संस्कृत सुभाषिते – १

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |

सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

अर्थ : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर [मृताला] जाळते

विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |

आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||

अर्थ : शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या [ज्ञान] दोन्ही विद्या कीर्ति मिळवून देणाऱ्या आहेत [परंतु] पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते.

नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् |

आपत्स्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ||

अर्थ : विद्वान् माणसे न मिळण्याजोग्या [अशक्य] गोष्टीची इच्छा करीत नाहीत, नाश पावलेल्या गोष्टीबद्दल दुःख करीत नाहीत आणि संकटकाळी डगमगत नाहीत.

नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् , नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |

नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||

अर्थ : [खूप] कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. [विसरल्यामुळे] गेलेली विद्या अभ्यास करून [पुन्हा] मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ [वाया] घालवला तर तो गेला तो गेलाच. [वेळ वाया घालवण टाळावं]

यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |

निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||

अर्थ : ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे [मोठे] वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.

वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषतः |

प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत्||

अर्थ : ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.

अवज्ञात्रुटितं प्रेम नवीकर्तुं क ईश्वरः |

सन्धिं न यान्ति स्फुटितं लाक्षालेपेन मौक्तिकम् ||

अर्थ : अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा निर्माण करण्यास कोण बरे समर्थ आहे? [एखाद्याचा अपमान झाल्यावर त्याच्याशी पुन्हा जवळीक होत नाही] जसे फुटलेले मोती लाखेच लेप लावून सांधता येत नाहीत.

श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |

न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||

अर्थ : उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.

यथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति |

तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ||

अर्थ : ज्याप्रमाणे कुदळीने [सतत] खणत राहणाऱ्या मनुष्याला [विहिरीचे] पाणी मिळते, त्याप्रमाणे गुरूंची [निष्ठेने] सेवा करणाऱ्या [व त्यांच्याकडून विद्या मिळवू इच्छिणाऱ्या] विद्यार्थ्याला गुरुकडे असलेली विद्या मिळते.

त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |

रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

अर्थ : हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे [न थांबता, सतत ] समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक [दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच] विचार येवो

विपदः सन्तु नः शश्वत्तत्र तत्र जगद्गुरो |

भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् || कुन्ती भागवत १स्कन्ध ८ अध्याय.

अर्थ : हे या जगात श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णा, आम्हाला सतत संकटे येवोत [कि ज्यामुळे तुझे स्मरण होईल व त्यामुळे ] जन्ममृत्यूचा फेरा संपवणारे तुझे दर्शन होईल.

परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् |

परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् || युधिष्ठिर महाभारत

अर्थ : एकमेकात भांडण झाल्यास, आपण [पांडव] पाच आणि ते कौरव शंभर आहेत. पण दुसऱ्या [शत्रूशी] युद्ध असताना आपण एकशे पाच [पांडव अधिक कौरव] आहोत.

गुणेष्वनादरं भ्रातः पूर्णश्रीरपि मा कृथाः |

सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः ||

अर्थ : हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे [संवर्धन करण्यात] दुर्लक्ष करू नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने] पूर्ण भरला असला तरी गुण [गुण किंवा पोहोऱ्याचा दोर] तुटल्यास खाली कोसळतो.

जगतीह बन्धुभावं विजयं जयं च लभताम् |

मम राष्ट्रमानचिह्नं राष्ट्रध्वजं नमामि ||

अर्थ : या जगामध्ये बंधुभाव [प्रेम] पसरो. [सत्याचा निश्चितपणे] विजय होवो. [मी] राष्ट्राचे मानचिह्न असणाऱ्या राष्ट्रध्वजाला वन्दन करतो.

अकुतोभयं मनो मे, त्वयि नित्यमेव रमताम् |

सत्यं शिवं च हृद्यं , लब्धुं सदा प्रयतताम् ||

अर्थ : अत्यंत निर्भय असे माझे मन तुझ्या [निरीक्षणात] नेहमी आनंदी होवो नेहमी शाश्वत सत्य, मनोहर कल्याण मिळवण्याचा प्रयत्न करो.

मरुता प्रकम्पमानं, उच्चैर्विराजमानम् |

रुचिरं त्रिवर्णकान्तं, राष्ट्रध्वजं नमामि ||

अर्थ : तेजस्वी अशा, तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या, [खूप] उंचावर वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाला मी वन्दन करतो.

कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् |

परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः ||

अर्थ : कावळ्यांच्या घरट्यात काव काव चालू असताना, कोकीळपक्षाचे कुहू कुहू गायन शोभून दिसते काय? [ते लोपून जाते तसंच] दुष्ट लोक परस्परांशी बोलत असताना विचारी माणसाने गप्प बसावे. [त्यांचा फक्त अपमान होईल]

अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |

बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः ||

अर्थ : थोडक्यात आणि सुंदर भाषेत जो सांगतो तो खरोखर [चांगला-फर्डा] वक्ता होय. खूप बडबड करून त्यातून थोडासाच अर्थ निघत असेल तर त्याला वाचाळ म्हणावे.

सन्तश्च लुब्धाश्च महर्षिसंघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः |

किं किं सामिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किं माधवदाघयानम् ||

अर्थ : चित्रकाव्याच्या विविधप्रकारापैकी ‘ अन्तरालाप ‘ नावाचा एक चमत्कृतिपूर्ण काव्यप्रकार आहे. अन्तरालापाच्या एकच श्लोकात प्रश्न व त्या प्रश्नांची दडलेली उत्तरे असतात. प्रस्तुत श्लोकात सज्जन, लोभी, ऋषीसमूह, ब्राह्मण, शेतकरी आणि मान्यवर हे सहाजण कशाची इच्छा करतात? असा एक प्रश्न आणि या सहाहि जणांना नको वाटणारी एकच गोष्ट कोणती? असा दुसरा प्रश्न विचारला आहे.

सम्पन्नतरमेवान्नं दरिद्रा भुञ्जते सदा |

क्षुत् स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ||

अर्थ : गरीब लोक नेहमी अतिशय चांगल असं अन्न भक्षण करतात. कारण भूक ही सुंदर चव आणते की जि [गोष्ट] श्रीमंतांच्या बाबतीत दुर्मिळ असते.

पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् |

मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||

अर्थ : शिकत राहणाराला मूर्खपणाचा धोका नसतो. जप करणाराला पाप लागण्याचा धोका नसतो. मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते. दक्ष राहणार्याला कसलीच भीती नसते.

भाग्यवान् जायतां पुत्रः मा शूरो मा च पण्डितः |

शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः ||

   कुन्ती महाभारत

अर्थ : मुलगा नशीबवान असावा शूर किंवा विद्वान् असण्याची [जरूर] नाही [कारण] शूर आणि ज्ञानी [असूनही] माझे पुत्र युद्धात कुजून जात आहेत.

सामैव हि प्रयोक्तव्यमादौ कार्यं विजानता |

सामसिद्धानि कार्याणि विक्रियां यान्ति न क्वचित् ||

अर्थ : काम [चांगले कसे करावे हे] जाणणाऱ्याने पहिल्यांदा गोड बोलून समजावून सांगावे. अशाप्रकारे सामाचा उपयोग करून पूर्ण केलेली कामे कधीही बिघडत नाहीत.

नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदम्बराय गुञ्जावतंसपरिपिच्छलसन्मुखाय |

वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपाङ्गजाय || भागवत

अर्थ : हे परमेश्वरा, घनश्यामा, ज्याचे मस्तक गुंजानी सुशोभित केले आहे. अशा, वस्त्रे तेजस्वी असणाऱ्या, स्निग्ध आणि सुंदर मुख असणाऱ्या, वनमाला धारण करणाऱ्या, बासरी, शिंग, वेत एका हाती घास यामुळे सुंदर दिसणाऱ्या, कोमल चरण असणाऱ्या गोपराजाच्या मुलाला [श्रीकृष्णाला, देवा तुला] मी वन्दन करतो.

सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे |

तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः || भागवत मङगल १ . १

अर्थ : विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय वगैरेना कारणीभूत असणाऱ्या, सत्, चित् आणि आनंद हेच स्वरूप असणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाची आम्ही अध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक तापनिवारणासाठी स्तुती करतो.

पिकस्तावत्कृष्णः परमरुणया पश्यति दृशा परापत्यद्वेषी स्वसुतमपि नो पालयति यः |

तथाप्येषोऽमीषां सकलजगतां वल्लभतमो न दोषा गण्यन्ते खलु मधुरवाचां क्वचिदपि ||

अर्थ : खरोखर कोकीळ हा [अन्तर्बाह्य] काळाकुट्ट आहे, तो तांबड्या लाल डोळ्यांनी [रागानेच] बघतो. दुसऱ्यांच्या पिल्लांचा द्वेष तर करतोच, पण स्वतःच्या पिलांचा देखील सांभाळ करीत नाही. तरीसुद्धा तो सर्व जगाचा अत्यंत आवडता असतो. मधाळ बोलणाऱ्यांच्या दोषांचा कधीही विचार केला जात नाही. [साखरपेर्‍या भाषेमुळे लोक फसतात आणि त्यांची गैरकृत्य लपतात.]

अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक्रमः |

अन्यस्य दशति श्रोत्रमन्यः प्राणैर्वियुज्यते ||

अर्थ : दुष्ट मनुष्य रूपी सापाची मारण्याची रीत केवढी विचित्र आहे! तो [वेगळ्याच] एकाच्या कानात [चाहाडीचे विष घालून] चावतो, [आणि ज्याच्याबद्दल चाहाडी केली असेल तो] दुसराच प्राणांना मुकतो.

पुंसामसमर्थानामुपद्रवायात्मनो भवेत्कोपः |

पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् ||

अर्थ : दुबळ्या माणसांचा संताप हा त्यांना स्वतःलाच त्रासदायक होतो. [जसे] अतिशय तापलेले पातेले त्याच्या जवळ असणार्‍यांनाच होरपळून टाकते.

न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः |

यो वै युवाप्यधीयानः तं देवाः स्थविरं विदुः ||

अर्थ : ज्याचं डोकं म्हातारपणामुळे पांढरे झाले आहे त्याला देव वृद्ध म्हणत नाहीत तर जो तरुण असूनही [खूप] शिकलेला आहे त्याला वृद्ध असे म्हणतात.

को हि तुलामधिरोहति शुचिना दुग्धेन सहजमधुरेण |

तप्तं विकृतं मथितं तथापि यत्स्नेहमुद्गिरति ||

अर्थ : जन्मतः मधुर असणाऱ्या दुधाची कोण बरे बरोबरी करू शकेल ते तापवल [त्रास दिला] विकार केला [विरजून दही केलं] घुसळल [कसाही त्रास दिला] तरी स्नेह [स्निग्धता -प्रेम – ओशटपणा] प्रकट करते.

विना कार्येण ये मूढा गच्छन्ति परमन्दिरम् |

अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी ||

अर्थ : जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे नक्की कमीपणा येतो.

तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतो रुतैः |

रतार्ता तित्तिरी रौति तीरे तीरे तरौ तरौ ||

अर्थ : कामविव्हल झालेली टिटवी ह्या अशा अधिकाधिक वाढत जाणाऱ्या कर्कश आवाजात सगळ्या काठावर प्रत्येक झाडावर ओरडत आहे.

प्रदोषे दीपक: चन्द्र: प्रभाते दीपको रवि:।

त्रैलोक्ये दीपको धर्म: सुपुत्रो कुल दीपक: ॥

अर्थ : रात्री चन्द्र हा दिवा असतो. [उजेड देतो] पहाटेपासून सूर्य हा दिवा असतो. तिन्ही लोकात धर्म [आपण केलेली सत्कृत्ये ही] दिव्याप्रमाणे [उपयोगी] पडतात. सुपुत्र हा घराण्याला दिवा [मार्गदर्शक] असतो.

कति वा पाण्डवा भद्र खट्वाखुरमितास्त्रयः |

एवमुक्त्वा जडः कश्चिद् दर्शयत्यङ्गुलिद्वयम् ||

अर्थ : सद्गृहस्था, पांडव किती [होते] [यावर] एका मूर्खाने खाटेच्या खुरांइतके तीन, असे म्हणून दोन बोटे दाखवली.

अनालस्यं ब्रह्मचर्यं शीलं गुरुजनादरः |

स्वावलम्बो दृढाभ्यासः षडेते छात्रसद्गुणाः ||

अर्थ : उद्योगीपणा, ब्रह्मचर्य, उत्तम चारित्र्य, शिक्षकांबद्दल आदर, स्वावलंबन, सतत अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत.

दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः स्पर्शश्चेत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् |

न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वाऽलौकिकॉऽपि ||शङ्कराचार्य – शतश्लोकी

अर्थ : या त्रिभुवनात ज्ञानदात्या सद्गुरुना शोभेल असा दृष्टान्तच नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तर [तर तीही योग्य नाही], कारण अहो, जरी परिस लोखंडाला सुवर्णत्व देतो तरी परिसत्व देत नाही. [परंतु ]सद्गुरू चरणयुगुलांचा आश्रय करणाऱ्या आपल्या शिष्याला स्वतःचे साम्य देतात आणि त्यामुळेच ते निरुपम आहेत आणि त्यांना योग्य असा दृष्टान्त प्रपंचात मिळत नाही.

स्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रान्तिरन्यस्य विशेषस्लिष्टा|

यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतीष्ठापयितव्य एव || कालिदास – मालविकाग्निमित्र

अर्थ : कोणाला [एखाद्या शिक्षकाला] स्वतःचे ज्ञान प्रशंसनीय असते. कुणाला शिकवण्याची हातोटी उत्तम असते. ज्याला या दोनही गोष्टी चांगल्या येतात त्याला निश्चितपणे अग्रस्थान दिले पाहिजे.

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन |

अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः ||

अर्थ : पैसे [देऊन] औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत [विकत] मिळते, पण ज्ञान [त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते ] कष्टाने मिळवावे लागते.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः |

यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ||

अर्थ : हे निषादा , चिरंतन काळपर्यन्त तुला प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस. – वाल्मिकी ऋषी

[पक्ष्याला मारलेले दिसल्यावर त्यांच्या तोंडून वरील उद्गार बाहेर पडले तेंव्हा ब्रह्मदेवाने प्रकट होऊन वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास सांगितले]