थोरला माधवराव पेशवा
(१६ फेब्रुवारी १७४५–१८ नोव्हेंबर १७७२), मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब व गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा. त्याचा जन्म सावनूर (धारवाड जिल्हा) येथे झाला.गोपिकाबाई या हुशार व बुध्दिमान मातेच्या मार्गदर्शनाखाली त्याचे लेखनवाचनादी शिक्षण पार पडले. थोरला भाऊ विश्वासराव यांच्या पानिपत येथे झालेल्या अकाली मृत्यूमुळे बाळाजी बाजीरावाच्या मृत्यूनंतर (२३ जून १७६१)त्यास २० जुलै १७६१ रोजी म्हणजे थोरला माधवराव जवळ-जवळ एक महिन्याने सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीची दोन अडीच वर्षे पेशवा वयाने लहान म्हणून चुलता राघोबादादा ऊर्फ रघुनाथराव राज्यकारभारावर देखरेख करी.
पानिपतच्या अनर्थामुळे चाहोंकडून शत्र उठले होते. याशिवाय खुद्द पुण्यात गृहकलह व रघुनाथराव आणि सखारामबापू बोकीलांप्रमाणे त्यांचे साथीदार या अंतर्गत शत्रूंनी सत्तेसाठी संघर्ष आरंभला होता. निजाम, नागपूरकर भोसले, हैदर अली यांच्या पेशवाईविरुद्ध हालचाली सुरु झाल्या होत्या. निजामाने दोनदा पुण्यापर्यंत मजल मारली. निजामाचे साहाय्य पुढेमागे आपणास मिळावे, म्हणून राघोबाने त्याचा पूर्वी जिंकलेला सर्व प्रदेश त्यास परत केला. एवढ्याने निजामाचे समाधान होईना, तेव्हा त्याने पेशव्यांकडील मातबर सरदार-पटवर्धन, प्रतिनिधी,नागपूरकर भोसले-यांना फोडून पुन्हा पुण्यावर चाल केली. यावेळी पेशव्यांच्या कुटुंबियांना सिंहगड व लोहगड यांचा आश्रय घ्यावा लागला. पण माधवरावाने खुद्द निजामाच्या प्रदेशावर हल्ले चढविले आणि तो भागानगरवर (हैदराबाद)चालून गेला. त्याने तो प्रदेश लुटला. ही बातमी निजामास कळताच तो माघारी फिरला; पण मराठ्यांनी त्यास गनिमी युद्धतंत्राने वाटेत जेरीस आणले. अखेरमाधवरावाने हुलकावण्या देत गोदावरी तीरावर राक्षसभुवन येथे त्याच्याविभागलेल्या मोगल फौजांस गाठले आणि त्याचा दारुण पराभव केला (१० ऑगस्ट १७६३). या युद्धात दिवाण विठ्ठल सुंदर मरण पावल्याने निजाम हताशझाला. पुढे १७६३ च्या सष्टेंबरमध्ये तह होऊन पेशव्यास गेलेला सर्व प्रदेश मिळाला. या युद्धाच्या वेळी रघुनाथारावाने गृहकलह विसरून सहकार्य दिले; पणमाधवरावाने राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतर माधवरावाने हैदरच्या बंदोबस्ताचे काम हाती घेतले आणि कर्नाटकावर स्वाऱ्या केल्या.म्हैसूरचे राज्य बळकावून हैदर अली मराठ्यांच्या मांडलिक जहागीरदारांना उपद्रव देऊ लागला होता. तो पेशव्यांच्या तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कर्नाटकप्रांतावर चालून आला. माधवरावांनी १७६४ मध्ये सावनूरजवळ रटेहळ्ळी आणि कारवारच्या जंगलात हैदरचा पाडाव केला. पुढे १७६५ मध्ये ही मोहीमचालू राहून धारवाड, जडे, अनेवाडी वगैरे ठाणी घेण्यात आली. हैदराने ३२ लक्ष रुपये खंडणी देऊन तुंगभद्रेपर्यंतचा सावनूर, गुत्ती, बंकापूर आदीमराठ्यांचा सर्व मुलूख सोडला (मार्च १७६५). या मोहितांत आनंदराव रास्ते, महिपतराव कवडे, गोपाळराव पटवर्धन, आबा पुरंदरे, त्रिंबकराव पेठे,विंचुरकर इत्यादे सरदारांचे फार मोठे सहकार्य लाभले. पुन्हा हैदरविरुद्ध दुसरी मोहीम १७६७ च्या जानेवरीमध्ये चालू करुन मराठ्यांनी मदगिरी, भैरवगड, देनरायदुर्ग, कोलार इ. महत्त्वा ची ठाणी काबीजकेली. तेव्हा हैदरने तह केला (मे १७६७). ५ मार्च १७७१ रोजी श्रीरंगपट्टणजवळ मोतीतलाव येथे हैदरच्या सैन्याला गाठून तिसऱ्या स्वारीत मराठ्यांकडीलत्रिंबकराव पेठे याने त्याचा सपशेल पराभव केला. या युद्धाच्या वेळी हैदर अली कसाबसा वेश पालटून पळून गेला. अन्यथा या लढाईच्या वेळी मराठ्यांनाहैदरचा कायमचा बंदोबस्त करण्याची संधी लाभली होती.
नागपूरकर भोसले आपणास छत्रपतीसमान मानीत आणि राज्याच्या कोणत्याही कामगिरीत विरोध करीत. जानोजी भोसल्याने तर पेशव्यांविरुद्ध उचापतीसुरु केल्या. तेव्हा माधवरावाने त्याचा ऑक्टोबर १७६५ मध्ये पराभव करुन खलपूरचा तह केला; तथापि भोसले आपली नागमोडी चाल सोडीनात. तेव्हा१७६८ मध्ये त्याच्याविरुद्ध पुन्हा युद्ध करुन भंडारा, पाचगव्हाण इ. ठाणी घेतली. जानोजीला चिनूरच्या जंगलात पेशव्यांच्या फौजांनी वेढले. शेवटीगोदावरी आणि मांजरा यांच्या संगमाजवळ कनकापूर येथे तह झाला (२३ मार्च १७६९). जानोजीने पेशव्यांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन पाच लक्ष रुपयेखंडणी, पेशव्यांच्या मोहिमेत हजर राहण्याचे आणि परराष्ट्राशी कारस्थान करणार नाही असे वचन दिले.
उत्तरेकडील राजेरजवाडे मराठी सत्तेविरुद्ध उठले होते. इंग्रजांनी बंगाल, बिहार, ओरिसा बळकावला. १७६६ मध्ये माधवराव पेशव्याने आपल्याचुलत्यास – राघोबास – उत्तर हिंदुस्थानात पाठविले; पण गोहदच्या किल्ल्याभोवती मराठी फौजा अडकून पडल्या. राघोबा दक्षिणेस १७६७ मध्ये परतला, तेव्हा जवाहीरसिंग जाट राजाने मराठ्यांची बुंदेलखंडातील सर्व ठाणी उठविली. तेव्हा १७६९ मध्ये रामचंद्रगणेश आणि विसाजी कृष्ण यांच्या हाताखाली मोठे सैन्य देऊन त्यांना उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता पाठविण्यात आले. जाट राजाचाएप्रिल १७७० मध्ये पाडाव झाला. १७७० मध्ये पुढे वर्षभर रोहिल्यांच्या विरुद्ध मोहीम चालवून इटावा, फर्रुखाबाद, नजीबाबाद वगैरे रोहिल्यांची ठाणीघेऊन मराठ्यांनी पानिपतचे अपयश धुऊन काढले. शाह आलम बादशाह इंग्रजांकडून मराठ्यांकडे आश्रयास आला. त्याला ६ जानेवारी १७७२ रोजीतख्तनशीन करण्यात आले. पुढे पेशवा नोव्हेंबरात मृत्यू पावल्यामुळे उत्तरेकडील फौजा परतल्या; पण तुकोजी होळकर व महादजी शिंदे उत्तरेतचअसल्याने मराठ्यांच्या हालचाली अगदीच विफल ठरल्या नाहीत. माधवराव पेशव्याने मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली; पण उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व त्याला म्हणावे तसे प्रस्तापित करता आले नाही; मात्रअहिल्यादेवी होळकरां ना त्याने सन्मानाने वागविले आणि उत्तर हिंदुस्थानातील सरदारांवर वचक बसविला. तसेच राज्यात नि:पक्षपाती न्यायपद्धतीनिर्माण करुन प्रजाहिताच्या अनेक गोष्टी केल्या. कडक कारभारामुळे भ्रष्टा चार-लाचलुचपतीला आळा बसला; तथापि रघुनाथरावाच्या भांडणामुळे त्यालामराठेशाहीमध्ये एकी टिकविणे कठीण झाले; तरीही त्याने प्रसंगोपात्त राज्ञतेमामांनाही आपल्या शिस्तबद्ध कारभाराची चुणूक दाखविली आणि प्रत्यक्षमातोश्री गोपिकाबाईचा रोष ओढवून घेतला. आकस्मित बळावलेल्या क्षय रोगाने त्याची शारीरिक क्षमता खंडित झाली आणि याच आजारात तो थेऊर येथेऐन तारुण्याच्या उमेदीत मरण पावला. माधवरावाचे खाजगी जीवन मराठी शिपायीगड्याप्रमाणे साधे होते. त्याचे वयाच्या आठव्या वर्षी २ डिसेंबर १७५३रोजी शिवाजी बळ्ळाल जोशी यांच्या शीलवती या मुलीबरोबर पुण्यात लग्न झाले; तथापि पेशवे झाल्यानंतर त्याला सततच्या स्वाऱ्यांमुळे फारसे कौटुंबिकसुख लाभले नाही. एक-दोन स्वाऱ्यांत त्याने पत्नी रमाबाईस बरोबर घेतले होते. त्यांना संतती झाली नाही. यामुळे रमाबाई पेशव्याच्या इच्छेनुसार सतीगेली. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्रयाचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतरराज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षमप्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.