श्री गुरुदेव दत्तात्रयांचे सोळा अवतार

१) योगिराज :

ब्रम्हदेवाचे मानसपुत्र ‘अत्रि’ हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार ‘योगिराज’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.

२) अत्रिवरद :

अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता ‘अत्रिवरद’ या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,”तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.’ या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते. (जन्म :-कार्तिक कृष्ण प्रतिपदा)

३) दत्तात्रेय :

अत्रिवरदाने अत्रिऋषीना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला. त्यावर ‘तथास्तु’ म्हणून बालरुपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले. ते दिगंबर रुप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते. हाच दत्तात्रेयांचा ‘दत्तात्रेय’ नामक तिसरा अवतार. (जन्म :-कार्तिक कृष्ण २)

४) कालाग्रिशमन :

यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास ‘कालाग्निशमन’ हे नाव पडले. (जन्म :- मार्गशीर्ष शुद्ध १५)

५) योगीजनवल्लभ :

या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार ‘योगिजनवल्लभ’ या नावाने प्रसिद्ध आहे. (जन्म :-मार्गशीर्ष शुद्ध १५)

६) लिलाविश्वंभर :

दत्तात्रेयांचा सहावा अवतार ‘लिलाविश्वंभर’ ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला. (जन्म :-पौष शुद्ध १५)

७) सिद्धराज :

भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा ‘सिध्दराज’ नावाचा सातवा अवतार. (जन्म :-माघ शुद्ध १५)

८) ज्ञानसागर :

सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील ‘ज्ञानसागर’ नावाचे रुप धारण केले. (जन्म :-फाल्गुन शुद्ध १०)

९) विश्वंभरावधूत:

पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी ‘विश्वंभरावधूत’ या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला. (जन्म :-चैत्र शुद्ध १५)

१०) मायामुक्तावधूत:

भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी ‘मायामुक्तावधूत’ या नावाचा दहावा अवतार घेतला. (जन्म :-वैशाख शुद्ध १४)

११) मायायुक्तावधूत :

दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव ‘मायायुक्तावधूत’ असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती. (जन्म :-जेष्ट शुद्ध १३)

१२) आदिगुरु :-
दत्तात्रेयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र ‘अलर्क’ यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला. (जन्म :-आषाढ शुद्ध १५)

१३) शिवरुप :

एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा ‘शिवरुप’ नावाचा तेरावा अवतार. (जन्म :-श्रावण शुद्ध ८)

१४) देवदेवेश्वर :

दत्तात्रेयांचा ‘देवदेवेश्वर’ नावाचा चौदावा अवतार आहे. (जन्म :-भाद्रपद शुद्ध १४)

१५) दिगंबर :

दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार ‘दिगंबर’ या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला. (जन्म :-आश्विन शुद्ध १५)

१६) कमललोचन :

‘कमललोचन’ नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले….(जन्म :-कार्तिक शुद्ध १५)

ॐ योगिराजाय नमः ।
ॐ अत्रिवरदाय नमः ।
ॐ दत्तात्रेयाय नमः ।
ॐ कालाग्निशमनाय नमः ।
ॐ योगिजन वल्लभाय नमः ।
ॐ लीलाविश्वंभराय नमः ।
ॐ सिध्दराजाय नमः।
ॐ ज्ञानसागराय नमः ।
ॐ विश्वंभरावधूताय नमः ।
ॐ मायामुक्तावधूताय नमः ।
ॐ मायायुक्तावधूताय नमः ।
ॐ आदिगुरु: नमः ।
ॐ शिवरुपाय नमः ।
ॐ देवदेवेश्वराय नमः ।
ॐ दिगंबरावधूताय नमः ।
ॐ कमललोचनाय नमः ।

वास्तविक दत्तात्रयांचे कार्यपरत्वे प्रत्येक वेळी होणारा अविष्कार हा अवतारच मानला जातो.
या दृष्टीने स्वयंभू मन्वतरापासून तो आत्तापर्यत भक्त्तजनांच्या कल्याणाकरता दत्तात्रेयांचे जे विविध अवतार झाले त्यात १६ अवतारांना प्राधान्य देण्यात येते.
दत्तात्रयांचे हे अवतार निरनिराळ्या महिन्यात व निरनिराळ्या मुहुर्तावर झालेले असून त्यांची स्वरुपेही भिन्न भिन्न अशी वर्णिलेली आहेत.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त