हुऽऽप… हुऽऽप… करत, माकड शिरले घरात ।
हु S S प… हु SS प… करत, माकड शिरले घरात ।
धडाड –धुडूम डबे पाडले, कांदे — बटाटे — घरभर विखुरले ।
T V वर जाऊन बसले, खी –खी — खी — खी हसू लागले ।
बाबांनी उगारली काठी, धावले माकडाच्या पाठी ।
माकड मुळु –मुळु रडत बसले माझ्या सोबत ।
मला सांगू लागले, आमचे जंगल तोडले ।
घर नाही उरले, हरवली पिल्ले !
राहू कसा झाडाविना ? जगू कसा अन्ना विना ? मला त्याचे दुखः कळले, मनाशी एकच ठरवले ।
एक – एक झाड लावायचं, पर्यावरण राखायच ।
माकड झाले खूपच खुश !
गेले करत हु SS प हु SS प ।
आली सुट्टी… आली सुट्टी…
आली सुट्टी… आली सुट्टी…
आली – आली – रे !
चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे …
अभ्यासाशी नकोच गट्टी, जोरदार कट्टी रे …
नाचू – गाऊ – उड्या मारू, शिट्टी वाजवू रे…
शिबीरांचा नकोच मारा, मोकाट हिंडू रे …
हिरव्या रानचा पिऊन वारा, झोके घेऊ रे …
आली सुट्टी… आली सुट्टी… आली – आली – रे !
मी कोण होणार ?
मी कोण होणार ?
मंद -मंद – वाऱ्याची झुळूक मी होणार
बंद -बंद –कळीला फुलवत राहणार ।
टप -टप पडणारा थेंब मी होणार
पट -पट मोती माळत राहणार ।
रट –रट शिजणारा तृण मी होणार
मट –मट खाणाऱ्यास तृप्त मी करणार ।
लुक -लुकता आकाश दीप मी होणार
चम -चमता प्रकाश धरतीला देणार ।
गर -गर फिरणारे चाक मी होणार
भर -भर विद्न्यानास आकार मी देणार ।
कण -कण बीज बनून मातीत मी जाणार
मण -मण धान्य बनून सुवर्णमय होणार !
थ -थ –थंडी, दे ग आई बंडी !
मुलगी
थ -थ –थंडी, दे ग आई बंडी !
खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त !
आई
थ -थ थंडी, नेसुया ग लुगडी !
खेळू फु- फुगडी, पळून जाईल थंडी !
प -प – पाढे , वाचू ध – ध धडे !
खाऊ खेळू मस्त । नको बनू सुस्त !
मुलगा
थ – थ थंडी, दे ग आई बंडी !
खाऊ मस्त मस्त, झोपून राहू सुस्त !
आई
थ – थ थंडी, घालू विजार तोकडी !
खेळू ल -ल- लंगडी ! पळून जाईल थंडी !
गिरवू बाराखडी, गाऊ गीते चिमखडी !
करू कसरत थोडी ! उभारू आरोग्याची गुढी !
पळून जाईल थंडी ! पळून जाईल थंडी !
बर्फाच्या राज्यात
बर्फाच्या राज्यात किती गमती जमती,
चला चला मुलांनो चला संगती !
फर चा कोट चढवू अंगावरती,
गम बूट घालू, काठी धरू पुढती !
पांढरा शुभ्र याक, खूप खूप केसाळ,
अंगावर त्याच्या बर्फ आहे फेसाळ !
लाल लाल सफरचंद टप टप पडती,
पहाडी माणसाच्या गालावर खुलती !
बटाट्यांचा येथे आहे बर सुकाळ,
बर्फाच्या अंगणात नाचतात सर्वकाळ!
चिकू सारखे दिसते ते ‘किवी’ फळ,
आंबट – गोड गर खाऊन काढूया पळ !
देवदार – चिनार ची हिरवी-हिरवी शाल,
बर्फमय बुट्ट्याची किमया विशाल !
हिमनदी आहे जणू दुध- गंगा,
डोळे भरून पाहूया करू नका दंगा !
सोनेरी किरणे शिखरावरती,
हिम-मोती झेलुया अंगावरती !
बर्फाच्या राज्यात किती गमती जमती,
चला मुलांनो चला संगती !
असं हे बालपण
बोलक पसरून खुदुखुदु हसायचं,
भोकाड पसरून धो-धो रडायचं !
घर-भर फिरायचं, हव ते मागायचं,
कोणालाच नाही जुमानायचं,
असं हे बालपण ! असं हे बालपण !
गोड गोड गोजिरवाणी !
देवाजीच सुंदर लेण !
बाळ आणि माकड
बाळ म्हणे खादाडखाऊ
माकड म्हणे तुझाच भाऊ !
माकड खाई शेंगा,बाळ दाखवी ठेंगा !
घेई बाळ काठी,धावे माकडा पाठी !
हु s प, हु s प, हु s प
उड्या मारी खूप खूप !
हसत नाचत गाऊया
ढम -ढम -दम-ढम -ढोल वाजे टीम टीम टिमकी । हसत नाचत गाऊ सारे घेऊ गिरकी हो— घेऊ गिरकी —
श्री गणेश । जय गणेश । घण -घण -घण -घण घंटा वाजे वाजे चौघडा वाजे चौघडा ।
हासत नाचत गाऊ सारे घालू कोंबडा हो– घालू कोंबडा — श्री गणेश ।
जय गणेश । डम -डम -डम -डम डफरी वाजे छुन -छुन पैंजण हो — हो — छुन छुन पैंजण । हासत नाचत गाऊ सारे घेऊ रिंगण — श्री गणेश । जय गणेश ।
चीप-चीप चीप चीप -चिपळी वाजे टीम-टीम- संबळ हो टीम टीम संबळ ।
हासत नाचत गाऊ सारे घालू गोंधळ -हो — घालू गोंधळ — श्री गणेश ।
जय गणेश । तीरी -किटी -धा तीरी – किटी – धा मृदुंग वाजे वाजे तिकडी हो — वाजे तिकडी ।
हासत नाचत गाऊ सारे घालू फुगडी – हो घालू फुगडी — श्री गणेश । जय गणेश ।
ढिंग -टाक -ढिंग -टाक दीमटी वाजें वाजती चाळ हो वाजती चाळ ।
हासत नाचत गाऊ सारे खेळू नवे खेळ हो — खेळू नवे खेळ — श्री गणेश जय गणेश ।
ढण -ढण -ढण -ढण मशाल पेटे –करू जागर हो — करू जागर ।
हासत -नाचत गाऊ सारे करू गजर हो — करू गजर — श्री गणेश ।जय गणेश ।
श्री गणेश । जय गणेश ।
गोपाळकाला
कुस्करा करा भाकरीचा । त्यावर गोळा लोण्याचा ।
कांदा चीरुया बारीक । काकडी कापूया सुरेख ।
लिंबाचे लोणचे मजेदार । खाराची मिरची चटकदार
पोहे मुठभर हळूच घेऊ । दाणे चुरमुरे खिशात भरू ।
कोथिंबीर चिरू खसा- खसा । लाह्या फुटाणे घालू भसा-भसा ।
नको पिझा बर्गर । नको तवा भाजी ।
वाटी हवी दह्याची ।
संगत बाल गोपाळांची । मजा लुटुया काल्याची ।
घड्याळ दादा
घड्याळ दादा — घड्याळ दादा –जरा थांब थांब !
सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग !
तुझा एक हात आहे खूप -खूप मोठा
मिनटा-मिनटाला टोचे वेळेचा काटा
तुझा दुसरा हात आहे छोटा छोटा
पण तासाची गणिते करतो पटा -पटा
मोजतोस तू फक्त एक-ते – बारा आहेस ढ गोळा !
आमच्या आळसावर मात्र सतत तुझा डोळा !
हसतोस फक्त गोड-गोड बसून भिंतीवर !
सारे जग मात्र चाले तुझ्या तालावर !
जाऊ का ग आई खेळायला?
पावसाची सर आली बोलवायला,
जाऊ का ग आई खेळायला?
गर गर गिरकी मारायला . . .
भर भर गारा वेचायला !
जाऊ का ग आई खेळायला ?
पाण्यात नावा सोडायला
अन टप टप तालावर नाचायला
जाऊ का ग आई खेळायला ?
आरोग्याला सांभाळायचे
चालायचं हो चालायचं,
नाही कधीच थाबायचं !
आरोग्याला सांभाळायचे,
व्याधींना टा टा करायचे !
दोन पायांची गाडी,
उभारू गुढी !
आता मी धावणार
मोहोर लाजत लाजत हळूच सांगतो . . .
आता आंबा येणार, आता आंबा येणार !
बाळ पाऊल टाकत . . . टाकत हळूच सांगतो . . .
आता मी धावणार, आता मी धावणार !
वा–छान
रवी किरणे खोडसाळ
उठवती राजस लडिवाळ
देती हाती ब्रश रंगीत
घाला त्यावर पेस्ट गंधित
लेफ्ट – राईट लेफ्ट -राईट –(२)
करा सारे दात व्हाईट —( २)
खूळ — खूळ -खूळ — खूळ चुळा भरा
मित्राला नमन करा सूर्य म्हणे वा — छान!
आरोग्याचे देई दान ! ! !
या रे सारे – सारे गिरवू मुळाक्षरे
या रे सारे – सारे
गिरवू मुळाक्षरे . . .
वेचू एकेक अक्षर
बनवू शब्द सुंदर
शब्दांची झुकझुकगाडी
भाषेची लावी गोडी ।
कसं होणार या चांदोबाच?
आईचं बोट सोडून, एकटाच फिरतो ।
अंधारात चांदण्यांशी लपाछपी खेळतो ।
अंगाई गीत ऐकूनही जागाच राहतो ।
कधीच कोणाला घाबरत नाही ।
कसं होणार या माझ्या चांदोबाच, कळतच नाही ।
बाळ लागलं नाचायला
मोहोर आलाय आंब्याला
कैरी लागली डोलायला
पाणी सुटल तोंडाला
बाळ लागलं नाचायला
फुलपाखरु छान किती दिसते
फुलपाखरू
छान किती दिसते
फुलपाखरू ।।धृ।।
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते
फुलपाखरू ।।१।।
पंख विमुकले निळे जांभळे
हालवुनी झुलते
फुलपाखरू ।।२।।
डोळे बारिक करिती लुकलुक
गोल मणी जणु ते
फुलपाखरू ।।३।।
मी धरू जाता येइ न हाता
दूरच ते उडतें
फुलपाखरू ।।४।।