बडबड गीते

बडबडगीतांमध्ये नाद, ठेका, अनुप्रास, सुटसुटीत व मजेशीर शब्द यांनाच विशेष महत्त्व असते.

अर्थाला फारसे महत्त्व न देता निव्वळ लयबध्द शब्दध्वनींवर भर देऊन रचलेले गीत.

अर्थ त्या मानाने गौण असतो. कित्येकदा अर्थनिरपेक्ष तालबध्दता व नादमयता हे बडबडगीतांचे प्रमुख लक्षण ठरते. त्या दृष्टीने ह्यास ‘निरर्थिका’ (नॉन्सेन्स व्हर्स) असे संबोधता येईल. तसेच व्यंगदर्शक, विनोदप्रचुर, गमतीदार आणि विस्मयजनक आशयही कित्येक बडबडगीतांमध्ये आढळतो.

इंग्रजीतील ‘नॉन्सेन्स ऱ्हाइम’ म्हणजे विनोदी वा विक्षिप्त निरर्थिका. त्याचे तर्कसंगत वा रूपकात्मक विवरण करणे अपेक्षित नसते. ही कविता मुख्यतः छोट्यासाठीच असते; पण पुष्कळदा त्यातील नादमयता, चमत्कृती हे गुण प्रौढांनाही आकर्षिक करतात. या ‘प्रौढ’ बडबडगीतांमध्ये काही खास घडवलेले अनवट शब्द; वरवर पाहता बालकांच्या बडबडीसारखे निरर्थर वाटणारे पण सहेतुकपणे योजिलेले शब्द अशीही रचना आढळते. इंग्रजी वाङ्मयातील अशी आद्य बडबडगीते एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आढळतात. एडवर्ड लीअरची काव्यरचना व चित्रसजावट असलेला द बुक ऑफ नॉन्सेन्स (१८४६) हा ⇨वात्रटिका -संग्रह हे या प्रकारातील एक आद्य उदाहरण. ल्यूइस कॅरलच्या ॲलिसेस ॲड्व्हेंचर्स इन वंडरलँड (१८६५) वथ्रू द लुकिंग ग्लास (१८७२) या पुस्तकात समाविष्ट केलेली बडबडगीते तसेच द हंटिंग ऑफ द स्नार्क (१८७६) ही प्रदीर्घ कविता इंग्रजी वाङ्मयात अजरामर आहेत. हिलरी बेलॉकचे द बॅड चाइल्ड्स बुक ऑफ बीस्ट्स (१८९६) हाही इंग्रजी बडबडगीतांचा उत्कृष्ट नमुना आहे. लॉरा इ. रिचर्ड्झचाटिर्रा लिर्रा (१९३२) हा बडबडगीतांचा अमेरिकन संग्रह प्रसिध्द आहे. बडबडगीतांचे हे उत्कृष्ठ संग्रह मूलतः जरी मुलांसाठी निर्माण झाले असले, तरी प्रौढांनाही तितकेच वाचनीय आणि आस्वाद्य वाटावेत, अशा वाङ्मयीन गुणांनी संपन्न आहेत.

बडबडगीतांचा उगम त्या त्या भाषेतील मजेदार लोकगीतांतून अनेक शतकांपूर्वी झाला असावा. घरातील स्त्रियांचे, छोट्या मुलांचे मनोरंजन करण्याचे ते एक प्रभावी साधन पूर्वी होते आणि अद्यापही आहे. परदेशातील व भारतातील सर्व भाषांतील लोकवाङ्ममयाच्या मौखिक परंपरेमध्ये बडबडगीतांना स्थान असणे त्यामुळे स्वाभाविकच वाटते. भारतातील ग्रामीण व आदिवासी भाषांतही पारंपारिक बडबडगीते आढळतात.

इंग्रजीतील नॉन्सेन्स ऱ्हाइमचा उगम इग्लंड, फ्रान्स, जर्मनी, वगैरे देशांच्या लोकसाहित्यात शोधता येतो. फेरीवाले आपला माल विकताना, किंवा वृध्द माणसे लहान मुलांना खेळवताना जे अर्थशून्य पण लयबध्द शब्दांनी गुंफलेले बोल काढीत, ते या काव्यप्रकारच्या मुळाशी असावेत. कधीकधी एखाद्या बड्या व्यक्तीची किंवा राजकारणी पुरूषाची टिंगल करण्यासाठी कोणीतरी चतुरपणाने काही पंक्ती जुळवाव्यात आणि मग त्यांचा व्यक्तिविशिष्ट संदर्भ जाऊन एक सर्वसामान्य वेगगाणे म्हणून ते लोकांच्या तोंडी बसावे, असाही प्रकार घडला. उदा., ‘ओल्ड किंग कोल । वॉज अ मेरी ओल्ड सोल।’ हे मुळात आठव्या हेन्रीच्या संदर्भात असावे; पण कालंतराने मात्र हे मुलांच्या गोष्टीतील कोण्या एका राजाबद्दलचे म्हणून नॉन्सेन्स ऱ्हाइममध्ये समाविष्ट झाले.

मराठीमध्ये मात्र बडबडीत हा एक काव्यप्रकार म्हणून अलीकडेच रूढ होऊ लागला आहे प्राचीन व मध्ययुगीन गंभीर प्रकृतीच्या काव्यपरंपरेमध्ये हा मुक्त, स्वच्छंदी व निरर्थक काव्यप्रकार रूजला नाही. मात्र एकनाथांच्या भारूडांत कुठेकुठे या चमत्कृतिपूर्ण वाटणाऱ्या काव्याचा धागा सापडतो. उदा.,‘काट्याच्या अणीवर वसले तीन गाव। दोन ओसाड, एक वसेचिना।, .. तरीही ह्या काव्याची बैठक गंभीर आध्यात्मिक रूपकाच्या जातीचीच आहे. बडबडगीते ग्रंथिक वाङ्मयात अभावानेच आढळत असली, तरी ⇨लोकसाहित्याच्या मौखिक परंपरेने चालत आलेली अशा प्रकारची मराठी गीते विपुल आढळतात. आजीबाईने मुलांना गोष्ट सांगताना मूळ दोन-चार ओळींना फोडलेले निरर्थक फाटे; वासुदेव, भुत्या, भोरप्या, वगैरे लोकांनी म्हटलेली पारंपारिक गाणी; तसेच मुलामुलींच्या खेळांमधून प्रचलित असलेली खेळगाणी यांतून या काव्यप्रकारची झलक पाहावयास मिळते.

उदा.,

‘औडक चौडक दामाडू

दामाडूचा पंचाडू

पंचाड खोड खासा

हिरवा पापड कुडकुडीत

राजघोडी व्याली

सोनपाणी प्याली

अन्य, पन्या, शेजीबाईंचा,

डावा, उजवा, हातच कन्या-’

−या गाण्याला काही अर्थ आहे का? पण मुलांना ध्वनी, ताल व लय यांचे जे आकर्षण असते. त्या आकर्षाणाला पोषक असे हे गीत असल्याचे साहजिकच मुलांच्या तोंडी चटकन बसले आणि पक्के झाले. याचप्रमाणे आईने बाळाला खेळवताना म्हटलेले –‘अडगुलं. मडगुलं-सोन्याचं कडगुळं।’

किंवा−

‘किकींच पान बाई कीकी। सागर मासा सूं सू।’,

‘अरिंग, मिरिंग लवंगा तिरिंग।’,

‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू।’

‘अटक मटक चण्णे चटक।’,

यांसारखी गाणी ही नंतर मुलांची खेळगाणी, मुलींची हादग्याची गाणी, मंगळागौरीपुढे खेळताना म्हणावयाची स्त्रियांची गाणी अशा स्वरूपात मुखोद्गतच राहिली आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे वाटचाल करीत राहिली, ती आजतागायत.

इंग्रजी अंमलात मराठी साहित्यात बालवाङ्मयास पोषक असा खेळकरपणा येऊ लागला. मिस मेरी मोर यांच्या ‘वाहवा, वाहवा, चेंडू हा।’ सारख्या खेळगाण्याबरोबरच इंग्रजीतील काही ⇨शिशुगीते (नर्सरी ऱ्हाइम) मराठीत आली व तशा प्रकारच्या कवितांची परंपरा मराठी मध्ये रूजण्यास पोषक ठरली.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुलांसाठी कविता रचणाऱ्या बऱ्याच कवीचा कल उपदेशपर आणि प्रौढांचेच विषय पण जरा सोपे करून मुलांसाठी म्हणून सांगण्याकडे असला, तरी मुलांच्या मनोभूमिकेतून व त्यांना आवडतील अशी बडबडगीतांना व शिशुगितांना वा.गो. आपटे, बा.दि. वैद्य (कल्याणकर), राजाराम बाळकृष्ण खानवलकर, दत्त कवी, ना. गं. लिमये वगैरेंनी सुरूवात केली. खावलकरांनी तर ‘हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल’ या सुप्रसिध्द इंग्रजी बडबडगीतांचा मजेशीर अनुवादही केला : ‘भिंताडावर उंच बैसला दोंदिल ढोमाजी’.. देवदत्त नायरायण टिळक, वा. गो. मायदेव, ताराबाई मोडक, सरला ताई देवधर, प्र. के.अत्रे, वि. द. घाटे, श्री. बा. रानडे व इतर अनेक मराठी साहित्यिकांनी सोपी चटकदार बडबडगीते रचली. १९६० नंतर मराठी बडबडगीतांमध्ये खूपच विविधता व टवटवी आली. राजा मंगळवेढेकर, लीलावती भागवत, विंदा करंदीकर, ना.गो .शुल्क, सुमती पायगावकर, संजीवनी, सरिता पदकी, शांता शेळके, वृंदा लिमये, अनुताई वाघ, निर्मला देशपांडे, वगैरेनी तऱ्हेतऱ्हेंची बडबडगीते रचून छोट्या मुलांना निखळ आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.

विंदा करंदीकरांच्या सशाचे कान मधील ‘हरले हप−, बसले गप, राजा मंगळवेढेकरांच्या अगडं बगडं या संग्रहातील ‘अगडं बगडं’; आरती प्रभुंच्यागोपाळगाणीतील ‘थंडीवारा फण्फण्फण्’; गो.नी. दांडेकरांचे ‘डिम्ब, डिम्ब, डिम्बाक्’ यांसारखी विशेष उल्लेखणीय बडबडगीते मुलांना उपजतच असणाऱ्या ताल, लय व ध्वनी यांच्या आकर्षणाचे भान ठेऊन खास निर्मिली आहेत, असे दिसून येते. तरीही अजून मराठी कवींचा कल विशेषकरून अर्थवाही बालगीते व शिशुगीते रचण्याकडे आहे. वाचता येऊ लागल्यानंतर ही गीते मुले स्वतःवाचून पाठ करू शकतात. पण त्या आधीच्या वयाच्या मुलांसाठी ध्वनी आणि लय यांच्या तालावर त्यांनी नाचायला, रमून जायला लावणाऱ्या बडबडगीतांचे मराठी बालवाङ्मयातील दालन आणखीही समृध्द होणे आवश्यक आहे.

शाळा सुटली, पाटी फुटली

शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली

शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली

धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली

सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली

कवी : योगेश्वर अभ्यंकर

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
“निजला तो संपला” सांगे ससा

कवी : शांताराम नांदगावकर

उंदीरमामा आणि मनीमावशी

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ऐकू आली फोनची रिंग –
कुणीच नाही फोनपाशी
उंदीरमामा बिळापाशी !

उंदीरमामा हसले मिशीत ,
टेबलावरती चढले खुषीत –

फोन लावला कानाला
जोरात लागले बोलायला –

” उंदीरमामा मी इकडे ;
कोण बोलतय हो तिकडे ? ”

– विचारले मामानी झटकन
उत्तर आले की पटकन-

” मी तुमची मनीमावशी,

कालपासून आहे उपाशी .”
– मनीमावशी भलती हुषार ,
टुणकन मामा बिळात पसार !!

पहाट झाली – सांगत कोण?
कुकुद्मच् – आणखी कोण?
विठू-विठू पोपट – आणखी कोण?
ताजं-ताजं दूध – देत कोण?
गोठयातली हम्मा – आणखी कोण?
चोरुन दूध – पितं कोण?
म्यॉव म्यॉव माऊताई – आणखी कोण?
घराची राखण – करतं कोण?
भू: भू: कुत्रा – आणखी कोण?
बागेतली भाजी – खातं कोण?
मऊ मऊ ससेभाऊ – आणखी कोण?

कोण? कोण?

पहाट झाली – सांगत कोण?
कुकुद्मच् – आणखी कोण?
विठू-विठू पोपट – आणखी कोण?
ताजं-ताजं दूध – देत कोण?
गोठयातली हम्मा – आणखी कोण?
चोरुन दूध – पितं कोण?
म्यॉव म्यॉव माऊताई – आणखी कोण?
घराची राखण – करतं कोण?
भू: भू: कुत्रा – आणखी कोण?
बागेतली भाजी – खातं कोण?
मऊ मऊ ससेभाऊ – आणखी कोण?

ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

पाऊस पडला झिम् झिम्
अंगण झाले ओले चिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवंगार.

आपडी थापडी

आपडी थापडी
गुळाची पाडी!
धम्मक लाडू
तेल काढू!
तेलंगीचे एकच पाव
दोन हाती धरले कान!
चाऊमाऊ चाऊमाऊ
पितळीतले पाणी पिऊ
हंडा-पाणी गडप!

करंगळी, मरंगळी

करंगळी, मरंगळी
मधल बोट, चाफेकळी,
तळहात – मळहात,
मनगट – कोपर,
खांदा-गळागुटी-हनुवटी,
भाताचं बोळकं,
वासाचं नळक,
काजळाच्या डब्या,
देवाजीचा पाट,
देवाजीच्या पाटावर,
चिमण्यांचा किलबिलाट.

भटो भटो

भटो भटो
कुठे गेला होतात?
कोकणात
कोणातून काय आणले?
फणस
फणसात काय?
गरे
गर्‍यात काय?
आठिळा
तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे
म्हशीला काय?
चार खंड

लव लव साळूबाई

लव लव साळूबाई, मामा येतो
झुक झुक गाडीतून – नेईन म्हणतो
अटक मटक मामी येते
छानसा बॅट-बॉल देईन म्हणते
अबरू-गबरु येतो बंटया
देईन म्हणतो-सगळया गोटया
नको-नको मी इथंच बरा
आईच्या कुशीतच आनंद खरा

चांदोबा लपला

चांदोबा लपला
झाडीत….
आमच्या मामाच्या
वाडीत….
मामाने दिली
साखरमाय….
चांदोबाला
फुटले पाय….
चांदोबा गेले
राईत….
मामाला नव्हते
माहीत….

अजुन काही बडबड गीते… 1 | 1