जळगावी वांग्याचं भरीत
साहित्य:-
भरीताची वांगी 2-3 नग
शेंगदाणे पाव वाटी
कांदयाची पात चिरलेली 2 वाटया
लसूण 1 नग
हिरव्या मिरच्या 10-12 नग
भरडलेले धने 2 चमचे
तेल अर्धी वाटी
मोहरी, हिंग फोडणीकरीता
कृती:-
वांग्यांना टोच मारुन ती निखाÚयावर किंवा गॅसवर भाजून घ्यावीत. वरची साल काढूल बारीक चिरुन घ्यावीत. मिरच्या लसूण जाडसर वाटावं. तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात मिरची-लसूण वाटण, धने घालावे. त्यावर वांगी चांगली परतावी. नंतर मीठ, भाजलेले दाणे घालावे. सर्वात शेवटी कांद्याची पात घालून परतावं.
टीप:- दुसरी पद्धत:- यात भाजलेल्या वांग्याच्या गरात सर्व जिन्नस मिसळून नंतर वरुन फोडणी घालावी.
दराब्याचे लाडू
साहित्य:-
गहू 1 किलो
तूप पाऊण किलो
पीठी साखर 1 किलो
वेलची पावडर 1 चमचा
जायफळ –
कृती:- गहू चार ते पाच तास भिजत ठेवून चाळणीमध्ये निथळू दयावे. नंतर त्याला कपडात बांधून रात्रभर ठेवा. नंतर त्याचा रवा दळून आणा. नंतर दोन चाळण्यांनी चाळून त्याचा कोंडा वेगळा करुन घ्या. उरलेल्या पीठात तूप घालून लालसर भाजा. थंड करुन परातीमध्येे भरपूर फेटा. नंतर त्यात पीठी साखर मिसळून थोडेसे फेटून लाडू वळा.
फौजदारी डाळ
साहित्य:-
तूर डाळ 4 कप
बारीक चिरलेले कांदे 2 नग
हिरवी मिरची 35 नग
तेल 1 पळी
पाणी 8 कप
मोहरी 1 चमचा
गरम मसाला 1 चमचा
किसलेले खोबरं 4 चमचे
हळद पाव चमचा
हिंग –
मीठ चवीनुसार
कृती:-
सर्व साहित्य एकत्र करुन शिजवावे. नंतर हे मिश्रण एका परातीत घेऊन त्याला लोटयाने घोटावे (म्हणजेच बारीक करावे). त्यानंतर फ्रायपॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, डाळी बरोबर शिजलेल्या मिरच्या, हळद, हिंग व गरम मसाला घालून त्यामध्ये घोटलेले डाळ घाला. आवश्यकतेनुसार गरम पाणी व चवीनुसार मीठ घालून ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला दया.
ज्वारीच्या कळणाची भाकरी
साहित्य:-
ज्वारी 4 वाटया
कणिक 1 वाटी
खडे मीठ 4 चमचे
कृती:-
ज्वारी, उडीद व खडे मीठ एकत्र करुन दळून घ्यावे. व साध्या भाकरीप्रमाणे त्याच्या भाकरी बनवून खावे.
खानदेशी घोसाळयाचं भरीत
साहित्य:-
घोसाळी (गिलके) पाव किलो
हिरव्या मिरच्या 4-5
लसूणपाकळया 4-5
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
चिरलेला कांदा अर्धी वाटी
थोडी कांदापात पाव वाटी
मीठ, तेल –
कृती:-
घोसाळयाचे काप करुन थोडया तेलावर वाफवून घ्यावेत. गरम असतानाच त्यात मीठ घालावं व पळीनं हाटून त्याचा लगदा करावा. लसूण व मिरची ठेचून बारीक करावी. कढईत तेल तापवून मिरचीचा ठेवा व कांदा त्यात परतावा. त्यावर घोसाळयाचा गर, कोथिंबीर व कांदापात घालून वाफ येईपर्यंत परतावं. गरम गरम भाकरीबरोबर वाढावं.
खानदेशी खिचडी
साहित्य:-
तांदूळ 2 वाटया
तुरीची डाळ 1 वाटी
मोहरी, हिंग, तेल –
तिखट, मीठ –
लसूण पाकळया पाव वाटी
सुक्या मिरच्या 4-5 नग
कृती:-
प्रथम डाळ-तांदूळ एकत्र धुऊन ठेवावेत. भांडयात थोडं तेल तापवून घ्यावं. त्यात मोहरी, हिंग व तिखट घालून डाळ-तांदूळ परतावेत. हळद घालू नये. चवीनुसार मीठ व पाच वाटया उकळत पाणी घालून खिचडी अर्धवट शिजवावी. नंतर ते भांडं कुकरमध्ये ठेवून डाळभाताप्रमाणे शिजवावं. लसूण बारीक चिरावा. मिरच्यांचे लहान-लहान तुकडे करावेत. अर्धी वाटी तेल गरम करुन त्यात लसूण व मिरच्या कुरकुरीत तळाव्यात. ताटात खिचडी वाढल्यावर त्यातव हे तेल खायला द्यावं. त्यांजा जास्त तिखट हवं ते मिरच्या भातात कुस्करुन खातात.
शेव भाजी
साहित्य:-
तुरकाटी शेव 1 वाटी
(ही शेव बाजारात मिळते किंवा घरी सोडा न टाकता ही शेव घरी बनवावी)
आलं-लसूण पेस्ट 4 चमचे
भाजलेल्या कांदयाची पेस्ट अर्धी वाटी
हळद, तिखट चवीनुसार
धणे-जीरे पावडर 1-1 चमचा
तमालपत्र 4-5
भाजून वाटलेले सुकं खोबरं पाव वाटी
भिजवलेली खसखस पाव वाटी
काळा मसाला 1 चमचा
कृती:- खसखस, खोबरं, कांदयाची पेस्ट व आलं-लसूण पेस्ट एकत्र वाटून घ्या. पॅनमधे तेल घेवून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालून छान परतून घ्या. तेल सुटल्यावर हळद, तिखट, धणे-जीरे पावडर टाकून चांगले परता. थोडे पाणी घाला. चांगले तेल सुटल्यावर त्यात गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून पुन्हा गरम पाणी घालून उकळा रस्सा थोडा पातळसर ठेवा. भाजी वाढताना त्यामधे वेळेवर शेव घालून वाढा.