खानदेशी खाद्यसंस्कृती
खानदेश म्हणजे तीन जिल्हे धुळे, जळगाव व नंदूरबार इथली भाषा अहिराणी बोलीपण अहिराणी पदार्थ तिखटं पण वेगळेपण जपणारे, शेवभाजी, डाळ गंडोरी, डाळ बट्टी, निस्त्याची चटणी, शेंगदाण्याची पातळ चटणी, कळणाची पूरी-भरीत, तूरीचा घेंगा, बोरांची भाजी, केळीची भाजी, तूर डाळीची भेंडके (तूरीच्या डाळीच्या कणीपासून तयार केलेला इडली सारखा पदार्थ), उडीद डाळीची वडे जे पुण्यांसारखे दिसतात, मुगाच्या डाळीपासून तयार केलेल्या ऐडम्या (दोस्याचा एक प्रकार).
इथली वांग्याची भाजी अतिशय प्रसिद्ध. त्यासाठी वांगी सुद्धा वेगळी लागतात, वांग्यांना देठासकट कापून आलं-लसणाच्या वाटणाबरोबर फोडणीला घालून यात हळद, तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर घालून थोडे वाफेवर शिजवून नंतर थोडे पाणी घालून तांब्याच्या भांडयात जवळपास 5-6 तास याला शिजवतात. शिजल्यावर रवीने घोटून एकजीव करतात. शेवटी चवीनूसार मीठ व आमचूर पावडर, कोथिंबीर घालून ही भाजी साधं वरण, त्यावर साजूक तूप व बट्टी बरोबर खायला देतात. त्याबरोबर कच्चा कांदा व बिबडे (ज्वारीच्या पापडाचा एक प्रकार), आता इथे तयार होणारी जी शेवभाजी असते त्याला लागणारी खास शेवही फैजपूरमध्ये धनाजी शेट यांच्या हाॅटेलमध्ये मिळते. ती नुसती खायलाही छान लागते.
भूसावळला गेलात तर घाशीलालचे आलू वडे (बटाटे वडे) खाल्ल्याशिवाय येऊ नका. हा माझा प्रेमळ सल्ला आहे. अतिशय मसालेदार असा बटाट्याचा मसाला असतो. असं म्हणतात की, इथे आलू वडा तयार करायला इतके बटाटे लागतात की बटाटे कुस्करायला एक मोठ्ठा हौद तयार केलेला आहे व त्यात प्लास्टीकचे पायाचे मोजे घालून काही माणसं नुसत हेच काम करत असतात.
जळगावच्या दत्त डेअरी व सरस्वती डेअरीचे श्रीखंड याची महती अशी 40 किलोची श्रीखंडाची कॅन उलटी केली तरी ते श्रीखंड खाली पडणार नाही. त्यानंतर भंगाळे मटणं हाॅटेलमधलं मटण अतिशय प्रसिद्ध आहे. हे हाॅटेल जळगाव-भूसावळ रोडवर आहे आणि याची खासियत अशी की, हे आठवडयातून दोनच दिवस उघडं असतं. व त्या दोन दिवसात चार-चार तासंच उघड असतं. एकदा भांडयात बनविलेलं मटण संपले की पुन्हा ते बनवित नाही. त्याबरोबर गाव हैयावरचं चिकन हा पण एक वेगळा प्रकार आहे. इथेच जळगाव रोडवर गोविंद धाब्यावर जाण्याचा योग आला. इथली खासियत अशी की, यांची मागेच शेती आहे त्यात भरपूर भाज्या लागल्या आहेत. तुम्ही ती भाजी स्वतः तोडायची व आपल्याला हव्या त्या पद्धतीने बनवून घ्यायची.