अकोले तालुका
अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.
प्रमुख आकर्षणे
रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.
धरणे
प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडे पट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे