हंबीरराव मोहिते
हंबीरराव मोहिते (शिवाजी महाराजांचे सरसेनापती – नेमणूक : इ.स. १६७४) हे शिवाजी महाराजांचे एक सैन्यप्रमुख होते.
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळतात.
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजीशी लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजीपुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे झाले.
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून. नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बर्हाणपूर, वर्हाड, माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला. यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. अशीच १ तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ‘ कान्होजी मोहिते हंबीरराव’ अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव ‘किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक विराची आहे. परंतु जनमानसात असा समज आहे की ती तलवार ‘ सरसेनापती हंबीरराव मोहिते ‘ यांची आहे.
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजीला गोवळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नंतर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते.
शंभूराजेंच्या पाठीशी खंबीर मामा हंबीर
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपूरचा विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बहाद्दुररखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.
स्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा!