कुंजरगड

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. या गिरीदुर्गाच्या मधे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरु होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे.

कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे. दुर्गम ठिकाणी वसलेल्या फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. कुंजरगडाला भेट देण्यासाठी एका मार्गाने चढाई करुन दुसर्‍या मार्गाने उतरल्यास एक उत्तम अशी भटकंती करता येते.
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव जोगा हे धरण आहे. धरणाच्या दक्षिणेकडून अहमदनगर-कल्याण हा राजरस्ता जातो. तर पाण्याच्या फुगवट्याच्या उत्तर अंगाने खिरेश्वरला जाणारा गाडीरस्ता आहे. या रस्त्यावर गवारेवाडी नावाची लहानशी वस्ती आहे. येथे पायउतार होणे सोयीचे आहे. येथून खिरेश्वर तीन-चार कि.मी. आहे. धरणाच्या जलाशयाकडे पाठ केल्यास समोर बालाघाटाची डोंगररांग पूर्व-पश्चिम पसरलेली दिसते. या डोंगररांगेत एक नाकाड थोडे बाहेर आलेले दिसते. या नाकाडाच्या बाजूला एक घळ उंचावरुन खाली आलेली आहे. याच घळीमधून फोफसंडीला जाणारी पायवाट आहे. या वाटेची चौकशी वाडीतील गावकर्‍यांकडे केल्यास फायद्याचे ठरते.
 
आपण तासाभरात घळीच्या माथ्यावर पोहोचतो. जशी जशी आपण उंची गाठतो तसे तसे माळशेज परिसराचा निसर्ग आपल्यासमोर उलघडत जातो. माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड दिसू लागतात.
 
घळीच्या माथ्यावरुन डावीकडे वळून आपण फोफसंडी च्या वाटेला लागायचे. अनेक टेकड्या आणि घळीना वळसे मारीत आपण दोन-एक तासात फोफसंडीमध्ये दाखल होतो.
 
फोफसंडीतून समोरच कुंजरगडाचे दर्शन होते. गडाची येथून पुढची वाट सोपी आहे. तरी फोफसंडीतून एखादा वाटाड्या अवश्य घ्यावा कारण वाटाड्या असल्याशिवाय कुंजरगडाला असलेला एक निसर्गनिर्मित चमत्कार आपल्याला पहायला मिळणार नाही.
 
कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायर्‍यांचा मार्ग आहे. पण समोरच्या तुटलेल्या तटबंदीमधून गडप्रवेश करता येतो.
 
कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात.
 
गडाच्या माथ्यावरुन मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते. संपूर्ण गडफेरी करण्यास तासभराचा अवधी पुरतो.
 
गडफेरीकरुन पायर्‍यांच्या मार्गाने गड उतरावा. पायर्‍या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. इथेच सोबतच्या वाटाड्याची गरज लागते. गुहेच्या आतल्या कोपर्‍यात एक सापट तयार झाली आहे. विजेर्‍यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जावून नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमीनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.