धनुर्विद्या

धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे. ज्या वेळी आधुनिक शस्त्रे उपलब्ध नव्हती, त्या वेळी अनेक युद्धांमध्ये सवरेत्कृष्ट धनुर्धाऱ्यांचाच विजय होत असे.ही एक पारंपरिक अस्त्रविद्या आहे. धनुर्वेदाच्या वर्गीकरणानुसार धनुष्याचा बाण हे एक यंत्रमुक्त म्हणजे यंत्राद्वारे सोडलेले अस्त्र होय. धनुष्य, बाण आणि बाण ठेवण्याचा भाता मिळून हे संपूर्ण अस्त्र बनते. धनुष्यबाण हे आक्रमक म्हणजे हल्ला करण्याचे अस्त्र आहे.
धनुर्विद्या खेळामुळे सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासात होतो. मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे व्यायाम यामुळे होतात.

धनूष्य, दोरी व बाण हे या अस्त्राचे मुख्य घटक. धनुर्विद्या खेळासाठी धनुष्य (बो), बाण किंवा तीर (ऍरो) आणि टार्गेट असे तीन प्रकारचे साहित्य लागते.

धनुष्य

लवचिक पण कठीण काठीला बाक देऊन तिची दोन टोके दोरीने जोडल्यावर साधे धनुष्य बनते. मोठ्या धनुष्यांचा उपयोग भारी बाण दूरवर मारण्याकडे होतो. त्यांचा लक्ष्यवेधही अचूक असतो. त्यांचे एक टोक जमिनीवर पायाने दाबून ठेवावे लागते. त्यांच्यावर तापमानाचा परिणाम लवकर होतो. म्हणून धनुष्याची दोरी फक्त कामाच्या वेळीच जोडावी लागते. तसेच धरून ठेवण्यातही कुशलता असावी लागते. अशा धनुष्यांवरून बाण झटपट सोडणे कठीण असते, म्हणून धनुर्धर आजानुबाहू आणि फार बलवान असावा लागतो. भारतात प्राचीन काळी मोठे धनुष्य सैनिकप्रिय होते. त्याने दोनशे मीटरपेक्षाही लांबवर बाण फेकता येतो.

दोरी

आतड्याचे स्नायू, वादी, वेतासारख्या वनस्पती किंवा कृत्रिम तंतू यांपासून धनुष्याची दोरी बनवितात. ती दोरी ओढताना दुखापत होऊ नये म्हणून बोटावर आवरण (मणिबंध) घालतात. धनुष्याच्या दोरीला ज्या, मौर्वी, प्रत्यंचा, गुण इ. शब्द वापरले आहेत. धनुष्यास दोरीला लावली म्हणजे ते सज्य होते. उष्ण व दमट हवामानात धनुष्याची व दोरीची कार्यक्षमता क्षीण होते.

बाण

बाणाचा दंड धनुष्याला जोडून ओढताना किंवा लक्ष्यावर आदळताना तो वाकता वा मोडता कामा नये.हा दंड सामान्यतः बांबू, वेत, साल, तंतुकाच किंवा पोलाद यांपासून बनविलेला असतो. दंडाच्या वजनावर बाणाचा पल्ला आणि गमनातील स्थिरता अवलंबून असते. बाणाच्या अग्रटोकाला संहारशीर्ष लावलेले असते. ते शीर्ष हाड, गारगोटी, तांबे, कासे किंवा पोलाद यांपासून बनवितात. निरनिराळ्या प्रकारच्या लक्ष्यासांठी सु. एकवीस प्रकारची बाणाग्रे आढळत असली, तरी घुसणारे, फोडणारे आणि तडाखा देणारे असे त्यांचे मूलतः तीन वर्ग संभवतात. शरीरात बाण घुसल्यावर रक्तस्त्राव होऊन प्राणी गतःप्रणा किंवा निर्बल होतो. अशा घुसणाऱ्या बाणांची अग्रे पुष्कळदा काटेरी असतात. गोल शीर्ष असलेला बाण तडाखा देऊन लक्ष्याला गतःप्राण करतो किंवा निपचित पाडतो. बाणाची लांबी दिड मीटरपर्यंत असतो. अडीच ते तीन मी. लांबीचेही बाण भारतात प्राचीन काळी असल्याचे दिसून येते.बाण दोरीवर चढविला गेला, तरी तो धरून ओढण्यासाठी मात्र आंगठा व बोटांचा (करंगळी सोडून) उपयोग केला जातो. धनुष्याची दोरी कानापर्यंत वा हनुवटीपर्यंत ओढण्याची पद्धत आहे. कमान एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाकविली, तर बाणाचा पल्ला कमी होतो. जमिनीला समांतर मारा करण्यासाठी बाण हलके, परंतु अग्रभागी जड असतात. याला भारतात ‘स्त्री’ बाण म्हणतात. शत्रूच्या डोक्यावर वा उंचीवरील लक्ष्यावर मारा करण्यासाठी बाण खाली पडताना त्याला द्रुतगती मिळणे आवश्यक असते. म्हणून ‘पुरुष’ बाण मागील टोकाला जड असतात. धनुष्याच्या रचनेला अनुकूल असेच बाण वापरावे लागतात व त्यांचे वजन आकारमान इ. गोष्टी एकसारख्या राखाव्या लागतात. केवळ सरावासाठी असलेल्या बाणास ‘नपुंसक’ बाम म्हणतात.

धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद असल्याचे चरणव्यूहात म्हटले आहेत. वसिष्ठ, विश्वामित्र, भरद्वाज, जमदग्नी इ. ऋषींनी वेळोवेळी तपश्चर्या करून परमेश्वराकडून धनुर्विद्या मिळविली म्हणून हे ऋषी धनुर्वेदाचे प्रणेते समजले जातात. मूळ धनुर्वेद उपलब्ध नाही.

स्थूलमानाने पाहता इ. स. चौथ्या शतकापासून धनुर्विद्येकडे एक क्रीडाप्रकार म्हणून पाहिले जाऊ लागले. जगातील बहुतेक देशांतही एक स्पर्धात्मक क्रीडाप्रकार म्हणून त्यास मान्यता लाभलेली आहे. या खेळातील धनुष्य सामान्यतः सु. १·८३ मी. (सु. सहा फूट) लांब असून ते लाकूड, शिंगे वा लोह यांपासून तयार करतात. धनुष्याच्या खालच्या व वरच्या टोकांना जोडण्यासाठी ताग, रेशीम किंवा कापूस यांच्या सुतापासून बनवलेल्या टणक दोरीचा वापर करतात. धनुष्याचे मध्यबिंदूपासून या दोरीपर्यंतचे अंतर सु. १५·२४ सेंमी. (सु. सहा इंच) असते. बाण देखील लाकडापासून बनवतात. तो सु. ६८·५८ सेंमी. (सु. २७ इंच) लांब व सु. १२·७० सेंमी. (पाच इंच) गोलाईचा असतो. त्याचे टोक धातूचे असून ते अणकुचीदार असते.
समोर लक्ष्य ठेवलेले असते. लक्ष्याचे अंतर हे स्त्रीपुरुष स्पर्धकांनुसार व त्यांच्या वयोगटानुसार वेगवेगळे असते. कोणाचा बाण किती लांबवर जाईल हे धनुष्याच्या मजबुतीवर व बाणाच्या वजनावरही अवलंबून राहते. लक्ष्य हे सामान्यतः जमिनीपासून सु. १२१· ९२ सेंमी. (४८ इंच) उंचीचे व तितक्याच व्यासाचे असते. त्यावर निरनिराळ्या रंगांची वर्तुळे काढलेली असतात. त्यांपैकी विशिष्ट रंगाच्या वर्तुळास बाण लागला, तर ठराविक गुण मिळतात. ते गुण असे : सोनेरी रंग – ९ तांबडा –७ निळा –५, काळा –३, पांढरा –१. जो धनुर्धर किंवा ज्या देशाचा संघ जास्तीतजास्त गुण मिळवतो तो विजयी होतो.

धनुष्य तीन प्रकारचे असतात. त्यात भारतीय बनावटीचे 7 ते7 हजारांपर्यंत, रिकर्व्ह प्रकाराचे 25 ते 30 हजारांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक कंपाउंड प्रकाराचे धनुष्य वापरतात. त्यांची किंमत लाख रुपयांपर्यंत असते. तसेच बाणाची किंमत 50 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत असते तर टार्गेटची किंमत साडेतीन हजारांपर्यंत असते.धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील विविध अंतरांच्या स्पर्धासाठी साधारणपणे फुटबॉल किंवा क्रिकेटच्या मैदानाच्या निम्मे आकाराचे मैदान आवश्यक असते. लहान जागेत १० मीटर, २५ मीटर, ५० मीटर आदी अंतराच्या स्पर्धाचा सराव करता येत असला, तरीही जेवढे मैदान मोठे असेल, तेवढा या खेळाचा सराव अधिक चांगला करता येतो