत्र यांचा सांगीतिक नाद सुरु झाला. त्या चैतन्य नादामुळे बुद्धी ग्रहणासाठी ज्ञानाचे महत्व कळून आले. ज्ञान व्यक्त करण्यासाठी वाणीचे व वाणी व्यक्त करण्यासाठी भाषाशब्दांचे महत्व आले.
हे सर्व कार्यकारण सरस्वतीमातेमुळेच म्हणून लेखक, कवी, संगीतकलाकार तिचा जयजयकार व उत्सव आपल्या कलेद्वारे साजरा करत असतात.
भगवती सरस्वतीमाता ज्ञान, बुद्धी व संगीत कलाची देवता असली तरी आपल्या भुजामध्ये आयुध न घेताही कुठल्याही आयुधापेक्षा पराक्रमी आहे कारण ती वाणीची भगवती आहे.
सृष्टीतील सुखधारणा व संहारक स्तिथी केवळ तिच्यामुळे.
अनेक महायुद्धामध्ये सर्व योद्धे आपली वाणी वापरून पराक्रमी झाले व काही मातीत मिसळले.. तर काही झोपी गेले.
लंकाधिपती रावणाचा बंधू कुंभकर्ण एकदा ध्यानस्थ बसला. अनेक वर्षे तपस्या केली व त्यायोगे ब्रह्मदेवाकडे वर मागितला. सर्व देव भयभीत झाले कारण तो बलाढ्य राक्षस उन्मत्त होईल व पुढे सर्वाना जड होईल. म्हणून सर्व देवानी भगवती सरस्वतीची करुणाकृपा मागितली.. त्याने वरदान मागताना अक्षरांचा घोळ झाला व मी खूप वर्षे झोपेन असा वर मागितला.
आजच्या कलियुगामध्ये भगवती सरस्वतीमातेचे योगदान अपूर्व आहे व दिवसेंदिवस वाढत जाणारे व व्याप्ती वाढवणारे.
मानवी मनाच्या मुळाशी असलेल अव्यक्त स्वरूप वाणीद्वारे व्यक्त होते व तिच्या स्वरूपावर जय विजयाचे – पराजयाचे नगारे वाजू लागतात.
केवळ वाणीमुळे सुख दुःखाच्या लाटा येतील त्यात किती भिजायचे किंवा वाळवंटातील गरम वाळूचे चटके किती बसू द्यायचे हे सर्व आपल्या हाती .. आपल्या वाणीवर
.. अनोळखी जवळ येऊ शकतात व जवळचे दूर….. जाऊ शकतात .. गीतरामायणातील गीतासारखे .. “एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट”
म्हणूनच सर्व स्तोत्रामध्ये श्री गणपती, भगवती सरस्वतीमाता व श्रीगुरुंचा जयजयकार ..असा क्रम असतो कारण बुद्धीचे स्वरूप वाणीद्वारे व्यक्त होणार म्हणून भगवती सरस्वतीचे महत्व अनन्यसाधारण.
मग संतानीही तिचाच गौरव करताना …तुकोबारायांनी “हरी मुखे म्हणा” हेच वदवले व माउलींनी “जो जो जे वांछील तो ते लाहो” हे व्यक्त करताना मानवी मनाची अव्यक्तता असली तरी देहातील गाभाऱ्यामध्ये सरस्वती कृपेने व्यक्त होत असते.
म्हणून वसंतपंचमीला “वाणीपंचमी” असे गौरविणे ही पण कृतज्ञता आहे कारण पाच कर्मेंद्रिये व ज्ञानेन्द्रिये यामधील (दृष्टी, जीभ , कान , हात व पाय) ही पाच इंद्रिये वाणी संभाषण करताना व्यक्त होत असतात. मग तो आनंद असेल किंवा द्वंद्व असेल किंवा शांतीमुद्रा असेल.
आपल्या देहातीत भगवती सरस्वती मातेचे पूजन आपणच सुखसमाधान व शांतीसाठी , सर्वांच्या कल्याणासाठी करायचे आहे.
!! आई गुरू शक्ती भगवती सरस्वती मातेचा जयजयकार असो !!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपादराजम शरणं प्रपद्ध्ये
नमो गुरवे वासुदेवाय
अग्रेषित संदर्भ