स्त्रियांची पारंपारिक लोकनृत्ये
मंगळागौर, गौरीपूजा, कोजागिरी, हरितालिका, नागपंचमी इ. स्त्रियांच्या सण-उत्सवांच्या प्रसंगी ती विशेषत्वाने केली जातात
मंगळागौर
मंगळागौरीत खेळले जाणारे खास स्त्रियांचे खेळ हे महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित आहे. अगदी पाच-सात वर्षांच्या मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या आजींपर्यंत सर्वच वयोगटांतील स्त्रिया यात उत्साहाने सहभागी होतात. जुन्या-जाणत्या स्त्रियांकडून माहिती घेतल्यास या खेळांचे तब्बल ७२ प्रकार व उपप्रकार सांगितले जातात. प्रत्येक खेळाला लयबद्धता आहे व त्यासोबतची गाणी ही स्त्रीभावनांचे, तिच्या कौटुंबिक सुखदु:खांचे हे प्रतिबिंब
आहे. या खेळांतून आणि त्या सोबतच्या गाण्यांतून वागण्या-बोलण्याची, स्वत:चा आणि कुटुंबातील इतरांचाही तान-मान व तोल सांभाळण्याची शिकवण नकळतच दिली जायची. आरतीनंतर प्रथम गणेशाची व त्यानंतर मंगळागौरीची कहाणी सांगितली जाते. नवदांपत्यास सुखी व समृद्ध वैवाहिक जीवन लाभावे, हा मंगळागौरीच्या नृत्यांचा उद्देश असतो. या नृत्यांतून उत्कट आनंदभाव, उसळते जोषपूर्ण चैतन्य व आकर्षक, गतिमान लय यांचे दर्शन घडते. या नृत्यांबरोबर बव्हंशी पारंपरिक स्त्रीगीते म्हटली जातात. महाराष्ट्रातील स्त्रीजीवनाचे प्रतिबिंब या नृत्यांतून उमटते.
मंगळागौरीची पूजा केलेला चौरंग फुलापानांनी सजविला जातो व त्याला शिवलिंगाचे रूप दिले जाते. मनोभावे पुजलेल्या या शिवपार्वतीच्या साक्षीने रात्र जागविली जाते. पहाटेपर्यंत चालणारे खेळ हे मंगळागौरीचे खास मराठी अंग. मंगळागौरीचा जागर हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. रात्रीच्या जेवणानंतर विविध खेळ खेळून रात्रभर मंगळागौर जागवली जाते. फुगडी , झिम्मा , गाठोडं , फेर , गोफ , सूप , घागर घुमू दे , खुर्ची का मीर्ची , किस बाई किस , कोंबडा , किकिच पान , दिंडा , सुपारी , काचकिरडा , पकवा , पिंगा हे सर्व मंगळागौरीचे खेळ शारीरिक व्यायामाचं एक उत्तम उदाहरण आहेत. घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. दुसरे दिवशी सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो आणि पुन्हा मंगळागौरीची आरती केली जाते. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात आणि विहीर , तळे , नदी यापैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात.
पट्टीच्या खेळणाऱ्या असतील तर साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, दंड फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, केरसुणी फुगडी, जाते फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी किंवा बैठी फुगडी, कासव फुगडी, पाट फुगडी, लोळण फुगडी, लाटणे फुगडी आणि फुलपाखरू फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात. फुगडीचे हे सर्व प्रकार उत्तरोत्तर वाढत्या कसबाचे व शरीराची अधिकाधिक दमछाक करणारे आहेत.
फुगडीनंतर दोन-तीन प्रकाराचा झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, आटुंश पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस.. दोडका कीस, आगोटं-पागोटं, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, आळुंकी-साळुंकी, सासू-सुनेचे अथवा सवतींचे भांडण, आवळा वेचू की कवळा वेचू, किकीचे पान, माझी आई मोठी की तुझी आई मोठी, नखोल्या, ताक, सोमू-गोमू, काच-किरडा, धोबीघाट, होडी, मासा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळ रंगत जातात.
मंगळागौर खेळाची गाणी
कीस बाई कीस दोडका कीस
दोडक्याची फोड लागते गोड
आणिक तोड बाई आणिक तोड
कीस बाई कीस दोडका कीस
माझ्यान दोडका किसवना
दादाला बायको शोभना
कीस बाई कीस दोडका कीस
खुंटत मिरची जाशील कैशी
आई बोलवते ह्याबर करिते
बाबा बोलावतात ह्याबर करितात
सासू ओलाविते ह्याबर करिते
सासरा बोलवितो ह्याबर करितो
बाल बोलविते ………. ( सुटून जाते तेंवा पतीचे नाव घेते)
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागवली पोरी पिंगा !
फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !
शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !
भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !
तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !
भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !
भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !
नाच ग घुमा
‘नाच गो घुमा’या नृत्यात रुसलेल्या सखीला तिच्या मैत्रिणी नाचण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यातील नृत्याप्रमाणेच नाट्यही मोठे वेधक असते.
नाच ग घुमा, कशी मी नाचू ?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
फू बाई फू फुगडी चमचम् करतीया बुगडी !
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे !
आंबा पिकतो
आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो.
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून पोरी आल्या उठून
सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो
या या झिम्मा खेळाया
आमच्या वेण्या घालाया.
एक वेणी मोकळी
सोनाराची साखळी.
घडव घढव रे सोनारा.
माणिकमोत्यांचा लोणारा.
लोणाराशी काढ त्या
आम्ही बहिणी लाडक्या.
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पानोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे लागली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
निज रे निजरे चिलार बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी
दमून कोमेजलेल्या वशेळ्यांना व खेळणाऱ्या इतर बाया-मुलींना घरी जायचे वेध लागतात. जाण्याआधी पुन्हा एकदा मंगळागौरीची छोटेखानी आरती केली जाते व मंगळागौरीला दहीभाताचा नैवेद्य दाखविला की या धार्मिक व्रतातील पूजाविधीची सांगता होते.
पण निरोप घेण्याआधी पुन्हा एकदा नवविवाहितेला उखाण्याचा, नाव घेण्याचा आग्रह होतो.
श्री मंगळागौरीची आरती :-
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।