महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सिमित होते त्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरानी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे अध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले. लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असतांना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोटया मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माउलीकडे निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करुन गेले. कर्मठ पंडीतासमोरही ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात. उभ्या महाराष्ट्राच्या ह्या माऊलींनी केवळ २२ वर्षांचे असतांना जीवंत समाधी घेतली.