महात्मा जोतिबा फुले,सावित्री बाई फुले
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले.
जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले.
लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर १८४० मध्ये जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून ५ किमी.वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला.
सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असतानाजोतीरावांनी अनेक मित्र मिळविले.
सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले. जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली.
द राइट्स ऑफ मॅन (१७९१-९२) या टॉमस पेन (१७३७-१८०९) याच्या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केली; मानवी समतेचा आणि स्वातंत्र्याचा ध्येयवाद आत्मसात केला. या तत्त्वांच्या आधारे ते भारतीय समाजाचे, विशेषतः हिंदू समाजाचे, उत्कृष्ट चिंतन करू शकले. संस्कृत ग्रंथही त्यांनी वाचले.
वेद, स्मृती, पुराणे यांच्यातील कथांचा अभ्यास केला. अश्वघोषाच्या नावावर प्रसिद्ध असलेले वज्रसूची हे उपनिषद त्यांना फार आवडले. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा खोटा आहे, हे तत्त्व स्पष्ट रीतीने मांडले आहे. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘विप्रमति’ या प्रकरणाचा त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला. त्यांनी एका ठिकाणी स्वतःचा‘कबीर साधूच्या पंथाचा’ असा निर्देश केला आहे. अशा चिंतन मननाने त्यांची भारतीय समाजक्रांतीची विचारसरणी तयार झाली. जगातील क्रांतिकारकांच्या नेत्यांमध्ये शोषित समाजातून पुढे आलेले यांच्यासारखे नेते फार थोडे, कार्ल मार्क्स, लेनिन इ. मध्यमवर्गीय नेते कामगारक्रांतीचे पुरस्कर्ते झाले. फुले, आंबेडकर हे शोषित समाजातून निर्माण झाले. हे त्यांचे वैशिष्ट्य होय.
जोतीरावांनी आपल्या विचारांचा एक सुबोध व सुंदर, सूत्रबद्ध सारांश सांगितला आहे – ‘‘विद्येविना मति गेली; मतीविना नीति गेली; नीतीविना गति गेली! गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले.’’ त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्याचा आसूड (१८८३) मध्ये प्रारंभी सांगितला आहे. त्यांच्या सगळ्या सत्यशोधक चळवळीचा भावार्थ यात आला आहे. प्रचलित हिंदू धर्मसंस्था, त्यावर आधारलेली हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासनसंस्था व सर्वांचा समुच्चित परिणाम म्हणजे शूद्र शेतकऱ्यांचे आणि दलितांचे सध्या दिसणारे अपार दैन्य होय;
या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्याकरिता त्यांनी लोकशिक्षण हाच मुख्य उपाय होय, असे ठरविले. अज्ञानग्रस्त शूद्र, अतिशूद्र जसे ब्राह्मणादी वरिष्ठ वर्गाच्या दास्यात खितपत पडले आहेत त्याचप्रमाणे स्त्री जातदेखील पुरूष वर्गाच्या दास्यात युगानुयुगे सापडली आहे; हे लक्षात घेऊन जोतीरावांनी मुलींसाठी एक शाळा स्थापन केली (१८४८). त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी होता. जातिभेदाची आणि पवित्र रूढींची बंधने अंधश्रद्धेने पाळीत होता. त्यास फार थोडे अपवाद होते.
सुधारकांना स्वतःचे कुटुंब, स्वतःची जात-जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाळीत टाकीत. जातिबहिष्काराचे असहाय असे दडपण क्रियावान सुधारकांना सोसावे लागले; जिवलग नातेवाईकांचा विरोध होत असे. उदा., जोतीरावांचे वडील गोविंदराव यांनी मुलगा व सून यांना घराबाहेर काढले आणि खुद्द माळी समाजाने नाना प्रकारे अवहेलना चालू केली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन जोतीराव व सावित्रीबाई यांची समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी दोन शाळा काढल्या (१८५१).
अस्पृश्यांसाठी शाळा काढली. या त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाजसुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. १८५२ मध्ये सरकारी विद्या खात्याकडून मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली जोतीरावांच्या शिक्षणकार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
त्यावेळचे सर्वच भारतीय समाजसुधारक हे स्त्रियांची दास्यातून आणि दुःस्थितीतून सोडवणूक करण्याकरता प्रयत्नशील झाले होते. हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवाविवाह निषिद्ध मानला होता. बालपणी आणि वारंवार उद्भवणाऱ्या प्राणघातक साथींच्या रोगांमुळे पतिनिधन होऊन तरूणपणीच वैधव्य आलेल्यांची संख्या मोठी होती. केशवपन केल्याशिवाय विधवा ही अपवित्र मानली जात होती. समाजाची आणि कुटुंबाची त्यांच्यावर करडी नजर असे.
बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरिता पुनर्विवाहाची चळवळ सुधारकांनी सुरू केली. या चळवळीला जोतीरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता. तारुण्यकाली स्वाभाविकपणे वासनेला बळी पडलेल्याविधवांची फार विटंबना होत होती. गर्भपाताचे प्रयत्न होत, जन्मलेल्या बालकांची हत्याही होई. त्यांना संरक्षण देण्यासाठी फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली (१८६३). या गृहात अशा स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय केली होती. जोतीरावांनी पुढे जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक म्हणून घेतला तो काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता न्हाव्यांचा संपही घडवून आणला.
अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणेचालना दिली. अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही एक अत्यंत गंभीर अशी कायमची समस्या लक्षात घेऊन आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला.
महाराष्ट्रातील तत्कालीन भिन्न मतांच्या व विचारसरणींच्या समाजसुधारकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये जोतीरावांचा सहभाग नेहमीच असे. उदा., आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती (१८२४-८३) यांची पुणे येथे महादेव गोविंद रानडे (१८४२-१९१०) प्रभृती सुधारकांनी मिरवणूक काढली. त्याचे पुढारीपण जोतीरावांनी केले. उलट जीर्ण मतवादी रूढीनिष्ठांनी या मिरवणुकीची थट्टा व विडंबन करण्याकरिता गर्दभानंदांची दिंडी सुरू केली (१८७५).
फुले हे १८७६-८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. समाजाच्या मौलिक परिवर्तनाकरिता समाजरचनेतील धर्मभेदमूलक विद्वेष, जातिभेदमूलक उच्च-नीच भाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तिपूजा, संस्कृत भाषेतील कर्मकांड इ. गोष्टींचे उच्चाटन करून समताप्रधान समाज निर्माण करण्याकरिता व अंधश्रद्धेचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती करण्याकरिता ⇨ सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ मध्ये फुले यांनी केली.
या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक सदस्य व्हावेत, अशी योजना केली होती. फुले यांनी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्यावेळच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणांचे धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्व होते.
धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजन समाजाची पिळवणूक चालली होती. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज सापडला होता. या हिंदू धर्माच्या पारलौकिक विचारसरणीचा प्रवर्तक व समर्थक वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. बहुजन समाजावर ब्राह्मणांनी लादलेली ही मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याकरिता ब्राह्मणांचे कसब (१८६९), गुलामगिरी (१८७३), सत्सार (अंक १ व २, १८८५) इ. निबंध लिहिले. या निबंधांमधून पुराणातील अवतारांच्या कथांचा ऐतिहासिक दृष्टीने उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्य ब्राह्मण हे
मूळचे इराणचे, त्यांनी भारत जिंकला आणि येथल्या तथाकथित शूद्रातिशूद्र शूर जमातींना जिंकून त्यांना धार्मिक कर्मकांडाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सामाजिक व आर्थिक शोषण केले व ते आतापर्यंत चालू राहिले, असा भावार्थ काढला आहे. श्रमिक बहुजन समाजाच्या आर्थिक अवनतीचे उत्कृष्ट चित्र शेतकऱ्याचा आसूड या विस्तृत निबंधामध्ये फुले यांनी रेखाटले आहे.
ही शेतीच्या आर्थिक दुरवस्थेची समस्या अजूनही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ३२ वर्षे होऊन गेली तरी सुटलेली नाही. या निंबधामध्ये भारतीय ग्रामोद्योग किंवा कुटिरोद्योग ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या आर्थिक धोरणाने कसे ढासळले आहेत, याचेही हृदयविदारक वर्णन केलेले आहे. शेतीचा धंदा आधुनिक तंत्रविज्ञानावर उभारावा आणि ग्रामीण उद्योगांना आधुनिक तंत्रविद्येचा आधार द्यावा, अशी उपाययोजना फुले यांनी या निबंधात सुचविली आहे.
सुमारे १०० वर्षांपूर्वी लिहिलेला हा विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतो, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या निंबधात (मृत्यूनंतर प्रसिद्ध, १८९१) फुले यांनी आपल्या समग्र विचारांचे सार असलेल्या विश्वकुटुंबवादाची सुसंगत मांडणी केली आहे. हा निबंध लिहीत असताना त्यांना पक्षाघात झाला होता. अशा विकलांग अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पुरा केला.
यात स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मुलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी, हे सांगितले आहे. ज्या तत्त्वांच्या आधारावर अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती झाली तीच तत्त्वे या पुस्तकात भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली आहेत. यात सांगितलेला सत्यधर्म हा ‘यूटोपिया’च होय.
जगातल्या मोठमोठ्या सामाजिक व राजकीय क्रांत्या युटोपियन ध्येयवादाने प्रेरित झालेल्या दिसतात. फुले म्हणतात-‘‘स्त्री अथवा पुरूष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मताच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे, या सर्व स्री पुरूषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून वागावे.
इतकेच काय, एकाच घरात बौद्ध धर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म.’’ यात आर्थिक समता सूचित केली आहे आणि सर्वधर्मी समभाव स्वच्छ रीतीने मांडलेला आहे.
फुले यांनी अखंडादि काव्यरचना (१८६९) केली आहे आणि काही काव्यरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्येही अखेरीस घातली आहे. यात निर्मात्याने केलेल्या विश्वरचनेबद्दल जिव्हाळा प्रकट झाला आहे. शब्दकळा रसाळ आहे.
महात्मा फुले हे उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी आपल्या लेखनातूनही सुधारणाविषयक विचारच समाजासमोर ठेवले. त्यांनी तृतीय रत्न (नाटक), छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म (ग्रंथ) या लेखनाबरोबरच ’अखंड’ (काव्य) रचनाही केली. (महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांचा उल्लेख वरील मजकुरात आला आहे.)
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
या रचनेतून त्यांची निरीक्षणशक्ती, नेमकी जाणीव व प्रतिभा स्पष्ट होते.
जोतीराव फुले यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई ( १८३१-९७) यांनी अनन्यभावाने आयुष्यभर सहकार्य दिले. स्त्रीमुक्तिआंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास त्यांची दखल जरूर घेईल. जोतीरावांची सगळी विचारसरणी त्यांनी आत्मसात केली होती, जोतीरावांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली. त्यांनी काव्यरचनाही केली आहे. काव्यफुले (१८५४), मातुश्री सावित्रीबाई भाषणे व गाणी (१८९१), बावनकशी सुबोधरत्नाकर(१८९२), जोतिबांची भाषणे (१ ते ४-संपा.) इ. त्याचे उपलब्ध साहित्य आहे.
जोतीरावांचे इतर वाङ्मय पुढीलप्रमाणे आहे : छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा (१८६९), हंटर-शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन (मूळ इंग्रजी-१८८२),इशारा (१८८५).
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महारष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्हातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री हि कन्या जन्मली . त्याची हि एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची परत होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जरात सुरु केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून ज्योतिबा बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या होत्या .
सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी ज्योतीबाशी विचार्मिनय करून यशवंतलाच दत्तकच घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.
ज्योतिबाबरोबर सावित्रीबाईंना विवाह झाल्यावर त्यांना तत्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली ज्योतिबाच्याच मानाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ केला होता. ज्योतीबांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबद्च विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य . पण ज्योतीबाच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यमुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच म्हणजे सावित्रीबाईन पासूनच केला. शेतात करतांनाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .
१४ जानेवारी १८४८ साली ज्योतीबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बाय्कैनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.
पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.
सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृतू आला. समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो