Mahalaxmi Vrat

अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुखसमाधान सतत रहावे, हा त्यामागील हेतू असतो.व्रत केल्याने उत्तमफलांचा लाभ होतो.

मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करुन शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यावर श्रध्दा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

महालक्ष्मी व्रत – पूजेची मांडणी –

महालक्ष्मी व्रत पूजेची मांडणी कशी करावी?

  • घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी.
  • पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा.
  • चौरंगावर कोरे(नवीन कापड) अंथरावे.
  • कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालावी.
  • त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
  • कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी.
  • विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.
  • चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा.
  • घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मग फोटो ठेवू नये.
  • मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.
  • त्याचेवर शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.
  • अशी पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी.

पूजा मांडल्यावर महालक्ष्मी व्रत कथा  वाचावी.  त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे. पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे. तिला हळदी-कुंकू वहावे. नमस्कार करावा.

पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मीदेवीने असे कथन केले आहे की, ‘माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील, तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे!’

महालक्ष्मी व्रत – नियम

गुरुवारी प्रात:काळी उठावे. अंघोळ करावी. शुध्द अंत:करणाने व सश्रध्द भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करुन, सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी-कधी आकस्मिक अडचण उद्भवते; अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा- आरती करुन घ्यावी. एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास पक्त पूजा, आरती करावी. कहाणी स्वत: वाचावी अथवा ऎकावी. व्रताची पूजा व कहाणी ऎकण्यास शेजार्‍यांना निमंत्रण द्यावे.

सायंकाळी गाईची पूजा करावी. तिला नैवेद्य द्यावा. नित्याप्रमाणे उद्यापनाचे दिवशी पूजा, आरती करावी. कहाणी वाचावी. सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी-कुंकू द्यावे. एक-एक फळ व व्रताच्या कथेची एक-एक प्रत द्यावी. शक्य झाल्यास ब्राम्हणांना शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसर्‍या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरु करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. हमखास यश लाभते.