एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला.
त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल.
त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर… आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.
उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.