वर्‍हाड प्रकारची पातळ भाजी

साहित्य:-

बारीक चिरलेला पालक 2 वाटया
मेथी किंवा आळू अर्धा वाटी
मुळयाच्या चकत्या अर्धा वाटी
हिरवी मिरची कापलेली 2 चमचे
आलं, लसूण पेस्ट, हळद, तिखट चवीनुसार
मेथी दाणे अर्धा चमचा
खोब-याचे काप 2-3 चमचे
भिजलेले शेगदाणे 1 चमचा
चणा डाळ भिजलेली अर्धा वाटी
हिंग अर्धा चमचा
धणे जिरे पावडर 2 चमचे
तेल अर्धा वाटी

कृती:- प्रथम एका भांडयात दाणे चणाडाळ एकत्र शिजवून घ्या. अर्धा वाटी तेलापैकी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, लसूण, शिजवलेले दाणे, चणाडाळ, कढीपŸाा, खोबरं-मुळा, हळद, तिखट, मेथीदाणे घालून चांगले परतून घ्यावा. नंतर बारीक चिरलेला पालक, मेथी टाकून खरपूस परतून घ्यावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळल्यावर थोडी बेसनाची पेस्ट करुन त्यांनी घट्ट करावी. चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालून उकळून घ्यावी. उरलेल्या तेलात पुन्हा मोहरी, हिंग व बारीक चिरलेला लसूण घालून ती फोडणी वरुन भाजीवर घालावी.

खसखसीची भाजी

साहित्य:-

भिजलेली खसखस 2 वाटया
किसलेला कांदा अर्धा वाटी
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
हिरवी कोथिंबीर 1 चमचा
धने जिरे पावडर 1 चमचा
हिंग पाव चमचा
तेल –
लवंग 1-2
तेजपान 2-3
काळा मसाला अर्धा चमचा

कृती:- पातेल्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात लवंगा, तेजपान घालावे. फोडणी चांगली झाल्यावर त्यात लसूणची पेस्ट व किसलेला कांदा घालून परतावे. भिजलेली खसखस पाटा वरवंटयावर किंवा मिक्सरवर वाटून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात खसखस तेल सुटेस्तोवर शिजवावी. नतंर त्यात उरलेले मसाले, आलं व चवीनुसार मीठ घालून, थोडे पाणी घालून, थोडे परतून ही भाजी पोळी बरोबर खायला दयावी. अतिशय वेगळी आणि रुचकर अशी ही भाजी होते.

 मेथीचे आळण

साहित्य:-

बारीक चिरलेली मेथी 1 वाटी
बारीक चिरलेला लसूण 2 चमचे
हिरवी मिरची 5-6
मोहरी 1 चमचा
हिंग चिमूटभर
बेसन 2 चमचे
दही पाऊण वाटी
मीठ, साखर चवीनुसार

कृती:- सर्व प्रथम 4 चमचे तेल गरम करुन मोहरी फोडणीला घाला, नंतर हिरवी मिरची, लसूण छान परतून मेथी सुद्धा परतून घ्या. नंतर यात बेसन व दह्याचे एकत्र मिश्रण करुन घाला. थोडे पाणी सुद्धा घाला. चवीनुसार मीठ घालून उकळी येवू दया. वरुन परत हिंग व मोहरीची फोडणी घाला. भाकरीबरोबर खायला दया.

झुणका

साहित्य:-

बेसन 1 वाटी
बा. चिरलेले कांदे अर्धी वाटी
तेल अर्धी वाटी
आलं-लसूण पेस्ट 1-1 चमचा
हळद पाव चमचा
धने पावडर अर्धा चमचा
तिखट चवीनुसार
आमचूर पावडर –
मीठ, साखर चवीनुसार
मोहरी अर्धा चमचा

कृती:- तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जीरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडया वेळ परतावे. शेवटी बेसन घालावे व वरुन थोडे पाणी घालून वाफेवर शिजवावे. वरुन सजावटीकरीता कोथिंबीर घालावी.

कढी

साहित्य:-

दही 1 लिटर
पाणी 3 लिटर
बेसन 150 ग्रॅम
साखर 50 ग्रॅम
मेथीदाणा 1 चमचा
आलं अर्धी वाटी
मोहरी 4 चमचे
हिंग 1 चमचा
कढीपत्ता 1 वाटी
तेल 100 ग्रॅम
जीरे 2 चमचे
हिरवी मिरची अर्धी वाटी

कृती:- पातेल्यात तेल गरम झाल्यावर जीरे मोहरीची फोडणी घालून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता व हिंग घालावे. दही मिक्सरमधे घोटून घ्यावे व त्यात बेसन घालावे. नंतर हे मिश्रण फोडणीत घालून वर पाणी घालावे. कढीला उकळी आल्यावर, मीठ, साखर, किसलेलं आलं व कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

वर्‍हाडी ग्रेव्ही

साहित्य:

आलं-लसूणचे वाटण अर्धा वाटी
कांद्याचे वाटण 1 वाटी
वाटलेली हिरवी मिरची 4-5 चमचे
चिंचेचा कोळ पाव वाटी
गुळाचा खडा चवीनुसार
सुके भाजलेले खोबरे अर्धा वाटी
भाजलेले शेंगदाणे पाव वाटी
खसखस भाजलेली पाव वाटी
भाजलेले तीळ पाव वाटी
मेथीदाणे 1 चमचा
हळद अर्धा चमचा
तिखट चवीप्रमाणे
भाजून वाटलेले धणे 5 चमचे
जिरे पावडर 5 चमचे
गरम मसाला 2 चमचे
तेजपान 4-5
तेल 1 वाटी
हिंग छोटा पाव चमचा

कृती: पातेल्यात तेल घेऊन सर्वप्रथम मोहरी, लसूण व कांद्याचे वाटण घालून तांबूस रंग येईस्तोवर परतावे. थोडेसे पाणी घालून त्यात तेजपान व उर्वरीत सर्व जिन्नस घालून हे मिश्रण परतावे. मसाल्याला पुरेल इतपत गरम पाणी घालून तेल सुटेस्तोवर परतावे. सर्वात शेवटी तिखट, हळद, आलं, गूळ व चवीनुसार मीठ घालावे.