‘वसुधैव कुटुम्बकम्’ या दोन शब्दांत ’मराठी ग्लोबल व्हिलेज’ संकेतस्थळाच्या संकल्पनेचे सार सामावले आहे!

जगात मराठी भाषा ९,००,००,००० पेक्षा अधिक लोकांकडुन भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून वापरली जाते. लोकसंख्येतील क्रमवारीनुसार मायमराठी मातृभाषा जगात पंधरावी तर हिंदुस्तानातील चौथी भाषा होय.

‘माझा मराठीचा बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन।’ या शब्दात अमृततुल्य मराठीचा गोडवा संत ज्ञानेश्वरांनी वर्णिला तर ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी।’ शब्दांत आपली सगळ्यांचे मनोगत, आपल्या मायमराठीची महती कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांनी व्यक्त केली!

महाराष्ट्राची संस्कृती वैविध्याने नटलेली परंतु स्वत:ची ओळख राखणारी…. शौर्याचे प्रतिक म्हणजे महाराष्ट्र… कलेची ओळख म्हणजे महाराष्ट्र… साहित्याची खाण म्हणजे महाराष्ट्र… सौन्दर्याचे लेणे म्हणजे महाराष्ट्र… संस्कृतीचे वरदान लाभलेला महाराष्ट्र…. आधुनिकतेचा साज ल्यायलेला महाराष्ट्र… परंपरेची शान म्हणजे महाराष्ट्र… आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारलेला महाराष्ट्र… शेतीपासुन ते तंत्रज्ञानापर्यंत श्रेष्ठत्वाचे वरदान लाभलेला महाराष्ट्र… कला – साहित्य – क्रीडा – विज्ञान – संस्कृती सर्वच बाबतीत आघाडीवरती असलेला ‘आपला महाराष्ट्र’!

महाराष्ट्रातील मराठी माणसाने आज अटकेपार झेंडा सर्वार्थाने रोवला आहे. जागतिक पातळीवर मराठी माणसाने स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे… जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये वसलेल्या मराठी माणसाची नाळ मात्र महाराष्ट्राशी, जन्मभूमीशी, मातृभूमीशी अद्यापही जोडलेली आहे!

महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्राबाहेर स्वत:च्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या दिग्गजांबद्दल वाटणारा अभिमान ,त्यांचं कार्य कर्तृत्व,मराठी संस्कृती बद्दलचा अभिमान,   महाराष्ट्रापासुन दूर वसलेल्या आपल्या बांधवांना महाराष्ट्रात राहुन विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करणाऱ्या संस्थांशी जोडणारा दुवा म्हणजे ‘मराठी ग्लोबल व्हिलेज’!

एक ‘मुक्त व्यासपीठ’ ज्यावर अवघ्या विश्वातील मराठी आपापसांत संवाद साधु शकतात, विचारांचे आदान-प्रदान करु शकतात… ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ!’ उक्तीनुसार सर्व मराठी माणसांनी पूढे जाण्यासाठी मार्ग म्हणजे हे संकेतस्थळ! आज जग जवळ आले आहे… आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्यातील अंतर मिटले आहे! सर्वार्थाने आज ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच ’अवघे विश्व आपले एक घर’ आणि सर्व मराठी आपले कुटुंबिय ह्या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने व सक्रिय सहभागामुळे यशस्वी होईल याची खात्री आहे!

– सौ. मृदुला(जोशी) अतुल पुरंदरे

(मराठी ग्लोबल व्हिलेज)