मल्लखांब

मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे.कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतींचे प्रकार करीत असल्याने त्यास हे नाव पडले. कुस्तीगिराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा, डावपेचात्मक सफाई इ. गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभटदादांनी मल्लखांबावरील निरनिराळ्या मेहनतींचे व उड्यांचे प्रकार तयार केले. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्याच्यावर सराव करायचा तो मल्लखांब. अशा त-हेने कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची सुरुवात झाली.

मल्लखांबाचे बावीस प्रकार

मल्लखांबाचे एकंदर बावीस प्रकार आहेत. प्रचलित साध्या (किंवा स्थिर) मल्लखांबाखेरीज अन्य प्रमुख उपयुक्त प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

वेताचा मल्लखांब

शरीराची लवचिकता व संतुलन राखण्याच्या दृष्टीने वेताचा मल्लखांब फार उपयुक्त असतो. सुमारे ३ ते ४ मी. लांबीचा लवचिक वेत लोखंडी हुकाला टांगला जातो.
टांगता मल्लखांब : १ १/२ ते २ मी. उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. हा मल्लखांब टांगलेला असल्याने तो स्वतःभोवती तसेच वर्तुळाकृती फेऱ्यातही फिरत असल्याने खेळाडूला विशेष कोशल्य आत्मसात करावे लागते.


निराधार मल्लखांब

केवळ १ ते १ १/२ मी. उंचीचा हा मल्लखांब बुंध्यात तिरपा छाट घेतलेला असतो. तो जमिनीत न पुरता पाटावर, अथवा बाटल्यांवर ठेवलेल्या स्टुलावर (बाटलीचा मल्लखांब) ठेवला जातो. यावर आसने आणि फरारे या गटांतील प्रकार प्रामुख्याने केले जातात. मल्लखांबास कोणताही आधार नसल्याने खेळाडूस आपले कौशल्य पणास लावावे लागते. श्वासनियंत्रण, शरीर-संतुलन यांसारखी व्यायामकौशल्ये यांमुळे साध्य होतात. याबरोबरच बाटलीवरील, पलित्याचा, हत्यारी मल्लखांब इ. प्रकारही काहीसे प्रचलित आहेत.

मल्लखांबावरील मनोरे

प्रामुख्याने प्रात्यक्षिकांसाठी मल्लखांबावर मनोरे सादर केले जातात. या प्रकारात एकाच वेळी १० ते २० खेळाडू मल्लखांबावर तसेच जमिनीवरही आपापल्या जागा पटकावतात आणि कमळ, देऊळ, मत्स्याकृती, गरूड, उडत्या आकृत्या इ. प्रकारचे मनोरे सादर करतात. अत्यंत आकर्षक असे हे मनोरे व्यायामाच्या दृष्टीने दुय्यम महत्त्वाचे आहेत. प्रात्यक्षिकातच त्यांना विशेष महत्त्व आहे. अशा मनोऱ्यांच्याही स्पर्धा घेतल्या जातात.

मल्लखांबावरील कसरतींमुळे व्यक्तीमध्ये शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळपणा, संतुलन, साहस इ. गुण वाढीस लागतात. शरीराचे स्नायू पिळदार व बळकट होऊन विशेषतः पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो. तद्वतच यकृत, मूत्रपिंड, प्लीहा इ. अवयवांची कार्यक्षमता वाढते व रक्तभिसरण क्रिया सुधारते. कुस्तीप्रमाणेच जूदो, ॲथ्‌लेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, घोडदौड इ. अनेक खेळांत हा व्यायामप्रकार उपयुक्त ठरतो.

टांगते मल्लखांब

हा मलखांबाचा हलता प्रकार आहे. छताला अडकवून खाली लोंबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर मल्लखांबासारखा केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते. त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते.

मल्लखांबाचे आकार व प्रकार


मल्लखांबाचे आकार व प्रकार अनेक प्रकारचे आहेत. पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला मल्लखांब हा २ ते २ १/२ मी. उंचीचा, शिसवी अथवा सागवानी लाकडाचा, वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा खांब असतो. अंग, मान व बोंड असे त्याचे तीन भाग असतात :

(१) अंग : मल्लखांबाच्या बुंध्यापासून मानेपर्यंतच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘अंग’ असे म्हणतात. या भागाचा घेर बुंध्याशी ५५ ते ६० सेंमी., मध्यास ४५ सेंमी., तर मानेजवळ २५ ते ३० सेंमी. असतो.
(२) मान : मल्लखांबाच्या अंगाच्या वर, १५ ते २० सेंमी. उंचीचा जो बारीक, निमुळता नसलेला सरळ भाग असतो, त्याला ‘मान’ असे म्हणतात. त्याचा घेर १५ ते २० सेंमी. असतो. या भागाच्या खालच्या बाजूला अंग व वरच्या बाजूला बोंड असते.
(३) बोंड : मल्लखांबाच्या सर्वांत वरच्या गोलाकृती भागास ‘बोंड’ असे म्हणतात. त्याची उंची ५ ते ७ सेंमी. व घेर १० ते १५ सेंमी. असतो.

मल्लखांबांची उंची जमिनीच्या वर २ ते २ १/२ मी. असते व तो जमिनीखाली १ ते १ १/२ मी. पुरावा लागतो. मल्लखांब गुळगुळीत रहावा, तसेच तो घट्ट पकडता यावा व घसरू नये म्हणून अशुद्ध एरंडेल तेलाचा तसेच राळेचा वापर करतात.

मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट

(१) अढी : मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नासयू बळकट होतात.

(२) तेढी : मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस ‘तेढी घालणे’ असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इ. ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदा., साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी.

(३) बगली : मल्लखांब बगलेत निरनिरळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास ‘बगली’ असे म्हणतात.

(४) दसरंग : मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला ‘दसरंग’ असे म्हणतात. हा ‘दस्तरंग’ (दस्त म्हणजे कोपरापुढील हात) शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा वा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदा., साधा दसरंग, एकहाती दसरंग इत्यादी.

(५) फिरकी : मल्लखांबावर दसरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.

(६) सुईदोरा : सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात, त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला ‘सुईदोरा फिरणे’ असे म्हणतात. ह्याचेदेखील अनेक प्रकार आहेत.

(७) वेल : हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने,त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे, या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदा., साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकीकसाचा वेल इत्यादी.

(८) उतरती : ही वेलाच्या विरूद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेलाप्रमाणेच पकडी बदलत या क्रियेत मल्लखांबपटू खाली घसरत घसरत येतो. उदा., साधी उतरती, बगलीची उतरती इत्यादी.

(९) झाप : मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारांतून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे याला ‘झाप टाकणे’ असे म्हणतात.

(१०) फरारे : मल्लखांबावर हातांनी विविध प्रकारे धरून व पाय दूर ताठ करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला ‘फरारे’ असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. उदा., आकडी, गुरुपकड, बजरंग−पकड इत्यादी.

(११) आसने : निरनिराळ्या प्रकारची आसने मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात. उदा., पद्मासन, गरुडासन, धनुरासन, शीर्षासन, वृश्चिकासन इत्यादी.

(१२) आरोहण−उड्या : मल्लखांबापासून काही अंतरावरून पळत येऊन, अथवा मल्लखांबाच्या शेजारी उभे राहून, अथवा उडी मारून हाताने पकड घेता, अगर न घेता पायाने मल्लखांब अढीत अथवा तेढीत पकडणे यांना ‘आरोहण-उड्या’ असे म्हणतात.

(१३) उड्या : मल्लखांबावरून विविध प्रकारे दूर उड्या मारून जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘उड्या’ असे म्हणतात. यातच विविध कलाटींचा समावेश होतो.

(१४) ताजवे : मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकवून, मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ‘ताजवे’ (तराजू) असे म्हणतात. ह्याचे पोटाचा ताजवा व पाठीचा ताजवा हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. ताजवे म्हणजे फरारे या प्रकारातीलच पोट-उड्या म्हणाव्या लागतील.

(१५) सलाम्या : अढ्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन, शरीर उलटे करून अढी न मारता पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘सलामी मारणे’ असे म्हणतात. सलामीच्या पकडीनुसार त्यांना एकहाती, दुहाती, बगलीची अशी नावे आहेत.

(१६) मल्लखांबावरून विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे अढीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी व कलाट असे प्रकार आहेत. ह्या प्रकारांमध्ये नावीन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यांसारखे नवीन प्रकार केले जातात.

मल्लखांबाच्या कोणत्याही पातळीवरील स्पर्धा साधारणपणे कनिष्ठ, मध्यम, व वरिष्ठ अशा तीन गटांत घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूस मल्लखांबाच्या १६ कसरत−गटांमध्ये विविध प्रकारे, साधारणपणे ९० सेकंदांच्या कालावधीत आपले कौशल्य दाखवायचे असते.मल्लखांब परदेशात लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’चे कार्य उल्लेखनीय आहे.

आठ इंग्रजी ‘सी ’ कसोट्या – १. Concentration (एकाग्रता), २. Coordination (अनुसंधान), ३. Confidence (आत्मविश्वास), ४. Courage (धैर्य), ५. Control (नियंत्रण) ६. Cost effectiveness (मूल्य परिणामकारकता),७. Creativity (सृजनशीलता) व ८. Culture(संस्कृती) परिपूर्ण करणारा मल्लखांब हा एकमेव खेळ असावा आणि म्हणूनच मल्लखांबाला ‘पायाभूत खेळ’ किंवा ‘Mother Discipline’ मानले जाते.

मल्लखांबावर वेगवेगळ्या कसरती, अढ्या-तेढ्या, फिरक्या-गिरक्या, वेल-दसरंग, आसने, विळखे-फरारे, उड्या, झापा आदि प्रकार केले जातात. मल्लखांबाचे अशा हालचालींमुळे होणारे फायदे अमाप आहेत. तेल लावलेल्या खांबाभोवती संपूर्ण शरीराचे सतत घर्षण झाल्याने पूर्ण शरीराला उत्कृष्ट मालीश होते. उलट्या-सुलट्या वेगवान हालचालींमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था आदि शरीरांतर्गत व्यवस्था कार्यक्षम होतात. हातापायांच्या आढ्या-तेढ्या, विळखे-फरारे, झापा यांमुळे हातापायांचे पंजे, पोट-या, मांड्या, दंड, खांदे आदींच्या अंतर्गत संस्था अधिक कार्यक्षम होतात. वेल, दसरंग, फिरक्या- गिरक्या, सर्पाकृती गतिमान हालचालींमुळे कंबरेचे व पोटाचे स्नायू, बरगड्या आणि आरोग्याची गुरुकिल्ली असलेला पाठीचा कणा यांना बळकटी येते. त्याशिवाय यकृत, प्लिहा आणि अंतरिंद्रियेही कार्यक्षम बनतात. मेद, सुटलेले पोट, वाढलेली चरबी कमी होते. केवळ शारीरिक नव्हे तर अनेक मानसिक कुवतींचाही विकास मल्लखांबामुळे होऊ शकतो.