सावजी रस्सा

साहित्य –

कांद्याचे वाटण 200 ग्रॅम
(300 ग्रॅम कांदे तेलावर परतून त्याची पेस्ट करा)
आलं-लसूण पेस्ट 1 वाटी
लाल मिरच्या 8-10
बडी शोप 1 चमचा
मोठी विलायची 4-5
छोटी विलायची 8-10
स्टार फूल 4-5
दालचिनी 2-3
लवंग 2 चमचे
जायपत्री 1 चमचा
काळी मिरी 2 चमचे
शहाजीरे 2 चमचे
धने अर्धी वाटी
खसखस पाव वाटी
ज्वारीचे पीठ 2 चमचे
शेंगदाणा तेल 1 वाटी
खोबरेल तेल 1/2 वाटी
तिखट 2 चमचे
तमालपत्र 4-5
हळद 1 चमचा
मीठ चवीनुसार

कृती: कांदा व लसूण सोडून सर्व मसाले लालसर, काळपट रंगात भाजून घ्यावेत व गरम पाण्यात 10 मिनिटे उकळल्यानंतर बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात तेल टाकून प्रथम आलं लसूण पेस्ट टाकून ते शिजवल्यावर कांद्याचे वाटण तसेच वरील वाटलेला मसाला व तमालपत्र घालावे. थोडेसे पाणी टाकून हे मिश्रण तेल सुटेस्तोवर उकळावे. सगळयात शेवटी हळद, तिखट व खोबरेल तेल टाकावे. वरुन थोडी कोथिंबीर घालावी. चवीनुसार मीठ घालावे.

सुसॅन

कृती: 1 किलो मैदा पाण्यात घट्ट भिजवून त्याला दहा मिनिटांनी नळाखाली धुवावे. असे करत असताना, ह्यातील स्टार्च निघून जाईल व जे उरेल त्यास ’’ग्लूटन’’ असे म्हणतात. ते जवळपास 200 ते 150 ग्रॅम असेल. हा पदार्थ पाण्यात विरघळत नाही. ह्यानंतर थोडया उकळत्या पाण्यात एक चमचा मीठ घालून, त्यात हा पदार्थ सोडावा. 5-7 मिनिटे शिजवल्यानंतर, ह्याचे पाणी काढून तुकडे करावेत. ह्याला ’’सुसॅन’’ म्हणतात. (टीप: हे सुसॅन 5-6 दिवस फ्रीजमध्ये टिकते.) ह्याच्या भाजीसाठी 200 ग्रॅम सुसॅनला 2 वाटया सावजी ग्रेव्ही घालून गरम करावे. नुसते असेच सुसॅन टाकण्याऐवजी ते तळून टाकले तरी चालते. कोथिंबीर घालून गरमागरम वाढावे.

गवारा तिखा

साहित्य:-

गवाराच्या शेंगा 200 ग्रॅम
बारीक चिरलेले कांदे 1 वाटी
आलं लसूण पेस्ट 3 चमचे
धने जिरे पावडर 1-1 चमचा
हळद, तिखट चवीनुसार
गरम मसाला 1 चमचा
मीठ चवीनुसार
भाजून बारीक केलेली खसखस 2 चमचे
तेल अर्धा वाटी
मोहरी-हिंग

कृती:- प्रथम पातेल्यात थोडं पाणी घेऊन त्यात हळद-मीठ घालून गवारीच्या शेंगा, उकळवून घ्या. (शेंगाच्या फक्त शिरा काढून घ्या).
तेलावर मोहरी घालून फुटल्यावर लसूण पेस्ट, कांदा चांगला परतून घ्या. नंतर हळद, तिखट, धने, जिरे पावडर घाला. नंतर आलं घालून थोडं ओलसर होईल इतपत पाणी घालून चवीनुसार मीठ घाला. कोथिंबीर गरम मसाला घालून गरम भाकरीबरोबर सव्र्ह करा.

डाळ कांदा

साहित्य:-

भिजवलेली चण्याची डाळ 2 वाटया
बारीक चिरलेला कांदा 2 वाटया
आलं लसूण पेस्ट 4 चमचे
धने जिरे पावडर 2 चमचे
वैदर्भीय पद्धतीचा काळा मसाला 1 चमचा
हिरवी मिरची ठेचलेली 1 चमचा
खसखस भाजून कुटलेली 2 चमचे
तिखट, हळद, मीठ चवीनुसार
शेंगदाण्याचे तेल अर्धा वाटी
मोहरी, हिंग फोडणीला

कृती:- चण्याची डाळ दोन ते तीन तास भिजवून ठेवावी. फोडणीला तेल घालून मोहरी फुटल्यावर हिंग, कुटलेली मिरची, लसूण परतल्यावर कांदा घालून खरपूस परतावा. त्यानंतर चण्याची डाळ, मीठ व थोडे पाणी घालून शिजवावी. त्यानंतर क्रमाक्रमाने धने जिरे पावडर, खसखस, हळद, तिखट, आलं घालून थोडे परतावे. गरम मसाला कोथिंबीर घालून लंबी रोटी किंवा भाकरी बरोबर खायला द्यावी.
टिप:- 1) या भाजीत तेल व तिखट नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडे जास्त असते.