भोरगिरी
पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.
राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.
शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदीपर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.
भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.
राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्यात चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्यात आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.
भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारून गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते.
गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहेकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहेपाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.
आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.