महाराष्ट्रीय माणसासाठी कानमंत्र
१. अपयश येणे महत्वाचे नाही, पण अल्पसंतुष्टता हा एक दुर्गुण आहे.
२. ‘आमची कोठेही शाखा नाही’ हा एक गैरसमजावर आधारलो सिध्दांत आहे.
३. माणसं घडवणं, विविध ठिकाणी केंद्रं निर्माण करणं, त्यातून व्यवसाय वाढवणं, माणसं जोडणं, एकमेकांच्या सहकार्याने व्यवसाय वृध्दी करणे शक्य आहे.
मराठी माणूस आणि धंदा यांची जोडी जमणे तसे अवघडच ! आणि यदाकादचित अशी जोडी जमलीच तरी जेवढयास तेवढे पुरे अशी वृत्ती आड येते. मराठी माणसाने धंद्यात यशस्वी होऊन श्रीमंत व्हायचे स्वप्न तसे विरळच आहे. पण मराठी माणसाला हे स्वप्न पाहायचे आणि प्रत्यक्षात उतरवायचे पाठबळ ‘सॅटर्डे क्लब’ देते. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे बनू श्रीमंत’ हेच सॅटर्डे क्लबचे ब्रीदवाक्य आहे.
श्रीमंत होण्याची इच्छा बाळगणं फार गरजेचं आहे, असं सॅटर्डे क्लबची संकल्पना मांडणारे, त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष माधवराव भिडे सुरुवातीलाच सांगतात. आपल्या अनेक इच्छा, स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणे आपल्याला तेव्हाच शक्य होते जेव्हा आपल्याकडे त्यावर खर्च करण्याएवढे पैसे असतात. परंतु मराठी माणूस शक्यतो धंद्यात पडतच नाही. शिक्षण पूर्ण केल्यावर सरकारी नोकरी अथवा एखादी सुरक्षित ठिकाणची नोकरी याव्यतिरिक्त तो इकडेतिकडे बघतच नाही, झापडं लावल्यासारखं त्याच आखलेल्या मार्गाने जातो.
पण मराठी माणसांपैकी ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे अशांना एकत्र आणणे, मार्गदर्शन करणे आणि व्यवसायात यशस्वी होणे यासाठी सॅटर्डे क्लब महाराष्ट्रीय उद्योजकांना मदत करतो. महाराष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्रावर प्रेम करणारा, महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगणारा, महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणारा आणि ज्याला थोडं बहुत मराठी बोलता येतं. तसेच येथे प्रवेश मिळवण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
‘सॅटर्डे क्लब’ या संकल्पनेचे मूळ स्त्रोत श्री. माधवराव भिडे आहेत. वयाच्या ७४ व्या वर्षी माणूस निवृत्तीचे आयुष्य जगत असतो. पण माधवराव भिडे यांना मात्र सॅटर्डे क्लबच्या संदर्भात नवीन कल्पना, कार्यक्रम सुचतात आणि ते अमलात आणण्यासाठी जोमाने कामाला लागतात.
सिव्हील इंजिनियरिंग मधून पदवी घेतल्यानंतर माधवराव भिडे रेल्वेत मोठया पदावर रुजू झाले. रेल्वेत नोकरी करत असताना त्यांचे सिंधी, गुजराती, मारवाडी लोकांशी संबंध आले. त्यांच्या बरोबर राहून माधव भिडे यांना व्यवसाय कसा करायचा, यशस्वी व्यवसायाची गणितं, बांधायचे आराखडे, दूरदृष्टीने घेतलेले निर्णय जवळून बघता आले. ही लोकं जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी आपला समाज, आपल्या माणसांना धरून असतात. मराठी माणसांप्रमाणे एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती त्यांच्यात नसते हे माधव भिडे यांनी जवळून बघितलं होतं, त्यामुळे सॅटर्डे क्लबची स्थापना करण्यामागचे मूळ उद्दीष्टच महाराष्ट्रीय उद्योजकांना एकत्र आणणे आणि एकमेकांच्या सहकार्याने यशस्वी होणे हे आहे. त्यांच्या ‘भिडे असोशिएटस’ या कंपनीची भारतभर १६ केंद्रं आहेत आणि त्याचे प्रमुख सर्व ठिकाणी मराठीच आहेत. याशिवाय २४ राष्ट्रीयीकृत बँका, ५ वित्तीय कंपन्यांचे आर्थिक, औद्योगिक आणि तांत्रिक सल्लागार अशीही माधव भिडे यांची ओळख करून देता येते.
‘इंडियन इन्स्टिटयुशन ऑफ ब्रिज इंजिनियर्स’ या जगातील पूल विषयावर वाहिलेल्या एकमेव व्यावसायिक संस्थेचे माधवराव भिडे हे संस्थापक व मानद महासंचालक आहेत. माधव भिडे यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन मा. चंद्राबाबू नायडू यांनी १ कोटी रु. बाजारभावाची पीडब्लूडीच्या मालकीची हैद्राबादमधील मध्यवर्ती कार्यालयीन जागा राष्ट्रीय पूल संशोधन व विकास केंद्राला २००० साली दिली.
‘मराठी उद्योजकांना एकमेकांच्या संपर्कात आणणे, त्यांचे नेटवर्कींग उभे करणे, कमजोर व्यवसायांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि एकमेकांच्या सहाय्याने यशस्वी उद्योजक होणे’ हे माझे सॅटर्डे क्लबच्या स्थापनेमागचे उद्दीष्ट होते असं माधवराव भिडे सांगतात. ह्याच संकल्पना आणि तत्त्वांच्या आधारे त्यांनी सॅटर्डे क्लब या चळवळीची डिसेंबर २००० मध्ये स्थापना केली. स्थापनेपासूनच आपल्या उद्दीष्टांच्या बाबतीत दूरदृष्टी ठेवल्याने हा क्लब उत्तरोत्तर वाढत गेला. मराठी माणसाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे, त्यांनी एकत्र येणे, एकमेकांना मदत करणे, उद्योग क्षेत्रात आपला जम बसवणे ह्या काळाच्या गरजा ओळखून सॅटर्डे क्लबची उद्दीष्टे बनवण्यात आली आहेत. आपल्याकडे संपत्ती मुबलक प्रमाणात असेल तर समाजोपयोगी अनेक गोष्टी आपण करू शकतो. एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळ स्थापन करणे, त्याद्वारे विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे एवढयापुरतेच महाराष्ट्रीय माणसाने एकत्र न येता औद्योगिक क्षेत्रातही सहाय्य करण्याच्या दृष्टीने एकत्र येणे गरजेचे आहे.
सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून एखाद्या उद्योजकाचा उद्योगधंदा वाढण्यास मदत झाली तर त्याने आपल्या निव्वळ नफ्याच्या 15 टक्के हिस्सा सॅटर्डे क्लबच्या सामाजिक-आर्थिक निधीला द्यायचा, असा सॅटर्डे क्लबचा नियम आहे. या निधीद्वारे इतरही अनेक बुध्दीमान, उद्योगी व्यक्तींना केवळ आर्थिक पाठबळाशिवाय रखडलेले उद्योग उभारण्यास मदत केली जाते. याशिवाय महाराष्ट्रीय समाजाचा रु. १०० कोटींचा व्यवसाय निधी लवकरच उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातून महत्वाकांक्षी आणि उद्योगी व्यक्तींना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करता येऊ शकते.
सॅटर्डे क्लबच्या संदर्भात माधव भिडे यांनी एक गमतीदार किस्सा सांगितला, अमेरीकेतल्या उद्योजकाला भारतातून २००० टन खेकडे आयात करायचे होते. त्या उद्योजकाने त्याच्या अमेरीकेतल्या सल्लागाराला बोलावून घेतले. तो सल्लागार महाराष्ट्रीय होता, त्याने उद्योजकाला सांगितले की या कामात मी तुमचे २० टक्के पैसे वाचवतो. त्याने जे टेंडर बनवले त्यात त्याने कंटेनरला झाकण लावायची गरज नाही असा उल्लेख केला,कारण महाराष्ट्रीय खेकडे महाराष्ट्रीय माणसाप्रमाणे एकमेकांचे पाय ओढतात व मागे खेचतात. यामुळे उद्योजकाचे २० टक्के पैसे वाचणार होते. पण महाराष्ट्रातील ज्या गोदामातून ते खेकडे आणायचे होते, त्या गोदामात सॅटर्डे क्लबची मिटींग चालू होती. क्लबचे सदस्य तिथे जमलेल्या महाराष्ट्रीय मंडळींना सांगत होते की, एकमेकांना मदत करा, एकमेकांचे पाय ओढू नका. सॅटर्डे क्लबच्या सदस्यांचा हा उपदेश खेकडयांनी ऐकला. त्या कंटेनरमधला जो खेकडा सर्वात बलशाली होता तो इतरांना म्हणाला की, मी कंटेनरच्या कडेला पकडून उभा राहतो, तुम्ही माझे पाय धरून वर या आणि येथून पळून जा. त्याप्रमाणे एक एक करत खेकडे कंटेनरच्या बाहेर पडून गेले.
अमेरीकेला रिकामे कंटेनर पोचले. अमेरीकेतल्या उद्योजकाने आपल्या महाराष्ट्रीय सल्लागाराला बोलावून घेतले आणि बजावले की सॅटर्डे क्लबमुळे महाराष्ट्रीय उद्योजक आता एकमेकांचे पाय खेचण्याऐवजी एकमेकांना मदत करू लागले आहेत. पुढच्या वेळेस कंटेनरला दोन झाकणं लाव नाहीतर एक झाकण भेदून ते खेकडे बाहेर पडतील. सॅटर्डे क्लबची ताकद यामुळे कळून येते.
येत्या १७ आणि १८ डिसेंबरला अखिल भारतीय नाटयपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण संकुलात सॅटर्डे क्लबची जागतिक परिषद भरणार आहे. या दोन दिवसाच्या परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळया उद्योजकांचे अनुभव, त्यांनी केलेले प्रयत्न, नावारुपाला आणलेले उद्योग आणि त्यांमागचे परिश्रम आणि वेगवेगळया क्षेत्रातील उपलब्ध संधी उद्योजकांना करता येणार आहे.