तळगड

रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत.त्यापैंकी तळगड हा एक किल्ला.

इतिहास :
रोह्यापासून समुद्र अगदी जवळच आहे.कुंडलिका नदी जिथे सागराला मिळते तो सर्व भाग पूर्वी सागरी वाहतुकीसाठी वापरला जात असे.या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी एक म्हणजे तळगङशिवरायांनी या सर्व परिसराचे महत्व जाणले होते म्हणूनच तळगड आणि घोसाळगड हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.पुढे राजा जयसिंगाशी झालेल्या पुरंधर किल्ल्याच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वतःकडे ठेवले.त्यामध्ये तळगड हा एक होता.यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते.पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्ला तसा लहानच त्यामुळे याचा घेरापण मोजकाच.किल्ल्याचे वैशिष्ट म्हणजे तटबंदी अजूनही शाबूत आहे.अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितित आढळतात.किल्ल्यात शिरतांना पडझड झालेला दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा.या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोप-यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. गड हा दक्षिणोत्तर पसरलेला आहे.दरवाजातून आत गेल्यावर थोडाच अंतरावर पाण्याची खोदलेली सात टाकी आढळतात.पुढे दक्षिणेकडे चालत गेल्यावर बुरुज आहे.अनेक ठिकाणी घरांचे आणि वाडांचे अवशेष आढळतात. गडाचा वापर टेहळणी व्यतिरिक्त इतर फारसा होत नसल्याने फारशी शिबंदी गडावर नसावी.किल्ल्यावर घोसाळगड,महाड,रोह्याची खाडी असा सर्व परिसर दिसतो.गडाचा घेर आटोपशीर असल्याने अर्ध्या तासात किल्ला फिरुन होतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट ही तळागावातूनच वर जाते.तळागावापर्यत जाण्यासाठी अनेक वाटा आहेत.गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे.या वाटेने गडावर जातांना पहिल्या टप्प्यावर एक छोटीशी सपाटी लागते.दुसरा टप्पा म्हणजे गडाच्या माचीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच होय.पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो.

१. इंदापूरमार्गे : मुंबई-गोवा महामागार्वरुन महाडच्या अलिकडे इंदापूर गावाच्या नजीकच तळागावाकडे जाण्यासाठी फाटा फुटतो.येथून तळागावात जाण्यास ४५ मिनिटे लागतात.
२. रोहामार्गे : रोहृयाहून मुरुडकडे जातांना तांबडी नावाचे गाव लागते.येथून तळागावाकडे जाण्यास एक गाडीरस्ता आहे.
३. मांडादलेणी मार्गे :रोहा-मुरुड मार्गावर रोह्यापासून १५ किमी अंतरावर खाजणी फाटा आहे.या फाटापासून ५ किमी अंतरावर कुडा गाव आहे.या कुडापासून १२ किमी अंतरावर तळागाव आहे.

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र तळा गावात राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : तळागावात हॉटेल्स आणि भोजनालये आहेत.
पाण्याची सोय : गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : तळा गावातून अर्धातास लागतो.