आनंदाचा परिजातक

छोटया छोटयाशा क्षणांतील
मजा चाखत जगता यावे
पार नसलेल्या आनंदाला मग
इवल्याशा मुठीत मावता यावे
थकून सायंकाळी घरी आल्यावर
प्रसन्न वदनी दीप उजळावे

दाराआड लपलेल्या गंमतीने
चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे
हेतूक – अहेतूक नाजूक कटाक्षांनी
मोहरत्या कळयांचे गंध व्हावे
जीवन डवरणा-या क्षणांना
धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे

दाटून येणा-या स्निग्धतेतून
पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे
जीवनाशी राखून जाळ अबाधित
विश्वासाने या मला वात्सल्य ल्यावे

चिमखडया गोड गोड बोलांना
भाबडे बोबडे प्रश्न पडावे
निरर्थक अशा हावभावांनीही
हसून हसून बेजार व्हावे
पक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाट
हिरव्याकंच साजाने नाचनाचावे
क्षितीजावर करुन सोनेरी उधळण
निसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे

महाल गाडया नि शेतीवाडया
कशास यांचे अप्रूप वाटावे
फुलवाया मळे आनंद अंगणी
वणवण फिरण्या ते का लागावे

आनंदाचा असा पारिजातक
सदैव दरवळतो मनामनात
शोधावा तेव्हा तो सापडतो
आपला आपल्याच आंगणात

आपडी थापडी

आपडी थापडी गुळाची पापडी

धम्मक लाडू तेल काढू !

तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !

चाउ माउ चाउ माउ !

पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !

गुळाची पापडी हडप !

घड्याळा घड्याळा थांब थांब

घड्याळा घड्याळा थांब थांब

किती वाजले सांग सांग

दोन तुझे काटे, लहान आणि मोठे दिसतात कसे.

दोन हात जसे भर भर धावतात

भर भर पळतात एक ते बारा,

एक ते बारा ह्याच्या पुढे जात नाही

पुढचे आकडे माहित नाही

भिंतीवर, टेबलावर कुणाकुणाच्या हातावर

ऐटी मध्ये बसायचं किती वाजले सांगायचं

एक कान पिरगाळला टिकटिक टिकटिक सुरु करा

दुसरा कान पिरगाळला पहाटेला उठाव मला

सारा जग झोपलं तुला नाही विसावा

सारखा काम काम काम कशाला धावतोस सांग सांग

धरणीमाता

तू माय मी लेकरू
धरणीमाता तुला कसा विसरू

रानात चरती गाय वासरू
किल बिल करती चिमणी पाखरू

मायेचा तुझ्या हा खेळ सुरु
फुल झाडे रानात सारे
शोभून दिसती फुलपाखरे

पाहुनी आनंदी झालं तुझ लेकरू
धरणीमाता तुला कस विसरू
तू माय मी लेकरू

नदी नाले झुळ झुळ करी
गाणे गाती सुरात सारे
दंग होऊन गेले रानात सारे
कवतुक तुझे मी किती करू
तू माय मी लेकरू

चल रे चल गड्या

चल रे चल गड्या झिंमा खेळूया
वडा्च्या पारंब्यावरती झिंमा खेळूया

उन्हाळ्याची सुटी लागली
आजोबाच्या गावांला जाऊ या
चल रे चल..

आजोबाचे दूर गांव
नांव नाही मलां ठांव
चल रे चल..

गांव किती लहान ते
शेत किती‍ छान ते
चल रे चल..

आजोबांच्या आमराईतील
गोड आंबट कैरया खाऊया
चल रे चल..

गण्या, दिन्या अनं बाळू सोबत
आबडूबली अनं लपाछपी‍ खेळू या
चल रे चल…

अंगनातील झोपाळ्यावर झोके घेऊया
झोपतांना रात्रीच्या चांदण्यात न्हाऊया
चल रे चल…

उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

पप्पा सांगा कुणाचे

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।

गोरी गोरीपान फुलासारखी

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…

गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…

गाडी आली गाडी आली

गाडी आली गाडी आली – झुक्‌ झुक्‌ झुक्‌

शिट्टी कशी वाजे बघा – कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे – भक्‌ भक्‌ भक्‌

चाके पाहू तपासून – ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे – भूर्‌ भूर्‌ भूर्‌

कोठेहि जा नेऊ तेथे – दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा – छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌

गाडीची ही घंट वाजे – घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला – पट्‌ पट्‌ पट्‌

सामानाहि ठेवा सारे – चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून – शुक्‌ शुक्‌ शुक्‌

गाडी आता निघालीच – झुक्‌ झुक्‌ झुक्‌

भांडण

ढग अन विजेचे भांडण झाले
शब्दाने शब्द वाढतच गेले !

ढगाने केला गडगडाटा
वीजेने केला थयथयाट ।

लख्खकन वीज निघून
गेली भू मातेच्या कुशीत कोसळली ।

ढगाला चूक उमजली
मातेवर मोत्याची बरसात झाली |