बाळापूर
विदर्भातील अकोला हा महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर असून ते बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.
मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याश्या उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरुज बांधून संरक्षणाची सिद्धता केलेली आहे.
बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करुन आहे. याचे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महीरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख तिसरा दरवाजा आहे. यालाही महीरप केलेले आहे.
दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करुन त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत. तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायरी दिसते.त्यावरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरुन किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरुन बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करुन देतात.
आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजुंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.
बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जुन पहावी अशीच आहे.