कोल्हापूरी खाद्यसंस्कृती

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. कोल्हापूर जिल्हा जुना शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून सर्व लोकांना माहीत आहे. कोल्हापूरची लवंगी मिरची आणि तमाशा ह्याकरिता विख्यात असलेला हा जिल्हा तांबडा रस्सा व पांढरा रस्सा ह्यासाठीही सुद्धा प्रसिद्ध आहे.

प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.

कोल्हापूरची मिसळ आणि मटणाचा तांबडा-पांढरा मटणाचा रस्सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. सध्या भारतातील बहुतेक हाॅटेलात व्हेजकोल्हापूरी, कोल्हापूरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात. पण व्हेज कोल्हापूरी हा प्रकार कोल्हापूरातच मिळत नाही. कारण या नावाचा प्रकारच मुळात कोल्हापूरात नाही. असो, इथली गंमत म्हणजे तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचे. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य असा चवीचा रस्सा खाता येतो. हा रस्सा बाकी रश्श्यांप्रमाणे किंवा ग्रेव्हीप्रमाणे टिकावू नाही. तांबडा रस्सा तयार करतांना कोल्हापूरी चटणी वापरावी लागते. कोल्हापूरचा अजून एक प्रकार मला आवडतो तो म्हणजे दावणगिरी लोणी-दोसा, हा दोसा जनता बाजार, शिवाजी पुतळयाजवळ येथे मिळतो. याची खासियत अशी की भरपूर लोणी व जाळीदार दोसा. यामध्ये चुरमु-याचा वापर करतात.

कोल्हापूरी मांसाहारी, शाकाहारी स्वयंपाकाची घराघरातील पद्धत जवळपास सारखीच असते. पांढरा-तांबडा रस्सा, सूक मटण, खिमा हे प्रकार अख्ख्या कोल्हापूरात होत असतात. त्याच बरोबर तिथल्या पोळ्यांचीही एक खासीयत तीन पदर सुटलेले व खरपूस तेल लावून भाजलेली गरम गरम चपाती अप्रतिम लागते. इथली एक खासीयत अजून कोल्हापूरातील एक पालेभाजी पोकळा. तव्यावर केलेली पोकळ्याची भाजी, भाकरी आणि खरडा याला तोड नाही. याच बरोबर दूध कट्यावर मिळणारे आपल्यासमोर काढलेले म्हसीचे काढलेले धारोश्ण दूध. डारेक्ट पेल्यात धार काढायची व तोंडायला लावायची. अजून एक अफलातून प्रकार म्हणजे ताज्या दूधामध्ये सोडा घालून प्यायची पद्धत. शेवटी एक म्हण तुम्हाला माहीत असेल व्यक्ती तितक्या प्रकृती.