७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिन

आजचा हा दिवस WHO ने परिचारिका आणि सुईणींना समर्पित केला आहे.
सुखी आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करण्याबरोबरच त्यांच्या समर्पित,दयाळू आणि सेवाभावी वृत्तीची आठवण जगाला रहावी हाच त्या पाठीमागचा मुख्य उद्देश.

परिचारिका रुग्णाला तळहाताच्या फोडासारखं जपते. आजा-यांची, जखमी झालेल्यांची आणि वयोवृध्दांची काळजी घेण्यास झटते. एवढच करुन ती थांबत नाही तर रुग्णांच्या भावनिक जखमांवर ती फुंकर घालत असते. पेशंटच्या यातना समजून घेऊन त्यांना येन केन प्रकारेण मदत करण्याची त्यांची मनस्वी इच्छा असते.

कोविड ९ ने सध्या जगात थैमान घातलय अश्यावेळी मानवता हीच सेवा मानत,उच्च दर्जाचे उपचार,आणि सेवा शुश्रुषा हाच परमेश्वर मानून परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी आघाडीवर काम करत आहेत.

तेंव्हा आजच्या जागतिक आरोग्य दिनी त्यांचे आभार मानुयात…मन:पूर्वक घन्यवाद !

जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. आरोग्यपूर्ण आणि सुदृढ शरीर हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून, आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्याइतपत ज्ञान आणि तशी संधी व सुविधा जगातील प्रत्येकाला, जगाच्या हरएक कानाकोपऱ्यात मिळवून देण्याकडे केल्या जाणाऱ्या वाटचालीचे हे प्रतीक आहे.
जगात विकसीत आणि विकसनशील अशा दोन भागांखेरीज मागास असणारे देश देखील आहेत. प्रत्येक देशाची आरोग्य समस्यांवर खर्च करण्याची तयारी आणि आर्थिक क्षमता यात देखील मोठे अंतर असल्याचे आपणास दिसते. परंतु तज्ज्ञ मार्गदर्शनात अनेक देशातील अनेक समस्या कमी झाल्या. याचं उत्तम उदाहरण अर्थात भारतातील पोलिओमुक्ती आहे.

हृदयाच्या स्पंदनानुसार अर्थात पल्सनुसार संपूर्ण देशात एक दिवस निवडून नवजात शिशू पासून 5 वयाच्या बालकापर्यंत पोलिओ डोस देण्याच्या संकल्पनेला 1995 साली सुरूवात झाली आणि आज 20 वर्षांनी आपण पोलिओमुक्त झाल्याचे स्वप्न वास्तवात आणू शकलो आहोत. बदलत्या काळानुसार आरोग्य समस्या आणि त्यांच्या फैलाव होताना दिसत आहे. प्रचंड प्रतिकारशक्ती असणारे विषाणू (वायरस) आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी धोरण असणे त्यामुळेच अत्यंत आवश्यक झाले आहे. असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमणातून पसरणारा एचआयव्हीचा विषाणू बाधित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती मोडून काढत असतो. परिणाम स्वरुप एडस् चे आव्हान गेल्या दोन दशकांपासून जगातील अनेक देशांपुढे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नियमितपणे अवलंबले गेले तर त्यातून शरीराला उत्तम रोगप्रतिकारशक्ती लाभत असून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

नैसर्गिक उपचार पद्धतीबरोबरच ऋतुमानाच्या अनुसार आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामही सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. आपला दैनंदिन आहार, व्यायाम आणि झोपेचे वेळापत्रक ठरविताना आपल्याला दिवसभरामध्ये घ्यावे लागणारे शारीरिक श्रम, आणि रोजची कामे उरकताना मनावर येणारा मानसिक ताण यांचा ही विचार करणे आवश्यक आहे. रोजच्या कामाच्या धावपळीमध्ये आपल्या आवडत्या कामांसाठी वेळ काढणे हे मनावरील ताण कमी करून मनाला समाधान आणि आनंद देणारे असते. मन प्रसन्न राहिले तर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही सकारात्मक असतो. याचाही फायदा आपल्या शरीराला होतच असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याला पूरक असे बदल आपण जीवनशैलीमध्ये केले, तर शरीर निरोगी राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

बर्ड फ्लू तसेच स्वाईन फ्लू आदी संसर्गजन्य आजार गेल्या दशकात समोर आले आहे. त्यांचा अटकाव रोखण्यासाठी देशांतर्गत प्रवासी वाहतुकीवर बंधने घालण्याची वेळ अनेक देशांवर आली. प्राण्यांची वाहतूक बर्ड फ्लूमुळे बंद करावी लागली. प्राणीमात्रात या सोबतच “मॅड काऊ” आजार समोर आला. मध्यंतरी आफ्रिकेत झालेला “ईबोला” किंवा भारतात चिकन गुणिया आणि डेंग्यूचा प्रसार अनेकांचे प्राण घेणारा ठरला. आणि आता जगात थैमान घातलेला कोरोना..कोरोनाने संपूर्ण विश्वात दु:खाची छाया पसरली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अस्तित्व आणि कार्य यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा आणि सगळ्यांना हार्दिक  शुभेच्छा !