दौलतमंगळ

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामधे आहे. अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो.

भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामधे आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत.पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे. दौलतमंगळ किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग सोयीचे आहेत. पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा गाडीरस्ता आहे. माळशिरस हे लहानसे गाव किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावाकडून आहे. यवतच्या दक्षिणेला दौलतमंगळ आहे.

दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्व कसेबसे टिकवून उभे राहीलेले दिसतात. किल्ल्याचा दरवाजा, पायर्यांचा मार्ग, पाण्याची टाकी असे वास्तूविशेषही पहायला मिळतात.किल्ल्याचे भग्नावशेष पाहून आपण निश्चितच खिन्न होतो. खिन्न मनाने आपण भुलेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो. मंदिर पाहिल्यावर मनाची उदासिनता कुठल्या कोठे पळून जाते आणि आपण प्रसन्न मनाने मंदिराचे शिल्पकाम न्याहळू लागतो.

मुख्य मंदिराच्या बाहेरुन भिंत बांधून मंदिराची सुरक्षितता वाढवल्याचे दिसून येते. मंदिरामधील अनेक मुर्त्यांची तोडफोड केल्याचे दिसते. वरच्या भागातील गिलाव्यामधील मुर्ती मात्र शाबुत असल्याचे पहायला मिळते.

दौलतमंगळ किल्ला पहायला अर्धा तास पुरतो. पण मंदिर निरखायला मात्र किमान तासभर तरी हाताशी पाहिजे. कलाकारांची सौंदर्यवृष्टी आणि कलाकारी मनाला भावते तसेच शिल्पांची अदाकारी ही आपल्याला थक्क करते.

भुलेश्वर परिसरातून वज्रगड, पुरंदर, सिंहगड किल्ले दिसतात तसेच जेजुरी, ढवळेश्वर आणि सपाटीवरचा विस्तृत प्रदेशही पहाता येतो.

दौलतमंगळाच्या भेटीत आपण जेजुरी अथवा ढवळेश्वरालाही भेट देवू शकतो. 

Click here to add your own text