अंकशास्त्र, Numerology

एखाद्या व्यक्तीला कोणते अंक फायदेशीर आहेत, पुढील काळात येणारी कोणती वर्षे महत्वाची ठरतील, त्या व्यक्तीस कोणते करीअर, कोणता व्यवसाय लाभदायक ठरेल, कुठला रंग वापरल्यास फायदा होईल अशा अनेक गोष्टी अंकशास्त्राचा उपयोग करून सांगता येतात.

जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?

अंकशास्त्रात जन्मांक हा सर्वात महत्वाचा अंक मानला जातो. जन्मांक म्हणजे एखादी व्यक्ति महिन्याच्या ज्या तारखेस जन्मली तिच्यापासून मिळणारा अंक. व्यक्तिची जी जन्मतारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे 1 ते 9 दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे 10 ते 31 या तारखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकाची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख 1 असेल तर तुमचा जन्माक 1 असतो, तसेच जर तुमची जन्मतारीख 10 असेल तर या तारखेतील अंकांची बेरीज 1+0=1 येते, म्हणून तेंव्हाही तुमचा जन्मांक 1 असतो. हाच प्रकार तुमचा जन्म 19 किंवा 28 तारखेस झाला असेल तर होतो. (19=1+9=10=1+0=1, तसेच 28=2+8=10=1+0=1).

जन्मांकाला इंग्रजीमध्ये Birth Number, Basic Number  या नावाने ओळखले जाते.

जन्मांक हा केवळ तारखेवर अवलंबून असतो, ती व्यक्ति कोणत्या महिन्यात अथवा कोणत्या वर्षी जन्मली याचा जन्मांकाशी संबंध येत नाही.

जन्मांक 1 ते 9 या दरम्यानचे असतात, शिवाय ज्यांची जन्मतारीख 11, 13, 17, 22, 26,31  यापैकी एखादी असते, त्यांच्या दोन अंकी जन्माकाच्या गुणदोषांचाही स्वतंत्र पणे विचार केला जातो.

जन्मांकामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे, विचार करण्याची पद्दत, गुणदोष वगैरे अनेक गोष्टी कळतात.

जन्मांकाला जास्त महत्व असण्याचे कारण म्हणजे या अंकामुळे संबंधीत व्यक्तीच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टींची तसेच त्या व्यक्तीला येणा-या समस्यांची माहिती होते व त्यावरून त्या व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन करता येते. अंकशास्त्रात मार्गदर्शन करण्यासाठी जन्मांकाचाच जास्त उपयोग करण्यात येतो.

जन्मतारीख आणि जन्मांक:
1, 10, 19, 28: 1
2, 11, 20, 29: 2
3, 12, 21, 30: 3
4, 13, 22, 31: 4
5, 14, 23: 5
6, 15, 24: 6
7, 16, 25: 7
8, 17, 26: 8
9, 18, 27: 9
11: 11
13: 13
22: 22
26: 26

क्तीच्या संपूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज म्हणजे त्या व्यक्तीचा भाग्यांक होय.
भाग्यांकाला इंग्रजीमध्ये Life Path Number, Fortune Number, Destiny Number म्हणतात.

उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 15 जानेवारी 1985 रोजी झाला असेल तर ती तारीख
15.1.1985 अशी होते, आणि या तारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज 3 होते (1+5+1+1+9+8+5=30=3+0=3) म्हणून त्या व्यक्तीचा भाग्यांक 3 असतो.

एखाद्या व्यक्तीचे अंकशास्त्रीय वाचन करण्यासाठी जन्मांका खालोखाल भाग्यांकाचा वापर केला जातो. भाग्यांकावरून ती व्यक्ति साधारणपणे कोणत्या प्रकारचे आयुष्य जगेल हे सांगता येते.

जन्मांक आणि भाग्यांक यांचे गुणदोष सारखेच असतात. भाग्यांकावरून त्या व्यक्तीचा आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होईल हे सांगता येते.

एखाद्या व्यक्तीला शुभांक, करीअर वगैरे सुचवताना जन्मांकाबरोबरच भाग्यांकाचाही विचार केला जातो. आयुष्याचा जोडीदार, बिजनेस पार्टनर निवडताना प्रामुख्याने भाग्यांकाचा विचार केला जातो, त्याच बरोबर जन्मांकाचाही विचार केला जातो.

भाग्यांक काढायची योग्य पद्धत:

पूर्ण तारखेतील सर्व अंकाची बेरीज करून भाग्यांक काढता येत असला तरी अधिक योग्य पद्धत पुढीलप्रमाणे आहे:
अगोदर पूर्ण जन्मतारीख लिहावी.
उदाहरण: 29.10.1984
मग दिवस, महिना आणि वर्ष यांची वेगवेगळी बेरीज करावे.
उदाहरण: (2+9=11) + (1+0=1) + (1+9+8+4=22)
मग या अंकांची बेरीज करावी.
11 + 1+ 22=34=3+4=7
येणारा अंक म्हणजे भाग्यांक. इथे 7 हा भाग्यांक आहे.

या पद्धतीने भाग्यांक काढण्याचा फायदा म्हणजे या तारखेत 11 आणि 22 हे दोन मास्टर नंबर्स आहेत हे कळले. अन्यथा ते कळले नसते.

नामांक म्हणजे काय?

नामांकाला इंग्रजीत Name Number  म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या जन्मतारखेप्रमाणेच त्याच्या नावाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे अंकशास्त्रात व्यक्तीचे वाचन करण्यासाठी त्याच्या नावाचाही विचार केला जातो. त्यासाठी नावाच्या स्पेलिंगवरून त्या नावाची अंकामधील किम्मत काढली जाते. अशी किम्मत काढण्यासाठी वापरली जाणारी सोपी पद्दत म्हणजे नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांचे त्यांच्या अल्फाबिट्समधील स्थानानुसार अंकांमध्ये रुपांतर करायचे व त्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, AJAY हे नाव घ्या. या नावाचे अंकात रुपांतर असे होते:

A=1
J=10=1
A=1
Y=25=7
1+1+1+7=10=1

त्यामुळे अजयचा नामांक 1 येतो. नामांक काढताना नाव आणि आडनाव किंवा नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव यांचा विचार केला जातो.

नामांकाचे वाचन करताना केवळ 1 ते 9 एवढेच अंक विचारात घेतले जात नाहीत, तर नामांक काढताना जी दोन अंकी बेरीज येते, विशेष करून ती 11, 22, 33, 44 वगैरे येत असेल तर त्या अंकांचाही विचार केला जातो.

एखादा नामांक संबधीत व्यक्तिसाठी चांगला नसेल तर नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून तो नामांक बदलता येतो.

अंक आणि  त्यांचे गुणदोष

आता आपण अंक आणि त्यांचे गुणदोष थोडक्यात पाहू:

1: महत्वाकांक्षा, पुढाकार, आक्रमकता, विजय
2: चंचलता, धरसोडवृत्ती, उदारता,  रोमान्स
3: उत्साही, शिस्तप्रिय, हुशार, यशस्वी
4: तर्कनिष्ठता, फटकळपणा, बहिर्मुखता, कलह
5: मैत्रीभाव, प्रेम, रोमान्स, झटपट विचार आणि निर्णयक्षमता
6: यशस्वी, विश्वासपात्र, आग्रही,  कौटुंबिकता
7: बेचैनपणा, उद्यमशीलता, अंतर्मुखता
8: उशीर, संपत्ती, उदासीनता
9: लढाऊपणा, दीर्घ संघर्षातून यश, बहिर्मुखता

जन्मांक 1: जन्मतारीख1,10,19,28………….

कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त्रात जन्मांक 1 हा सगळ्यात चांगला जन्मांक मानला गेला आहे. मोठमोठे नेते, लढाऊ राजे, सेनापती, वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन कांहीतरी करणारे यांच्यात 1 जन्मांक असणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते.

जन्मांक 1 असणा-या व्यक्ति उपजतपणे नेतृत्वगुण असणा-या आणि महत्वाकांक्षी असतात. त्यांचं मुख्य ध्येय आपापल्या क्षेत्रात एक नंबरला पोहोचणं हे असतं. या व्यक्ति अगदी गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये असल्या, तरी तिथं त्या कॅप्टन असण्याची जास्त शक्यता असते, किंवा त्यांचं ध्येय कॅप्टन होण्याचं असतं. नोकर असण्यापेक्षा बॉस असणं त्यांना जास्त भावतं. इतरांच्या हाताखाली काम करणं, दुय्यम स्थान स्वीकारणं त्यांना आवडत नाही. इतरांच्यावर सत्ता गाजवण्याची उपजत महत्वाकांक्षा त्यांच्यात असते. त्यांच्याकडं उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असतं.

त्यांना पाहिजे असलेली गोष्ट या व्यक्ति मिळवतातच. त्यांचे रहाणीमान उच्च दर्जाचे असतं.

या व्यक्ति आपापल्या क्षेत्रात नव्या युगाची सुरवात करणाऱ्या असतात. त्या दिलदार, अनेकांच्या पोशिंद्या, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या या असतात. कुणावर अन्याय झालेला त्यांना खपत नाही. अगदी त्यांच्या शत्रूवरही अन्याय होत असेल तरी त्यांना ते रुचत नाही.

जन्मांक 1 असणा-या व्यक्तिशी कुणी शत्रूत्व पत्करले, तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते. पण विशेष म्हणजे शत्रूनं चांगली लढत दिल्यास त्याचं कौतुक करण्याचा दिलदारपणा देखील त्यांच्यात असतो. कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ति त्याचा निर्दयपणे बंदोबस्त करतात. त्यांचे शत्रू त्यांच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता असते, पण जन्मांक 1 च्या व्यक्ती सहसा आपल्या शत्रूंना पुरून उरतात.

जन्मांक 1 असणाऱ्या व्यक्ति परफेक्ट हिरो अथवा परफेक्ट व्हिलन असतात.

हेच गुण भाग्यांक 1 असणा-या व्यक्तींमध्येही दिसून येतात.

या जन्मांकामध्ये कोणत्याही महिन्याच्या 19 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये 1 या अंकाचे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.

लकी नंबर्स 
1 व एक अंकी बेरीज 1 येणारे नंबर्स (उदा. 1234 = 1+2+3+4 = 10 = 1+0 = 1), म्हणून 1234 हा एक लकी नंबर).

फ्रेंडली नंबर्स 
1, 5, 7

अनफ्रेंडली नंबर्स
2, 4, 6

लकी कलर्स
सोनेरी, पिवळा, ब्राऊन

जन्माक किंवा भाग्यांक 1 असणा-या कांही व्यक्ति:

छत्रपती शिवाजी महाराज, लेनिन, मार्टिन ल्युथर किंग, जेम्स वॅट, माओ त्से तुंग, एनी बेझंट, लॉर्ड माउंट बॅटन, शिवाजी गणेशन, इंदिरा गांधी, किरो, बिल गेटस, बिल क्लिंटन, प्रिन्सेस डायना, मारिया शारापोव्हा,

जन्मांक 2: जन्मतारीख  2, 11, 20,29………..

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे त्या हसतमुख, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असतात. त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर रहातात. त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही. त्यांच्या या उपजत गुणामुळं या व्यक्ति उत्कृष्ट मध्यस्थ, मुत्सद्दी, विक्रेते, सल्लागार, समुपदेशक बनू शकतात. त्याशिवाय या व्यक्तिंच्याकडे उत्कृष्ट सौंदर्यदृष्टी आणि क्रिएटीव्हिटी असते, त्यांना विविध कलांची चांगली जाण असते. या व्यक्ति रोमांटिक असतात. या व्यक्ति सहजपणे नवे मित्र बनवतात.

या व्यक्तिंची दुसरी बाजू म्हणजे त्या अतिसंवेदनशील, भावूक आणि मूडी असतात, अगदी छोट्या कारणामुळं त्यांचा मूड ऑफ होवू शकतो, त्यांना नैराश्य येऊ शकते. धरसोडपणा हे त्यांचा ठळक दोष आहे. भिन्नलिंगी व्यक्तिकडे सहजपणे आकर्षित होणे हा त्यांचा आणखीन एक दोष आहे.

रोमँँटिक वागणं हा यांचा एक विशेष गुण आहे. सहसा यांचा प्रेमविवाह होतो. लव्ह अफेअर्स होऊ शकतात.

जन्मांक 2 असणा-यांपैकी ज्यांचा जन्म 11 किंवा 29 तारखेस झाला आहे, त्या भाग्यवान म्हणायला पाहिजे, कारण 11 हा एक मास्टर नंबर आहे. 29 या तारखेतल्या अंकाची बेरीज ही 11 येते. या  व्यक्ति उच्च आध्यात्मिक पातळी असणाऱ्या असतात, किंवा धार्मिक असतात. या तारखांची निगेटिव्ह बाजू म्हणजे त्यांच्यापैकी अनेकजण धर्म कर्मकांड, पूजाअर्चा याच्या अतिआहारी गेलेले असतात.

जन्मांक 2 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे महात्मा गांधी, ओशो, लाल बहादूर शाष्त्री, थॉमस अल्वा एडिसन, जॉन एफ. केनेडी, मिखाईल गोर्बाचेव्ह, राजीव गांधी, आंद्रे आगासी, आशा पारेख, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान.

लकी नंबर्स 
2 व एक अंकी बेरीज 2 येणारे नंबर्स (11, 20, 29……. 101 ….200 वगैरे).

फ्रेंडली नंबर्स 
2, 4, 8

अनफ्रेंडली नंबर्स
1, 5, 7

लकी कलर्स
हिरवा, निळा

जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30……………

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 3 असतो. मोठमोठे नेते, अभिनेते, सेनापती, उद्योगपती, मोटीव्हेटर्स यांच्यात 3 हा जन्मांक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

हे लोक मैत्रीपूर्ण, बोलके, प्रसन्न चेहर्याचे आणि उत्साही असतात. इतरांना मदत करायला ते सदैव तयार असतात.

या  व्यक्ति अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छा शक्ती असणा-या असतात. त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही आणि ते सतत  आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात, आणि त्यात ते यशस्वी होतातही. सर्वोच्च असण्यातली ताकत त्यांना माहीत असते आणि ती ताकत कशी वापरायाची हेही त्यांना चांगलेच कळते.

आपले विचार आणि मते स्पष्टपणे व्यक्त करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. त्यांच्या प्रगल्भ आणि स्पष्ट विचारांमुळे, ज्ञानामुळे आणि तर्कबुद्धीमुळे  लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. समाजात त्यांना मान मिळतो.

या व्यक्ति संयमी, सहनशील, धैर्यवान  आणि कष्टाळू असतात. पण ते एकावेळी अनेक योजना राबवण्याच्या भानगडीत पडतात, त्यामुळे त्यांची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी होण्याची शक्यता असते.

आपल्या सहका-यांनी आपल्या आज्ञा ऐकाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते, आणि ते सहकारी अशा आज्ञा ऐकतातही.

यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि आकर्षण शक्तीमुळे भिन्नलिंगी व्यक्ती यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात. यातून यांची लव्ह अफेअर्स होण्याची शक्यता असते.

यांना नाही म्हणायची सवय नसते. त्यामुळे ते आश्वासने देऊन बसतात, पण प्रत्यक्षात ती पुरी करत नाहीत/ करू शकत नाहीत.

यातील कित्येकांना कामापेक्षा गप्प-गोष्टींचे वेड असते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला बराच वेळ वाया जायची शक्यता असते.

लकी नंबर्स
3 व एक अंकी बेरीज 3 येणारे अंक

फ्रेंडली नंबर्स
3, 6, 9

अनफ्रेंडली नंबर्स 
4, 7, 8

लकी कलर्स 
जांभळा, परपल, निळा, गुलाबी

जन्मांक 3 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति:
जिजाबाई, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, जोसेफ स्टालिन, सर विन्स्टन चर्चिल, डार्विन, हेनरी फोर्ड, होमी भाभा, विक्रम साराभाई, रजनीकांत, शरद पवार, टॉम क्रूज

जन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31………….

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो.

यांची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ति इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नाण्याच्या छाप्याबद्दल बोलत असाल तर  या व्यक्ति काट्याबद्दल बोलतील, आणि नाण्याला केवळ दोनच बाजू नसून तीन बाजू असतात हेही दाखवून देतील.  वरवर विचार करण्या ऐवजी हे लोक खोलवर विचार करत असल्याने इतरांना असे वाटते की ते मुद्दाम आपले म्हणणे खोडून काढत आहेत. त्यात या व्यक्तींचा स्वभाव कांहीसा आक्रमक, फटकळ, स्पष्टवक्तेपणाचा असल्याने बऱ्याचदा समोरच्याचे मन दुखावले जाते.

यांचा स्वभाव बंडखोर असतो आणि या व्यक्ती प्रसंगी अत्यंत कठोर बनू शकतात.

आपल्या कामाच्या बाबतीत या व्यक्ति ‘परफेक्शनिस्ट’ असतात. या व्यक्ति ज्या क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांच्याकडून फार मोठे, अविश्वसनीय काम होवू शकते. या व्यक्ति या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतात.

परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ यांच्या जीवनात, कामात दिसून येतो.

या व्यक्ति पैशाला फारसे महत्व देत नाहीत. पैसा ही गोष्ट त्यांच्यासाठी दुय्यम असते. तसेच या व्यक्ति ‘अतिहुशार’ या सदरात मोडत असले तरी झटपट पैसे मिळवण्याचे ते टाळतात, आणि पैसे कष्टाने, विशेषत: त्यांच्या बौद्धिक  कष्टाने मिळवत असतात.

शैक्षणिक आणि टेक्निकल क्षेत्रात जन्मांक 4 असणाऱ्यांची संख्या जास्त दिसते.

या व्यक्तिंना भरपूर मित्र आणि भरपूर शत्रूही असतात. ज्यांचा जन्मांक 2, 4 किंवा 8  आहे त्यांचे आणि या व्यक्तिंचे चांगलेच मेतकूट जमते.  8 जन्मांक असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे चांगले पटते आणि भांडणेही होतात.

यांच्या पैकी ज्यांची जन्मतारीख 13 आहे त्या व्यक्ती आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांना दुखावणाऱ्या, त्रासदायक ठरू शकतात, तर 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती मोठे लोकोपयोगी काम करून दाखवू शकतात.

लकी नंबर्स:
4 व एक अंकी बेरीज 4 येणारे अंक ( 13, 22, 31, 40 ….. 103  … 202 वगैरे)

फ्रेंडली नंबर्स 
2, 4, 8

अनफ्रेंडली नंबर्स
1, 3, 5, 9

लकी कलर्स:
लाईट निळा, हिरवा, ग्रे

जन्मांक 4 असणाऱ्या प्रसिद्ध  प्रसिद्ध व्यक्ति
जॉर्ज वाशिंग्टन, महाराणा प्रताप, राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी,मायकेल फॅराडे,सर ऑर्थर कॉनन डॉयल,सरदार वल्लभ भाई पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, बराक ओबामा.

वरील यादीवर नजर टाकली तर त्यांच्यात ‘खमके’ राजकारणी, बंडखोर समाज सुधारक आणि जिनिअस व्यक्ति झालेल्या दिसतात.

जन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23………………

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5  असतो. या लोकांची वैशिष्ठ्ये म्हणजे हे लोक जिनिअस, मल्टिटॅलेंटेड, खोलवर विचार करणारे, उत्तम वक्ते, झटपट विचार करणारे आणि झटपट निर्णय घेणारे, इतरांना प्रेरणा देणारे आणि मदत करणारे असतात. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असते. या व्यक्ति सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. हे लोक रोमांटिक आणि प्रेमळ असतात पण प्रसंगी हे लोक कठोर बनू शकतात. त्यांच्यापैकी बहुतेकांच्याकडे उत्तम लेखन कौशल्यही असते. वक्तृत्व आणि लेखन या दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्याचा त्यांना  मोठा फायदा होतो.

हे स्वातंत्र्यप्रिय असतात, कुणाच्या बॉसिंग खाली काम करू शकत नाहीत. त्यामुळे हे सहसा नोकरीऐवजी स्वत:च्या व्यवसायाला प्राधान्य देतात. यांचा लांबवरचा प्रवास भरपूर होतो. संशोधन, मिडिया, करमणूक क्षेत्र, व्यापार उद्योग यात हे  लोक जास्त दिसतात.

हे लोक एखाद्या ध्येयाने पछाडलेले असतात.

यांचा बहुधा प्रेम विवाह होत असतो. अनेक लव्ह अफेअर्स होण्याची शक्यता असते.

यांच्या मनासारखे न झाल्यास त्यांना मोठे डिप्रेशन येऊ शकते व त्यातून ते व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. विशेषकरून ज्यांचा जन्म 14 तारखेस झालेला असतो ते लोक व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते.

यांच्याकडून आर्थिक गुन्हे, हेराफेरी वगैरे गोष्टी होऊ शकतात. (विशेषत: 14 तारखेच्या बाबतीत).

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस झाला असल्यास तुमच्यातही वरील गुणदोष उपजतपणे असू शकतात. दोषांना आळा घालून गुणांचा विकास केल्यास तुम्ही उंच भरारी घेऊ शकता.

लकी नंबर्स: 
व एक अंकी बेरीज 5 येणारे नंबर्स (14, 23, 32, 41 वगैरे)

फ्रेंडली नंबर्स:
एक अंकी बेरीज 1, 5 किंवा येणारे अंक (1, 5, 7, 10, 14, 16 … 100, 104 वगैरे).

अनफ्रेंडली नंबर्स: 
2, 4, 6

लकी तारखा:
5, 14, 23

लकी कलर्स:
पांढरा, लाईट ग्रे

जन्मांक 5 असणाऱ्या  प्रसिद्ध व्यक्ती: 
छत्रपती संभाजी महाराज, विल्यम शेक्सपिअर, जवाहर लाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर एस. राधाकृष्णन, अल्बर्ट आईनस्टाईन, मार्क झुकेरबर्ग, राज ठाकरे, अॅडॉल्फ हिटलर.

जन्मांक 6,जन्मतारीख 15, 24, 6……………….

 

कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म्हणजे या व्यक्तिंच्याकडे दुर्गुण किंवा दोष फार कमी असतात. या व्यक्ति समाजात चांगल्या आणि जबाबदार व्यक्ति म्हणून ओळखल्या जातात.

कुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणा-या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.

या व्यक्ति अतिशय मनमिळावू, प्रेमळ, मृदुभाषी आणि इतरांना मदत करणा-या असतात. त्याचबरोबर या व्यक्ति भौतिक सुखांचा आणि जीवनाचा उपभोग घेणा-या असतात.

त्यांची दृष्टी कलात्मक असते. त्यामुळे कलेशी संबधीत व्यवसाय, डिझायनिंग, फॅशन इंडस्ट्री, संगीत यात यशस्वी झालेले दिसतात.

6 हा राजकीय लीडरशिपचा अंक नाही.  त्यामुळे राजकीय क्षेत्रात या व्यक्ती कमी प्रमाणात दिसतात. या उलट सामजिक प्रश्नांवर नेतृत्व करण्यात 6 जन्मांक असणारे लोक खूप यशस्वी झालेले दिसतात.

लकी नंबर्स
6 आणि एक अंकी बेरीज 6 येणारे अंक

फ्रेंडली नंबर्स
3, 6, 9

अनफ्रेंडली नंबर्स
1, 5, 7

लकी कलर्स 
गुलाबी, निळ्या रंगाच्या सर्व छटा

जन्मांक सहा असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे रविंद्र नाथ टागोर, निरो, बादशहा अकबर, श्री अरविंदो, मायकेल अॅन्जेलो, , आण्णा हजारे, शांतीलाल मुथ्था, पी.जी. वुडहाउस  वगैरे.

 

जन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25 …………….

कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो.

जन्मांक 7 असणा-या व्यक्तिंचे वैशिष्ठ्य म्हणजे या व्यक्ति अंतर्मुख असतात. त्या वरून शांत दिसतात, पण मनातून अतिशय बेचैन असतात. या  व्यक्ति सतत कांहीतरी विचार करत असलेल्या दिसतात. त्यांना  एकांताची आवड असते, आणि अगदी कामाच्या ठिकाणीही एकांताचा अनुभव घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते. आपले काम ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते.

या व्यक्ती निरीक्षण आणि विश्लेषण करण्यात पटाईत असतात. त्यामुळे या व्यक्ती संशोधक, तपास अधिकारी, गुप्तहेर म्हणून चांगले काम करू शकतात.

यांचे व्यक्तिमत्व भारदस्त असते, हे सहसा वजनदार असतात आणि यांचा आवाजही भारदस्त असतो. तुम्हाला जन्मांक 7 असणारी पण किरकोळ शरीर यष्टीची व्यक्ती सहसा सापडणार नाही. पण स्त्रियांच्या बाबतीत याला बरेच अपवाद दिसतात.

या व्यक्ति कोणताही निर्णय खोलवर विचार करून घेत असतात. त्यांच्याकडे इंट्यूशन पॉवर असते, त्यामुळे इतरांना सहसा लक्षात न येणा-या पुढील काळात होऊ शकणाऱ्या गोष्टी यांच्या चटकन लक्षात येतात.

7 हा अंक शिक्षण, लेखन, विज्ञान आणि अध्यात्म यांच्याशी संबधीत आहे.  हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति जास्त करून वरील क्षेत्रात आघाडीवर दिसतात.

सहसा हे लोक समाजापासून अलिप्त रहातात आणि कामाशिवाय फारसा कुणाशी संबंध ठेवत नाहीत. स्वत:मध्ये मग्न आणि स्वत:च्या कामात व्यस्त असल्याने या व्यक्तींचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते.

लकी नंबर्स 
7 व एक अंकी बेरीज 7 येणारे नंबर्स

फ्रेंडली नंबर्स 
1, 5, 7

अनफ्रेंडली नंबर्स
2, 3, 6, 8

लकी कलर्स
हिरवा

जन्मांक 7 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ती:
सर आयझॅक न्यूटन, मादाम मेरी क्युरी, चार्ली चॅप्लीन, ब्लादिमीर पुतीन.

जन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26……………

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आणि संपत्ती यांच्याशी संबंधीत आहे. या अंकात प्रचंड शक्ती आहे. पण त्याचवेळी हा अंक विवाहविषयक आणि कौटुंबिक समस्या निर्माण करत असतो. माझ्याकडे विवाहविषयक किंवा कौटुंबिक समस्या  घेऊन येणा-या क्लाएंट्समध्ये सगळ्यात जास्त क्लाएंट्स हे जन्मांक 8 असणारे असतात. प्रॉबेब्लिटीच्या नियमाप्रमाणे  अशा समस्या घेऊन येणाऱ्या आठ जन्मांक असणाऱ्यांंची संख्या 1/9 पाहिजे, पण प्रत्यक्षात त्यांची संख्या निम्म्याहून जादा असते.

हा जन्मांक असणा-या लोकांना येणाऱ्या समस्या या बहुतेक वेळा त्यांनी स्वत: ओढावून घेतलेल्या असतात. सतत तणावाखाली रहाणे, छोटाश्या कारणाने नाराज होणे, झटपट निर्णय न घेणे, एकलकोंडेपणा, रॉयल रहाणी, ठामपणा, इतरांशी संवाद न साधणे, आपल्या भावना व्यक्त न करणे हे 8 हा जन्मांक असणाऱ्यांचे कांही ठळक दोष.

यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असते आणि यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उशीरा घडत असते.

पण त्याचवेळी त्यांच्याकडे उशीरा का होईना प्रचंड धन आणि संपत्ती निर्माण करण्याची ताकत असते. त्यांना घरून फारसे कांही मिळत नाही आणि ते जे कांही करतात ते स्वत:च्या हिम्मतीवर करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात या व्यक्ति खूप यशस्वी झाल्याचे दिसते.

ज्या व्यक्तिंच्याबद्दल यांना आपुलकी असते, त्यांना या व्यक्ति बोलून दाखवत नाहीत, तर त्यांच्यासाठी कांहीतरी करून दाखवतात.

त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असते. या व्यक्ती एकीकडे निष्ठूर वाटत असतात तर दुसरीकडे यांच्यात मानवतावादही असतो.

या व्यक्ति सावधचित्त असतात, समोरच्या व्यक्तीला जज करण्यात पटाईत असतात आणि समोरील व्यक्ति वाईट भावनेची असेल तर यांना ते लगेच कळते. हे गुण जन्मांक 8 असणा-या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.

जन्मांक 4 किंवा 2 असणा-यांशी यांची चांगली नाळ जुळते

8, 17, 26 या तारखेस जन्मलेल्या लोकांचे गुणदोष साधारणपणे वरीलप्रमाणे असतात, आणि 8 पेक्षा 17 मध्ये आणि 17 पेक्षा 26 मध्ये हे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.

लकी नंबर्स
8 व एक अंकी बेरीज 8 येणारे अंक (पण जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तीने  त्यांच्यासाठी 8 हा लकी नंबर असला तरी तो टाळावा, कारण या अंकामुळे त्या व्यक्तीचे दोष वाढू शकतात).

फ्रेंडली नंबर्स 
2, 4, 8

अनफ्रेंडली नंबर्स 
3, 7, 9

लकी कलर्स
काळा, ग्रे

जन्मांक 8 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: मदर तेरेसा, मन मोहन सिंग, नरेंद्र मोदी, स्टीफन हॉकिंग, मनेका गांधी, एम. जी. रामचंद्रन, हैदर अली.

जन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27…………..

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.

हा जन्मांक  1 ते 9 या जन्मांकामध्ये शेवटच्या ठिकाणी आहे. त्यामुळे 9 हा अंक  ‘नंबर ऑफ कम्प्लिशन’ मानला गेला आहे.

जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अनेक गुण दिसून येतात. जन्मांक 1 सारखेच प्रचंड आत्मविश्वास, आक्रमकता, साहसीपणा, लढाऊपणा हे गुण जन्मांक 9 मध्ये दिसून येतात. पण जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्तिंना जन्मांक 1 असणा-या व्यक्तिंसारखे झटपट यश मिळत नाही तर उशीरा मिळत असते. याचे कारण म्हणजे हा अंक उशीर लावणारा अंक आहे. पण हळूहळू का होईना, या व्यक्ती जीवनात मोठी परागती करू शकतात.

जन्मांक 9 हा अपघाताशी संबंधीत अंक आहे आणि या व्यक्तिंच्या आयुष्यात सारखे अपघात होऊ शकतात. यांच्यात अहंकार आणि क्रोध या भावना इतरांपेक्षा जास्त प्रमाणात असतात. यांच्या चेहऱ्यावर राग दिसून येतो.  यांच्यात जर 9 या अंकाचे दोष मोठ्या प्रमाणात विकसित झाले असतील तर यांच्या हातून हिंसक गुन्हे घडू शकतात. अर्थात या गोष्टी त्यांचे इतर कोअर नंबर्स काय आहेत यावर अवलंबून असतात.

यांची आणखी एक बाजू म्हणजे हे मानवतावादी आणि आध्यात्मिक असतात. विशेषत: यांच्या चार्टमध्ये 7, 8, 11 यापैकी एखादा अंक आला असेल तर हे जास्तच आध्यात्मिक असतात. त्यांच्यात  गूढ गोष्टींविषयी आकर्षण तयार होऊ शकते.

लकी नंबर्स:
9 व एक अंकी बेरीज 9 येणारे अंक (18, 27, 36)

फ्रेंडली नंबर्स:
3, 6, 9

अनफ्रेंडली नंबर्स:
4, 8

लकी कलर्स
लाल रंगाच्या सर्व छटा

जन्मांक 9 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: नेल्सन मंडेला, राम कृष्ण परमहंस, लिओ टॉलस्टॉय, विजया लक्ष्मी पंडीत, गॅलिलिओ, बरट्रांड रसेल, टॉम हॅन्क्स, ब्रॅड पिट