गडचिरोली जिल्हा

मित्रांनो ! विदर्भ म्हटलं की पाण्याची कमतरता… अतिउष्ण रुक्ष प्रादेशिकता… झणझणीत जेवण आणि तशीच काहिशी रुक्ष आणि तेज माणसं… असं काहिसं समीकरण आपल्या पैकी बहुतेकांचं असावं ! व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच प्रादेशिकता तितक्या विविधता ! विदर्भातली भटकंती या सदरात आपण महाराष्ट्रातल्या या वैविध्याने नटलेल्या भूभागाची शाब्दिक पण बोलकी भटकंती करूया ! आशा करते की ही भटकंती नक्कीच आपणास विदर्भ दर्शनाकरीता प्रोत्साहित करेल !

विदर्भातली ही भटकंती आता आपण अत्यंत दुर्गम पण हिरव्या गर्द वनराईत वसलेल्या गडांच्या अद्भुत अशा गडचिरोली जिल्ह्याकडे वळवुयात.

भामरागड

दोस्तांनो ईशान्य भारताला ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखले जाते हे आपणास ठाऊक आहेच. गडचिरोली जिल्ह्याचा भामरागड तालुक्यातील आठ गावांचा समूह असलेला बिनागुंडाचा निसर्गरम्य परिसर त्या सेवन सिस्टर्स एवढाच अद्भुत. या भागात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असला तरी बिनागुंडा, कुव्वाकोडी, फोदेवाडा, कुर्रेमर्का, हामनमक्का, पुंगासूर, पेरमिल, भट्टी हे आठ रम्य गावे येथे वसली आहेत. या आठ गावांचा एकमेकांशी रोटीबेटी संबंध आढळतो. सात डोंगर चढून सहा तास २० किमीचे अंतर लाहेरीवरून या भागात जाण्यासाठी आहे. बांबूच्या वाहतुकीसाठी हा तालुका रस्त्याने जोडला गेलाय.

बिनागुंडा-कौकोडी ही भामरागड तालुक्यातील केवळ खेडी नसून इतिहासाची साक्ष देणारी स्थळे आहेत ज्यांचा उल्लेख सर्वे ऑफ इंडिया मध्ये आढळतो. आदिवासींच्या बडा, माडिया जमाती येथे स्थापित झालेल्या आढळतात. वन्य वस्तु गोळा करणे हा येथील जमातीचा मुख्य व्यवसाय असला तरी स्थलांतरीत शेती, बांबू कापणे, तेंदूची पान गोळा करणे असे पारंपारिक उद्योग केले जातात. पर्यटकांसाठीचे विशेष आकर्षण म्हणजे येथील इंद्राचा धबधबा ! महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या दोन राज्यांना जोडणारा हा धबधबा हिरव्या गर्द टेकड्यांनी वेढलेला असून पश्चिमेस अबुजमातची खोल दरी या अद्भुत निसर्गास अनोखे सौंदर्य देते. सहा टेकड्यांना स्पर्शून जाणारा हा धबधबा म्हणजे हिरव्या वनराईत खळाळणारे एक अनुपम सत्य ! टेकडीच्या टोकावर वसलेल्या कुव्वाकोडी या गावाने आपले निसर्ग सौंदर्य आजही जपलेले आढळते.

हेमलकसा

आमटे कुटुंब चंद्रपुरच्या वरोऱ्यात आनंदवन निर्माण करून थांबले नाहीत तर दुर्गम भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात… जमातींमध्ये सजगता यावी या उद्देशाने डॉ.प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी हा प्रकल्प लोकसहभागातून यशस्वीरीत्या साकारला आहे. मानवसेवा, पशु-पक्षांशी जिव्हाळ्याचे नाते याची सजीव अनुभूती घ्यावी ती डॉ.आमटे दांपत्याच्या हेमलकसा येथील प्रकल्पाच्या प्रत्यक्ष भेटीतूनच !

एटापल्ली

एटापल्ली तालुक्याला घेरुन जातात त्या सुरजगड टेकड्या. या टेकड्या २७ कि.मी. पर्यंत पसरलेल्या आहेत. त्या सुरजगड पहाडी या नावाने ओळखल्या जातात. वनराई आणि वन्यजीव यांच्या वैविध्यपूर्ण जाती-प्रजाती येथे आढळतात. घनदाट जंगल आणि हिरवीकंच वनराई पर्यटकांना आकर्षित करून जाते. येथील खडक लोहखनिज संपन्न असल्याने लोहखानी विकसीत करण्याचे शासनदरबारी विचाराधीन आहे यामुळे येथील विकास होईल आणि पर्यटकांना हा अद्भुत रम्य परिसर प्रवासास सोयीस्कर होईल यात शंका नाही. सुरजगडचे एक निराळे आकषर्ण म्हणजे येथील फुलपाखरांच्या विविध आकर्षक प्रजाती ! पावसाळ्यात येथे पर्यटन करणे काहिसे अवघड असले तरी नद्यांचे प्रवाह आणि धबधब्यांचे खळाळते स्वच्छ पाणी आणि गर्द झाडी यामुळे इथला पावसाळा फार अनोखा ! मात्र पर्यटनदृष्ट्या हिवाळा अधिक सुखद. पेठा हे गाव टेकडीच्या पायथ्याशी वसलेले असून सेवा समितीने आरोग्यसुविधा उपलब्ध केलीली आहे. ‘चंद्रखांडी’ हे आणखी एक पर्यटक स्थळ पेठ्याहून दोन किलोमीटर अंतरावर आहे. 

चपराळा

चपराळा हे एक फार प्रसिद्ध धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळ जे प्रशांत धाम या नावाने ओळखले जाते ! येथील मंदिराची स्थापना महाराज कार्तिक स्वामी यांनी केली आहे. येथे शिव, साईबाबा, हनुमान, दुर्गा आणि ईतर देवीदेवतांची मंदिरे पर्यटकांना आपलसं करतात. वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमातून झालेला प्राणहितेचा उगम मनाला प्रसन्न करणारा ! प्राणहिता आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमांमधला दुवा जो चपराळा वन्य जीव अभ्यारण्यास हिरवी नवलाई देऊन जातो. मुलचेरा अधिकारक्षेत्रांतर्गत येणाऱ्या या अरण्यात प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळतात. 

एलापल्ली

गडचिरोलीहून १६ की.मी. अंतरावर असलेल्या या सुंदर आणि रम्य अशा ठिकाणी १९५३ साली
पशु संवर्धन केंद्र स्थापित करण्यात आले.

जैवविविधता

या परिसरातील जैव विविधता अति प्राचीन असून ऊंच-ऊंच झाडी, विविध प्रकारची वनराई, वन्यजीव वैविध्य सारे काही अद्भुत… रम्य… निराळे ! कारण सारे काही नैसर्गिकरित्या निसर्गाने जणु काही आपल्या साठी राखलेले ! मेडापल्लीचा सरोवर आणि तेथील शैवाल… जैव विविधता… अभ्यासकांना खेचत असतात. ३९.७० मीटर ऊंचीचा सर्वाधिक ऊंच टिक वृक्ष येथे आहे. वन संवर्धन कायद्यामुळे येथील वनराई आजही आपली अनोखी निराळी हिरवी नवलाई आजही जपून आहे !

पर्यटनासाठी उत्तम कालावधी- ऑक्टोबर ते फेब्रुवारी

जवळचे विमानतळ
नागपुर (२९० .मी)
लोहमार्गे: बल्लारशा (११५ की.मी) मुंबई-चेन्नई मेन लाईन वर
रस्ता मार्गे: चंद्रपुरहून बसेस उपलब्ध (१३५की.मी.)

संकलन – तृप्ती काळे, नागपुर

स्रोत – महान्यूज