गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळांची

जय देव जय देव जय मंगलमुर्ती

दर्शनमात्रे मन कामना पुरती || ध्रुव ||

रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा

चंदनाची उटी कुमकुम केशरा

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा

रुणुझुणुती नुपुरे चरणी घागरिया

जय देव जय देव जय मंगलमुर्ती

दर्शनमात्रे मन कामना पुरती ||१||

लंबोदर पितांबर फणीवर बंधना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना

जय देव जय देव जय मंगलमुर्ती

दर्शनमात्रे मन कामना पुरती ||२||

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी |

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |

वारी वारी जन्ममरणाते वारी |

हारी पडलों आतां संकट निवारी |

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी |

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||१||

त्रिभुवनीभुवनी पाहता तुजऐसी नाही |

चारी श्रमले परंतु न बोलवे काही |

साही विवाद करितां पडिले प्रवाही |

ते तूं भक्तालागी पावसी लवलाही |

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी |

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||२||

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां |

क्लेशापासून सोडावी तोडी भवपाशा |

अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा |

नरहरी तल्लीन झाला पद्पंकज लेशा |

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी |

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||३||

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला ।

लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।

तेथुनिया जळ निर्मल वाहे झुळझुळां ।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।१।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभूतीचे उधळण शीत कंठ निळां

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।२।।

देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।

त्यामाजी अवचित हलाहल जें उठिलें ।

ते त्वां असुरपणे प्रशान केलें ।

नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।३।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदास अंतरीं ।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।४।।

श्री दत्ताची आरती १

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणा |

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा |

नेती नेती शब्द नये अनुमाना |

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||१||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ||धृ||

सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त |

अभ्याग्याशी कैंची कळेल हि मात |

पराही परतली तेथें कैचा हेत |

जन्ममरणाचा पुरलासे अंत ||२||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

दत्त येउनिया उभा ठाकला |

सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला |

प्रसन्ना होऊनी आशीर्वाद दिधला |

जन्ममरणाचा फेरा चुकविला ||३||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान |

हरपलें मन झालें उन्मन |

मीतुं पणाची झाली बोळवण |

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ||४||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता

श्री विठोबाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा |

वामांगी रखुमाई दिसे दिव्या शोभा |

पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा |

चरणी वाहे भीमा उद्धरी जागा ||१||

जय देव जय देव पांडुरंग

रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||धृ||

तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटी |

कसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |

देव सुरवर नित्य येती भेटी |

गरुड हनुमंत पुढें उभे राहती ||

जय देव जय देव पांडुरंग ||२ ||

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |

सुवर्णाची कमळे वनमाळा गळां |

राई रखुमाबाई राणीया सकळा |

ओवाळिती राजा विठोबा सावळा |

जय देव जय देव पांडुरंग ||३||

ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती |

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |

दिंड्या पताका वैष्णव नाचती |

पंढरीचा महिमा वर्णावा किती ||

जय देव जय देव पांडुरंग ||४||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती

चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती

दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती

केशवासी नामदेव भावें ओवाळिती

जय देव जय देव पांडुरंग ||५||

मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी |

करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |

कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी |

सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता

तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ||

दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द |

थरथरला धरणीधर मनिला खेद |

कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद |

रामी रामदास शक्तीचा शोध ||2||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता ||

-श्री रामदास स्वामी

रेणुका मातेची आरती

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।

वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।

तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी।

तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।

मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

महालक्ष्मीची आरती

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी

वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥

करविरपुरवासिनी सुरवरमुनि-माता

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता

कमलाकरे‍ जठरी जन्मविला धाता

सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं

झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी

शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी

गायत्री निजबीजा निगमागम सारी

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं

मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं

वारी मायापटल प्रणमत परिवारी

हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी

लिहिल्या असतील माते माझे निजभाळी

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

दत्ताची आरती २

जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता |

आरती ओवाळी तुजला, बाळ उमासुता ||

माहूरगड असे तुझे, पावन जन्मस्थान |

दर्शनास येती भक्त, गात तुझे गुणगान |

घेऊन दर्शन तुझे, मिटवती ते तहान |

कृपा करसी त्यावर, आहेस फार महान ||

गाणगापूर असे तुझे, एक वसती स्थान|

येती भक्त तुझे, करती भावे तीर्थ स्नान|

स्नान करुनी भक्त, घेतात तुझे दर्शन|

भिक्षा मागुनी गावात , करती ते भोजन||

भूतबाधा, चिंता, खूप घेऊन येती भक्तगण|

पीडा आपुल्या मिटवती, येती तुला शरण|

भक्ताच्या हृदयात असे , सदा तुझा वास|

नृसिंहवाडीस येती, त्याना लाभे सहवास||

अनुष्ठान करे वाडीस, घेती तुझे जपनाम|

समाधान पावती जेंव्हा, होई पूर्ण ते काम|

पावन स्थानापैकी एक, असते हो औदुंबर|

चुकवत नसे दर्शन, तुझे ते भक्त दिगंबर||

हजार पायऱ्या चढून, येती भक्त गिरनारास |

विसरती कष्ट देहाचे, घेताच तव दर्शनास |

कृपा तुझी आम्हावर, राहो देवा दत्तात्रया |

विसरणार नाही तुला, या तिन्ही कालत्रया ||

आरती दत्ताची ३

श्रीगुरुदत्त राजमुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती ।। धृ ।।

ब्रह्मा विष्णू शंकराचा । असे अवतार श्री गुरूचा ।।

कराया उद्धार जगताचा । जाहला बाळ अत्री ऋषीचा ।।

धरीला वेश असे यतीचा । मस्तकी मुकुट शोभे जटीचा ।।

कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत वरुनी तेणे भक्तांचे क्लेश हरूनि

त्यासी करुनी नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ।। १ ।।

गांणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेची ।

भीमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुत सुशिष्यांची ।

वाट दावूनिया योगाची । ठेव देतसे निजभक्तीची ।।

काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो ।।

तरतरतरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूल जया हाती ।। ओवाळीतो ।। ।। २ ।।

अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळीतो सौख्य कंदा

तारी हा दास न रजकंदा सोडवी विषय मोहछंदा

आलो शरण अत्रीनंदा दावी सदगुरू ब्रम्हानंदा ।।

चुकवी चौर्यान्शीचा फेरा । घालिती षडरिपू मज घेरा, गांजिती पुत्रपौत्रदारा

वदवी भजन मुखी तव पूजन करीत हे सुजन जयाचे बलवन्तावरती ओवाळीतो…

साईबाबांची आरती

आरती साईबाबा ।

सौख्यदातारा जीवा ।

चरणरजतळीं निज दासां विसावां ।

भक्तां विसावा ॥धृ॥

जाळुनियां अनंग ।

स्वस्वरुपी राहे दंग ।

मुमुक्षुजना दावी ।

निजडोळां श्रीरंग ॥१॥

जया मनीं जैसा भाव ।

तया तैसा अनुभव ।

दाविसी दयाघना ।

ऐसी ही तुझी माव ॥२॥

तुमचें नाम ध्यातां ।

हरे संसृतिव्यथा ।

अगाध तव करणी ।

मार्ग दाविसी अनाथा ॥३॥

कलियुगीं अवतार ।

सगुणब्रह्म साचार ।

अवतीर्ण झालासे ।

स्वामी दत्त दिगंबर ॥४॥

आठा दिवसां गुरुवारी ।

भक्त करिती वारी ।

प्रभुपद पहावया ।

भवभय निवारी ॥५॥

माझा निजद्रव्य ठेवा ।

तव चरणसेवा ।

मागणें हेंचि आता ।

तुम्हा देवाधिदेवा ॥६॥

इच्छित दीन चातक ।

निर्मळ तोय निजसुख ।

पाजावें माधवा या ।

सांभाळ आपुली भाक ॥७॥

आरती श्री गजानन महाराजांची

जय जय सत्-चित् स्वरूपा स्वामी गणराया।

अवतरलासी भूवरी जड-मूढ ताराया॥धृ॥

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।

स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी।

ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी।

लीलामात्रे धरिले मानव देहासी॥१॥

होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा।

करूनी “गणि गण गणात बोते”या भजना।

धाता हरिहर गुरूवर तूचिं सुखसदना।

जिकडे पहावें तिकडे तूं दिससी नयना॥२॥

लीला अनंत केल्या बंकट सदनास।

पेटविलें त्या अग्नीवांचूनि चिलमेस।

क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३॥

व्याधि वारुन केले कैका संपन्न।

करविलें भक्तांलागी विठ्ठल-दर्शन।

भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।

स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन॥४॥

गजानन महाराजांचे भजन - गण गण गणात बोते।

गण गण गणात बोते।

हे भजन प्रिय सद्गुरुतें।

या श्रेष्ठ गजानन गुरुतें।

तुम्ही आठवित रहा यातें।

हे स्तोत्र नसे अमृत तें।

मंत्राचि योग्यता यातें।

हे संजिवनी आहे नुसतें।

व्यावहारिक अर्थ न याते।

मंत्राचि योग्यता कळते।

जो खराच मांत्रिक त्यातें।

या पाठे दु:ख ते हरतें।

पाठका अति सुख होतें।

हा खचित अनुग्रह केला।

श्रीगजाननें तुम्हाला।

घ्या साधून अवघे याला।

मनिं धरून भावभक्तीला।

कल्य़ाण निरंतर होई।

दु:ख ते मुळी नच राही॥

असल्यास रोग तो जाई।

वासना सर्व पुरतिलही।

आहे याचा अनुभव आला।

म्हणूनिया कथित तुम्हाला॥

तुम्ही बसुन क्षेत्र शेगांवी।

स्तोत्राची प्रचिती पहावी।

ही दंतकथा ना लवही।

या गजाननाची ग्वाही॥

गजानन महाराजांची भूपाळी

उठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती॥

दयाळा उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती॥धृ॥

सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती॥

गेला होऊन अति आनंदित तें मी वानुं किती॥१॥

उलुक पिंगळे झाले भयभित पाहून अरुणाला।

प्राचि प्रांत तो सद्गुरुराया लालिलाल झाला॥२॥

चक्रवाक चंडोल पक्षि ते प्रभात कालाला।

सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला॥३॥

तेवीं बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी।

दर्शन देउनि तयास तारा गणु म्हणे संसारी॥४॥

आरती श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान ।

चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।

तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।

विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।

नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।

मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥

वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।

अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥

शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।

कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥

अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।

म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।

आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥

आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।

निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।

भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥

अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।

गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥

अक्कलकॊट स्वामी समर्थांची आरती

जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था ।
आरती ओवाळूं चरणी ठेवुनियां माथा ॥धृ॥

छेली खेडेग्रामीं तूं अवतरलासी ।
जगदुद्धारासाठीं राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तूं एक होसी ।
म्हणुनि शरण आलों तुझे चरणासी ॥१॥

ञैगुणपरब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्णूं लीला पामर ।
शेषादिक शिणले ।
नलगे त्या पार ।
तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार ॥२॥

देवादीदेव तूं स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ।
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारीं तूं स्वामीराया ॥३॥

अघटित लीला करूनीं जडमूढ उद्धरिले ।
कीर्ती ऐकुनि कानी चरणीं मी लोळें ।
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें ॥४॥

तुळसीची आरती

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी |
अग्रीँ शंकर तीर्थे शाखापरिवारीँ |
सेवा करिती भावें सकळही नरनारी |
दर्शनामात्रें पापें हरती निर्धारीं || १ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी |
तव दलविरहित विष्णूं राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीँ || २ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळीं जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावी सुत विनवी मजला तूं तारीं || ३ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

आरती श्रीएकनाथांची

आरती एकनाथा।
महाराजा समर्था॥
त्रिभुवनी तूचि थोर।
जगद्गुरु जगन्नाथा॥धृ॥

एकनाथ नामसार।
वेदशास्त्रांचे गूज॥
संसारदु:ख नासे।
महामंत्राचे बीज॥१॥

एकनाथनाम घेता।
सुख वाटले चित्ता।
अनंत गोपाळदासा।
धणी न पुरे आता॥२॥
===
आरती श्रीतुकारामांची
आरती तुकारामा।
स्वामी सद्गुरुधामा।
सच्चिदानंदमूर्ती।
पाय दाखवी आम्हा॥धृ॥

राघवे सागरात।
पाषाण तारिले
तैसे हे तुकोबाचे।
अभंग उदकी रक्षिले॥१॥

तुकिता तुलनेसी।
ब्रह्म तुकासी आले॥
म्हणोनि रामेश्वरे।
चरणी मस्तक ठेविले॥२॥

आरती समर्थांची

आरती रामदासा।
भक्तविरक्त ईशा॥
उगवला ज्ञानसूर्य।
उजळोनी प्रकाशा॥धृ॥

साक्षात शंकराचा।
अवतार मारूती॥
कलिमाजी तेचि झाली।
रामदासांची मूर्ती॥१॥

वीसही दशकांचा।
दासबोध ग्रंथ केला॥
जडजीवा उध्दरीले।
नृप शिवासी तारिले॥२॥

ब्रह्मचर्य व्रत ज्याचे।
रामरूप सृष्टि पाहे।
कल्य़ाण तिही लोकी।
समर्थ सद्गुरुपाय॥३॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥
प्रेमें आलिंगिन आनंदे पूजीन ।
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

मंत्र पुष्पांजलि

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासान्।
ते ह नाकं महिमान: सचंत।
यत्र पुर्वे साध्या: संति देवा:।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:।

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं
माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्।
पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिती।

तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्सावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति॥