मराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे
मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचा दस्तावेज आहेत.
इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ५० हजाराहून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा पाहावयाचे झाल्यास मराठीइतका पत्रवाङ्मय-संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. मराठेशाहीतील राजकारणात स्त्रियांना प्रवेश नव्हता, असे म्हणता येणार नाही. अर्थात या काळात राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; एवढेच नव्हे तर प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. शिवमाता जिजाबाई, छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूंच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत.
या पत्रसंभारात शिवमाता जिजाबाईंचे एखादेच पत्र मिळते. अर्थात तेही शिवाजी महाराज मोहिमांत गुंतलेले असताना रयतेच्या तक्रारींचा निवारा करण्यासाठी लिहिलेले हुकूमवजा पत्र असून ते दि. २ जानेवारी १६५७ रोजी लिहिले आहे. त्या पत्रात त्या म्हणतात,‘‘आज रख्तरबाने राजेश्री जिजाबाईसाहेब दामदौलहू बजानेवू हुद्देदारांनी व देसमुखांनी व मोकदमानी मौजे पासांबे पेठ जिजापूर सुभासबा खमसैन अलफ वेदमूर्ती राजेश्री विनायकभट जोसी त्यासी साहेबी मेहरबान होऊनु मिरासी अजरा मऱ्हामतेलंकराचे लेकरी दिधला असे पेठमजकुराची बिता सदरहू मिरासीपणे तुम्हास दिधली असे ती तुम्ही सुखी मिरासपणाचा कारभार करीत जाऊन पेठेचे मामुरी करणे म्हणोन वेदमूर्ति जोसी यास दिधली असे.. तेणेप्रमाणे साहेब चालवतील मो।’’
छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई यांच्यावर दुर्दैवाचा फार मोठा घाला पडला होता. मोगलांनी रायगड किल्ला १६८९ मध्ये हस्तगत केला आणि येसूबाईसह सर्व कबिला मोगलांच्या नजरकैदेत तेव्हापासून खडतर जीवन व्यतीत करीत होता. मोगलांच्या बंदिवासातील या राजमातेने १७०५ मध्ये अहमदनगरच्या किल्ल्यातून चिंचवडच्या मोरया गोसाव्यांकडे कर्जाची याचना करणारे जे पत्र लिहिले आहे ते भावना हेलावून सोडणारे असून प्रस्तुत पत्र म्हणजे स्त्रियांनी लिहिलेल्या पत्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून दाखविता येईल. विनयशीलता, वडिलांबद्दलचा आदर, संयम इत्यादी राजमातेचे विविध गुण या पत्रातील प्रौढ भाषेतून व्यक्त झालेले दिसतात. येसूबाई लिहितात, ‘‘श्रीमत परमपूज्य तपोनिधी मुक्तिदायक सकलगुणांलंकरण देवमान्य वरदा मूर्तीपरायण राजमान्यराजेश्री.. विशेष आमचे वर्तमान तरी स्वामीपासी सत्यच लेखन केले पाहिजे.. नगरी साहुकारांचे पाच सात सहस्र ब्रह्मस्व (कर्ज)जाले. आता कोण्ही देत नाही. मागितल्यास पैकियास तगादे लाविले आहेत. त्याच्यामुळे बहुत कष्टी होतो. तो दु:खसागर स्वामीस काय म्हणून ल्याहावा.. महाराज कैलासवासी गेल्या जागाईत आपणावरी हा कसाला (संकट) प्राप्त झाला. इंगळास वोळंबे (वाळवी) लागले.. विशेष ल्याहावे तरी आपण अज्ञान, मूल असे लिहिता येत नाही अथवा ज्ञानही नाही. त्याहीवरी आपणांजवळी कोण्ही शाहणा कारकून नाही, अवाक्षराची क्षमा केली पाहिजे.’’
मराठय़ांच्या इतिहासात एक राजकारणी, कर्तृत्ववान व रणरागिणी म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या करवीर संस्थानच्या संस्थापिका व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी पतीच्या निधनानंतर अल्पकाळात युद्धक्षेत्र असो वा राज्यकारभार असो, या दोन्हींवर जबरदस्त पकड बसविली. सर्वानी मराठी राज्यासाठी संघटित व्हावे, ही त्यांची तळमळ होती. या संदर्भात त्यांनी कान्होजी झुंझारराव यास दि. १७ नोव्हेंबर १७०० रोजी पाठविलेले पत्र पाहिले, तर त्यांच्या धोरणाची, मनसुब्याची कल्पना येते. प्रस्तुत पत्रात त्या लिहितात, ‘‘कान्होजी झुंझारराव मरल देशमुख यास कोकणात हबशाने बहुत बलवल मांडल्याकारणाने त्यास बरा नतीजा पावावयाबद्दल रा. मल्हारराव यास सात हजार फौजेनिशी आज कुंभारली घाटे उतरोन चिपळुणास आले. त्यास सामील व्हावयाबद्दल आम्ही हमाल घेऊन स्वार होऊन गेलो. ऐशास हे पत्र तुम्हास पावेल ते क्षणी आपला अवघा जमाव, एक माणूस टाकून न देता सारा जमाव घेऊन बहुत सिताबाने येऊन सामील होणे. एक घटकेचा उजूर (उशीर)न करणे. आजचे प्रसंगी जो मसलत चुकवील, तो म्हणेजा गनिमादाखल असे समजोन बहुत सिताबाने येणे. उजूर केलिया साऱ्या मसलतीचीबदनामी तुम्हावरी होईल, हे समजून लिहिल्याप्रमाणे वर्तणूक करणे.’’
औरंगजेबाशी मुकाबला करताना ताराबाईंनी ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक अडचणींचा कधी विचार केला नाही.
औरंगजेबाशी मुकाबला करताना त्यांनी ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक अडचणींचा कधी विचार केला नाही. प्रसंगोपात लष्करी तळावरच मुक्काम ठोकून ताराबाई राहिल्या. त्यामुळे लष्कराच्या व अधिकाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमभावना व आदर निर्माण झाला होता. किल्ल्यावरील राजमंडळातही त्यांनी विश्वास निर्माण केला होता. या संदर्भात त्यांनी जानेवारी १७०२ मध्ये प्रतापराव मोरे यास लिहिलेले एक पत्र बोलके आहे. या पत्रात त्या प्रतापराव मोरे यांची स्तुती करून पुढे लिहितात, ‘‘संताजी पांढरे यांनी धाडस करून मलकापूरजवळचे मोगलांचे ठाणे काबीज केले आणि त्यांच्या फौजांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे विशाळगड मोगलांना घेता आला नाही. तसेच तिकडच्या इतर किल्ल्यांना धक्का लागला नाही. हे श्रेय तुमचे होय.’’
पेशव्यांचे आणि महाराणी ताराबाई यांचे सख्य कधीच नव्हते. पेशव्यांपासून सरदारांची मने परावृत्त करण्याच्या उद्देशाने लिहिलेले एक पत्र महाराणी ताराबाईंचे असून प्रस्तुत पत्र बरेच काही सांगून जाते. या पत्रात त्या लिहितात, ‘‘तुम्ही एकनिष्ठ सेवक विश्वासू हे जाणून चिरंजीव कैलासवासी याणी तो जागा तुमच्या वडिलांच्या स्वाधीन केला त्यामध्ये’’ ‘‘तुम्ही अधिकोत्तर सेवकपणाची रीत केली. यावरून तुम्हावर साहेब बहुत खुश आहेत. सालमारी मुल्लकाची खराबी जाहली. किल्ल्याची बेगमी नाही. कर्जदार जालो म्हणून तपासिले लिहिले. येसियास तुम्ही कार्यकर्ते आहा. साहेब तुमचे उर्जित करतील आणि कर्जवामाचीही वाट होईल, तुम्ही कोणेविसी चित्तांत दुसरा अर्थ न आणणे, तुमची निष्ठा जाणून मरातब योजिला आहे. त्याची सनद करून मागाहून पाठविली जाईल. प्रस्तुत राजश्री पंतप्रधान (बाळाजी बाजीराव) या प्रांते येणार म्हणून वार्ता आहे. येसियास आपले जागियाची बंदोबस्त करून बहुत सावधपणे राहणे. चार लोक व पतके सरदार यांस मायेत घेऊन गाहा करून अवघे येकदील होऊन साहेबाचा जागा जतन होऊन तुमचे सेवेचा मजुरा होये तो आर्थ कराल हा निशा साहेबाचा आहे, तरी आज्ञा केली हा मार चित्तांत आणून वर्तणूक करणे म्हणजे साहेब तुम्हावर कृपाळू होऊन ऊर्जित करतील आणि सर्व आर्थ तुमचे मनोदयानुरूप घडोन येईल हा निशा असोन देणे.’’
रामराजे यांना दत्तक घेण्यास सर्वात मोठा विरोध सकवरबाई या शाहूंच्या लाडक्या राणीचा होता. आणि त्यांनी कोल्हापूच्या छत्रपती संभाजी राजांची त्याकरिता फौजेसह मदत मागितली. तेव्हा महाराणी ताराबाईनी जे राजकारण केले ते त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचे द्योतक होते. छत्रपती संभाजीराजे फौजेनिसी सातारकडे निघाले, तेव्हा बाळाजी बाजीरावांच्या फौजेने त्यास वारणेजवळ अडकून ठेवले. दरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले (१५ डिसेंबर १७४९). तेव्हा या दत्तक प्रकरणास वेगळे वळण लागले. तत्संबंधी महाराणी ताराबाई लिहितात, ‘‘सकबार राहिल्यास राज्याचा डोहणा करेल, राज्य बुडवील, कोणाचे पाय भुईस लागू देणार नाही. या करिता बरोबर राहील तर फार चांगले. सहगमनाचा विचार कळेस तसा तिने करावा. मग पुढे विचार करणे तो करावा मग पुढे विचार करणे तो करावा. करवीरहून संभाजीस आणावयाचेसर्वाचे सल्लेस येणार नाही आणि मीही सल्ला देत नाही. माझे सुनेचा मुलगा पानगावास आहे. त्यास आणून गादीवर बसवावा, दुसरे काय?’’
दुसरे संभाजीराजे (करवीर) व त्यांची पत्नी राणी जिजाबाई यांनी बुद्धिपुरस्सर पेशव्यांशी (बाळाजी बाजीराव) सलोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने करवीर सरकारकडून सतत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हेतू असा की पेशव्यांनी गुप्तरीत्या केलेल्या कराराचा त्यांना विसर पडू नये. याच संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर (१७४९) जिजाबाईंनी सदाशिवरावभाऊंना लिहिलेल्या पत्रात कराराची आठवण देऊन त्वरा करण्याचे सुचीविले आहे. त्या लिहितात, ‘‘अविलंबे कार्ये दृष्टीस पडावे, लौकिक उत्तम दिसोन, यशास पात्र तुम्ही व्हावे. साहेबी सर्वाविसी येख्तयारी आपणावर टाकावी, ऐसे कित्येक मनोदय साहेबी कल्पून गत वर्षांपासून वेदशास्त्रसंपन्न राजश्री भटजीस लागोपाठ रवाना केले. ऐसे असता साहेबाचे प्रत्ययास गोष्ट दिसू नये. तेव्हा साहेब मध्यस्थ होऊन हुजूर वचन गुंतविले, याचा लौकिक कोणा प्रकारचा होणार? हा अर्थ चित्तात आणून तदनुरूप या उपरी पूर्व संदर्भाच्या (गुप्त कराराच्या) विचारानरूप अंगेजणीकरून स्वराज्यकर्तव्यार्थ.’’
जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत.
‘‘पेसवी बोली जाहली आहे व करारबाज यादी लिहून दिल्या आहेत. त्याप्रमाणे निदर्शनास साहेबाचे यावे, हुजूर विनंती केली आहे ती सत्यता होऊन राज्य उपयोगी मनसबा घडे ते करावे. ऐसे राजश्री बालाजी पंडित प्रधान यांस तुम्ही सांगोन त्वरेने करवावे. या गोष्टीचे तुम्हास आगाध कोणते आहे. सविस्तर वेदशास्त्रसंपन्न राजश्री श्रोत्री याजबद्दल आज्ञा सांगोन पाठविली आहे व पंडित मशारविल्हे यास आज्ञापत्र सादर असे त्यावरून साद्यंत कळेल. साहेब मध्यस्त तुमची निष्ठा दृढतर हा भरवसा साहेबास हुजून विनंती करून तीन संस्थानची ताकीदपत्रे घेऊन पाठविली आहेत. साहेबाचा तुमचा करारवजा कोणे प्रकारचा आहे. राज्यविसी पंडित मशारविल्हे यांचे मांडीचे उसे केले आहे. हाही अर्थ ध्यानात आहे. सारांश गोष्ट पूर्वसंदर्भाप्रमाणे हुजूर निदर्शनास साहेबी आणून द्यावे आणि यशास पात्र तुम्ही व्हावे, हा अर्थ चित्तात आणावा.’’
तेव्हा ‘पूर्वसंदर्भाच्या अन्वयानुरूप’ जिजाबाईंनी पेशव्यांना अनेकदा स्मरण करून देणारी पत्रे लिहिली. ‘स्वराज्याविषयी तुमच्या मांडीचे उसे केले आहे,’ असे भावनात्मक आवाहन करूनही, नानासाहेब कोणतीच गोष्ट जिजाबाईंच्या मनासारखी करेनात. याचा पुनरुचार जिजाबाईंनी इ.स. १७५९ मध्ये बाळाजी बाजीरावांना लिहिलेल्या एका पत्रात केला आहे, ‘‘साहेबाचा पडदा सेवकासी नव्हता म्हणून लिहिले ते खरे. आपल्याशी पडदा स्वप्नीही नाही. आपण बंधूच आहात.’’ याच वेळी सदाशिवराव भाऊ यांच्यावर मुजफरजंगाने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा यत्न केला; पण भाऊसाहेब त्यातून वाचले, ही वार्ता जिजाबाईंना जेव्हा कळली, त्या वेळी नानासाहेबांना त्यांनी मुद्दाम पत्र पाठवून भाऊसाहेबांच्या जिवावरील अरिष्ट टळल्याबद्दल एक सुरेख व मराठी भाषेचा नमुना ठरावे असे पत्र दि. ७ नोव्हेंबर १७५९ रोजी लिहिले. त्या पत्रात त्या आनंद व्यक्त करताना लिहतात, ‘‘प्रारंभापासून मुजफरजंग याचा मजकूर सर्वमासी हतबल असून पुन्हा आपण त्याचा संग्रह केला, वृश्चिक आपले गुण टाकीत असते की काय काडीचा मनुष्य, लक्षाची हानी केली होती. कुलीणास ईश्वर कसे उपेक्षील? याकरिता ज्यांचा तो फजित पावला. या उपरी सर्व प्रकारे करून आपले शरीर संवरक्षण करून साहेबास संतोषित जावे. प्रस्तुत राजश्री सदाशिवराव पंडित यासी तुस्त पाठविला आहे.’’ वरील पत्रावरून असे लक्षात येते, की जिजाबाईंचे पेशव्यांशी सलोख्याचे सबंध असले तरी त्यातून राजकारणाची दृष्टी सुटलेली नव्हती.
जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत. त्या दत्तक पुत्रास राज्यारोहणानंतर काही महिन्यांनी नृस्िंाहवाडीस देवदर्शनासाठी घेऊन चालल्या होत्या. आपल्या गैरहजेरीत भगवंतराव अमात्य यांनी करवीर राज्याची व्यवस्था पाहावी, अशी त्यांनी आज्ञा दिली. भगवंतरावांना ही जोखीम नको होती. त्यांनी सांगितले की, ‘हे काम आपणाकडून होणार नाही.’ अर्थात ही अमर्यादा होती; तथापि त्यांनी अमात्यांना स्वाभिनापूर्वक कळविले, की ‘‘आपण काम न कराल, तर फार मोठी अडचण होईल, अशातला भाग नाही; तसे तुम्ही समजूही नये. हे काम सामान्य कुणबिणींकडूनसुद्धा चालविता येईल.’’ आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी हा अभिनव प्रयोग केला. त्यांनी यशवंतराव शिंदे यांना कारभाराचे काम सांगितले व गंगू, रंगू, भागू, नागू आणि लिंगू अशा पाच सुज्ञ कुणबिणी पसंत करून शिरोळे, आळते, वडगाव वगैरे ठिकाणी कामे नेमून देऊन रवाना केल्या. त्यांनी व्यवस्थित आज्ञांचे पालक केले, अशी वदंता त्या वेळी प्रसृत झाली.
पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काही तरी कुरापत काढून सिंधुदुर्ग दि. १ मे १७६५ रोजी घेतला. करवीर राज्याचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घलण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोंकणातील अन्य किल्लेदारांना पत्रे लिहून सावधनतेचा इशारा दिला; तरीसुद्धा यानंतर इंग्रजांनी पुन्हा एक किल्ला यशवंतगडही ताब्यात घेतला. या घटनेबद्दल जिजाबाईंनी सावंतवाडीकरांचा कारभारी जिवाजी विश्राम यास दि. १२ मार्च १७६६ रोजी एक पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ‘कोवळा मोड आहे तो मोडल्याने उत्तम, भारी जाहलेने सर्वाचे वाईट होईल,’ असा इशारा दिला आहे. इंग्रजी सत्ता पुढे वरचढ होईल, याची जाण त्यांना होती; म्हणून त्यांनी हा इशारा त्या वेळी दिला.
पेशवेकालीन राजकारणी स्त्रियांमध्ये रघुनाथराव पेशव्यांची पत्नी आनंदीबाई, खंडेराव होळकरांची पत्नी अहिल्याबाई, नानासाहेब पेशव्यांची पत्नी गोपिकाबाई, खंडेराव दाभाडय़ांची पत्नी उमाबाई आदींचा विशेष उल्लेख करावा लागेल.
उत्तर पेशवाईत प्रसिद्धीस आलेली एक प्रमुख राजकारणी स्त्री म्हणजे राघाबोदादांची पत्नी आनंदीबाई! ‘शंभर राजकारणे करतील’ असा बाईचा लौकिक होता. ‘ध’चा ‘मा’ करणारी एक कारस्थानी स्त्री म्हणून इतिहास तिला अधिक ओळखतो. आनंदीबाई कोपरगावला बंदिवासात असताना त्यांची जी दिनचर्या लिहून ठेवली आहे त्यावरून आनंदीबाईच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास बरीच मदत होते. या दिनचर्येतील नोंदी आनंदीबाईच्या बोलण्यातील भाव पाहून केल्या आहेत. तिच्या अन्त:करणाची ॠजुता आणि मनाचा कणखरपणा आपल्याला दिनचर्या आणि तिच्या इतर पत्रांवरून दिसून येतो. आनंदीबाई नाना फडणिसांनी लादलेल्या जाचास कंटाळून आपला राग व्यक्त करताना रामायण-महाभारतातील दृष्टांत आणि दाखले देतात. यावरून यांचा वाचनाचा व्यासंग चांगला होता, हे दिसते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या, तशाच त्या लिहिण्यातही मोठय़ा हुशार होत्या, हे त्यांच्या अनेक पत्रांवरून दिसते. महत्त्वाची पत्रे त्या स्वत: लिहीत असत. त्यांनी स्वत: लिहिलेल्या पत्रांपैकी नाना फडणविसांना पाठविलेले एक पत्र फारच बोलके आहे, त्या पत्रात नानांची कानउघाडणी करताना त्या लिहितात-
‘‘आम्ही होऊन (पत्र) पाठवावे, तर कारणाखेरीज आम्हास पत्र पाठवितात म्हणौन तुम्हीच हसाल, हा काळ समजोन पत्रे न पाठविली. हल्ली पत्राचे कारण की तुम्ही तीन पिढय़ांचे दौलतीतील फडणीस असौन दौलताची तो गती जाली ती जाली. हल्ली यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनी होऊ पाहते. तुमच्या चित्तातील उगीच अढी जात नाही, आणि ब्राह्मणी तो बुडत चालली! या दौलतेत पूर्वी कारभारी जाले, त्यांनी ब्राह्मणी स्थापली व दौलतेची वृद्धी केली हा काळ प्रस्तुत श्रीसत्तेने आला! इंग्रज बुंदेलखंडापर्यंत दोन कंपू आले, आणिकही मागून येणार. या बारीक मोठा विचार जो करणे तो तुम्हीच करणे.. त्यापक्षी दोन्ही गोष्टींचा आंदेशा करून ब्राह्मणपण राहे ते करणे’’
बारभाईचा कारभार बाईंना नापसंत होता आणि सखारामबापू यांच्यावर तिचा विश्वास नव्हता. गृहकलहामुळे ब्राह्मणी राज्य बुडणार अशी तिला वाटणारी भीती तिने लिहिलेल्या या पत्रांतून व्यक्त होते. उपरोध, त्वेष यांनी ही पत्रे भरलेली आहेत. सखारामबापूंच्या पत्रात बाई लिहितात, ‘‘हे कालचक्र विपरीत आहे. परंतु आम्हास हाच भरवसा आहे की, तुम्ही कालचक्रासही फिरवाल, हे जाणून तुम्हांस पत्र लिहिले आहे. तरी ब्राह्मणी दौलत नीट राहून हुजूराचाही संतोष राहून सर्व गोष्टी बऱ्या होतील त्या कराव्या, न केल्या जन्मभर चांगले केले, आणि शेवटी म्हातारपणी इंग्रजांच्या घरात ब्राह्मणी दौलत घातली हे अपेश येई तो अर्थ न करावा.. सारांश हाच की इंग्रजांच्या हाती ब्राह्मण न चालता, दौलतीचा बंदोबस्त होऊन यावा. विशेष लिहावे तरी तुमचे दशांशही आम्हास समजत नाही. परंतु यश अपेश याचे धनी तुम्ही.. आम्ही लिहून विशेष तो नाही, तुम्ही मोजीतही नाही, परंतु आकार दिसत चालला, यास्तव सूचना लिहिली आहे.’’ या पत्रात सखाराम बापूंनी वृद्धापकाळी लग्न केल्याबद्दल आनंदीबाईने कसा टोमणा मारला आहे तो पाहा; ‘नवी भावजय लाडकी केली तिचे नाव काय ठेवले व दुसरी करावयाची कधी हा मजकूर विशेष लिहिला होता त्याचे उत्तर काहीच आले नाही’. आनंदीबाई अखेरीस एक माताच होती. दुसऱ्या बाजीरावाची आरवाचगिरी, फार खेळणे, व्रात्यपणा बाईंना मुळीच पसंत नव्हता. आपली व्यथा तिने थोडय़ाच पण प्रभावी शब्दांत बोलूनदाखविली आहे. ‘बाजीराव थोर झाले असता, अद्यापी मर्यादेची तऱ्हा नाही.’
एक वर्षी नाशिकच्या भागात पाऊस कमी पडल्याने भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा गोपिकाबाईंनी तेथील शेतकऱ्यांची जकात माफ करावी, म्हणून माधवरावांना पत्र धाडले.
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई तत्कालीन पेशवे कुटुंबात ज्येष्ठ आणि कर्त्यां होत्या. पेशव्यांची पत्नी म्हणून त्यांना घरात आणि घराबाहेर मान मिळे. पेशवेकालीन स्त्रियांमध्ये खुद्द गोपिकाबाईंनी लिहिलेली पत्रे उपलब्ध असून त्यांची संख्या तत्कालीन इतर कोणत्याही पेशवे घराण्यातील कर्त्यां स्त्रीने लिहिलेल्या पत्रांपेक्षा जास्त आहे. बाईंचा हा पत्रव्यवहार म्हणजे तपशीलवार इतिहासच होय. नानासाहेबांच्या हयातीत गोपिकाबाईंनी राजकारणात विशेष लक्ष घातले नाही; मात्र त्यांच्या हालचाली पडद्यामागून चालल्या होत्या आणि भाऊ साहेबांविषयीचा मत्सर त्यातून स्पष्टपणे दृग्गोचर होत असे. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर मात्र त्या मुलाच्या म्हणजे थोरले माधवराव, यांच्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना आपल्या महत्त्वाकांक्षी लालसेला काही वाव मिळेल असे वाटले; परंतु एकूण तात्कालीन राजकारणाने वेगळीच दिशा घेतली आणि माधवरावांच्या तेजस्वी नेतृत्वापुढे आणि स्वतंत्र वृत्तीमुळे त्यांची डाळ फारशी शिजली नाही; तथापि त्यांचा करारीपणा आणि प्रसंगोपात माधवरावास सल्ला देण्याचे काम चालू होते. निजामाने पुण्यावर स्वारी करण्याचा मानस व्यक्त केला आणि कारभाऱ्यास पत्र लिहिले की, ‘‘आम्हास खंडणी दिली तर पुणे राखू, नाहीतर जाळून टाकू’’ यावर गोपिकाबाईंनी त्यास सणसणीत उत्तर धाडले की ‘‘तुमचे वैरी तिकडेच गेले आहेत. त्याकडे काय असेल ते पाहून घेणे. आम्हास खंडणी देण्यास गाठ पडत नाही. पुण्याचे काय करणार ते सुखरूप करणे.’’ या सुमारास पेशवे निजामावर चालून गेले होते आणि राक्षसभुवनच्या लढाईत (१० ऑगस्ट १७६३) त्याचा सपशेल पराभव झाला. माधवराव प्रारंभी आईचा सल्ला शिरसावंद्य मानीत; पण गोपिकाबाई गंगापुरास विरक्त जीवन व्यतीत करतानाही त्यांची राजकारणाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. गोपिकाबाईंचे बंधू मल्हारराव रास्ते, गोपाळराव पटवर्धन, त्रिंबकराव पेठे वगैरे सरदार मंडळी माधवरावांनी घालून दिलेला शिरस्ता व नियम पाळीत नसत. मल्हाररावांनी तर राघोबांचा पक्ष घेऊन जानोजी भोसल्यास पेशव्यांविरुद्ध फितविले. तसेच रास्तेमामा हे सरंजामाप्रमाणे पदरी फौज ठेवीनात. तेव्हा माधवरावांनी त्यांचा सरंजाम जप्त केला व त्यास भर दरबारात शासन केले. गोपिकाबाईंना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी माधवरावांना पत्र लिहिले, ‘‘पाहिजे तर त्यांचा सरंजाम जप्त करावा, पण त्यांचा पाणउतारा करू नये. जाहीर शासन करू नये. आपली मांडी आपणच उघडी करून दाखवू नये.’’
गोपिकाबाईंच्या कानावर मुली विकून लोक पैसे जमवितात, ही वार्ता आली, तेव्हा त्यांनी नाना फडणविसांना पत्र पाठवून कळविले की, ‘‘समुद्रतीरी व देशामध्ये कितीका स्थळी कन्येचा विक्रये करून द्रव्य घेत आहेत. याप्रमाणे अनाचार प्रवृत्त झाला आहे. यांस श्रीमंतांसारखे ब्राह्मण प्रभू असता व तुम्हासारखे ज्ञाने सन्मार्गवर्ती, विवेकी मंत्री असता, हा मार्ग अनुचित, योग्य नव्हे. त्यास या अर्थी श्रीमंतास विनंती करून याचा बंदोबस्त करावा’’ असेच एक वर्षी नाशिकच्या भागात पाऊस कमी पडल्याने भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा गोपिकाबाईंनी तेथील शेतकऱ्यांची जकात माफ करावी, म्हणून माधवरावांना पत्र धाडले. त्याचे उत्तर माधवरावांनी तात्काळ पाठविले, ते मार्मिक व कार्यक्षम शासनकर्त्यांच्या गुणांचे दिग्दर्शन करणारे असेच आहे.
गोपिकाबाईंचे माधवरावांवर अपरंपार प्रेम होते आणि माधवरावांचेही आईवर तेवढेच प्रेम होते, तथापि आईचा सल्ला राज्य कारभारात अडचणीचा वाटल्यास तो नम्रपणे बाजूला सारीत. गोपिकाबाईंना माधवरावांची प्रकृती बरी नसल्याची वार्ता इ.स. १७६९च्या पावसाळय़ात कळाली. तेव्हा त्यांना बरे वाटावे म्हणून त्यांनी नाना फडणविसांना पुढील पत्र लिहिले. ‘‘ब्राह्मण लावले ते अनुष्ठान संपेपर्यंत वाडय़ातच राहू द्यावेत. त्यांनी यजमानास आरोग्य होण्याविषयी प्रार्थना करीत जावी. आठ-पंधरा दिवस जास्त लागले तरी हरकत नाही. कमी पडू न द्यावे. उत्तम परीक्षेने ब्राह्मण लावावे.’’ गोपिकाबाई अत्यंत कर्तव्यदक्ष होत्या. सवाई माधवरावांचे त्यांना एकदा पत्र आले होते की, ‘मी लहान, कसे वागावे ते लिहून पाठवावे’ तेव्हा त्याला उत्तर म्हणून गोपिकाबाईंनी एक तेराकलमी प्रदीर्घ पत्र धाडले. त्या पत्रात त्या लिहितात-
‘‘दिवसातील एकूण घटिका ४१ कलमे १३, उपदेश, दिनचर्या, अभ्यास व वर्तणूक याबाबतीतील कलमबंदी पाठविली आहे’’ ‘‘श्रीयासह चिरंजीव राजश्री सवाई माधवराव प्रधान यांसा प्रती गोपिकाबाई मुक्काम नाशिक आशीर्वाद उपरी. तुम्ही पत्र पाठविले ते पावले, ‘मी लहान वडिली सर्वत्याग करून श्रीक्षेत्री वास केला आहे. त्यास सर्व माहीत, यास्तव कोणे रीतीने चालावे, हे सर्व ल्याहावयास आज्ञा व्हावी, म्हणोन लिहिले,’ त्यास सूर्यग्रहण, संधी अन्वये कृष्णपक्ष होऊन लोप जाहला होता, ती हल्ली पुण्योदये करून दुष्टांचा संहार व सुष्टांचे पालग्रहणार्थ तुम्ही या कुळात जन्म घेऊन पुरंदर येथे उदयास आला, त्या पक्षी इकडून लिहावयाचे कारण दिसत नाही. परंतु मानवी देह आणि तुम्ही लिहिले, त्यापेक्षा तूर्त चालावयाचे, जे सुचले ते लिहिले आहे. तपशील कलमबंदी’’
या कलमबंदीतील तपशील पाहता गोपिकाबाईंचे हे सविस्तर पत्र पेशवाईतील पेशव्याचे दैनंदिन जीवन कसे होते, याचा पत्ररूप दाखला आहे. पत्रलेखनाचा हा तत्कालीन एक उत्कृष्ट नमुनाही म्हणता येईल. या पत्रात आदर्श राजपुत्राचे जीवन कसे आसावे, त्याने कसे आचरण ठेवावे, कसे बोलावे, कुणाशी बोलावे इत्यादीविषयींचा सुरेख उपदेश आहे. ते संपूर्ण पत्र म्हणजे एक आज्ञापत्रच होय.
सासवा-सुनांचे सख्य ही एक सामान्यत: दुर्मीळ गोष्ट होय. गोपिकाबाईने आपल्या सुनेविषयी केलेली ही नाजूक पत्ररूप तक्रार पाहा- ‘‘तुम्हांकडून कागद सर्वदा येत असतात; परंतु तुमचे खासपत्र सुखसंतोषाचे येत नाही, यावरून अपूर्व भासते, तरी सर्वदा पत्र पाठवून कुशलार्थ लिहून संतोषवित जावे’ वरकड चिरंजीव दादा याचे जेवणास फराळास जपत जावे.’ ‘‘आपणास पत्रे लिहावयास अवकाश होत नाही. तस्मात येथे आम्हांजवळ होता तेव्हा आपली माया मुलांलेकरांवर वाटली गेली होती. आता तेथे दादावरच माया राहिली. इकडील विसरलासें दिसते. परंतु ऐसें नसावे, येकायेकीच मित्रपणास अंतर न पडावें,’’असे गोपिकाबाई आपल्या आनंदीबाई या जावेस पत्रांतर नाही म्हणून लिहितात.
मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई ही बाणेदारपणा, धार्मिकवृत्ती व परोपकार या गुणांविषयी इतिहासात अमर झाली आहे. हत्यारबंद सैनिक नर्मदा पार करून दक्षिणेकडे सरकारचे दस्तकाखेरीज आपल्या मुलुखात येऊ नयेत, यासंबंधीच्या स्पष्ट आज्ञा तिने आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नाना फडणविसाच्या वकिलाला तिने दिलेल्या उत्तरावरून तिचा बाणेदारपणा दिसून येतो. आहिल्याबाईच्या तोंडचे शब्द नानाच्या वकिलाने टिपून कळविले आहेत. ‘‘तुमचे मानस असेल की बाईस चहूकडून उपद्रव जाल्याने सारेच बंदोबस्त आपण केल्यावर बाईनीं काय करावयाचें आहे? परंतु तुम्हांसही कळलें असू द्या, मी सुभेदाराची सून आहे. केवळ तुकोजीबाबाच दौलतीचे धनी आणि मी कशांत काहीं नाही असे समजू नका.. आज काल पाटीलबाबांचा दम तुकोजीबुवा फार राखतात आणि पाटील बाबांच्याही चित्तांत फार फंद असेल तर उभयतांही फौजसुद्धा मजवर चालून यावे. सुभेदारांचे पुण्यप्रतापे येथेही कोणी बांगडय़ा लेऊन बसले नाही, श्री मरतड समर्थ आहे.’’
पहिल्या होळकर- इंग्रज युद्धात होळकरांच्या सैन्याचा खर्च वाजवीपेक्षा जास्त झाला; तरीसुद्धा अहिल्याबाईंनी कळविले, ‘‘लढाईचे काम पडले आहे. कामकाजात कमी पडू नये. खर्चाची तरतूद केली आहे.’’ त्याच सुमारास बडोद्याहून इंग्रज सुरतेकडे आले. तेव्हा बाईनी पुण्यास कळविले, ‘‘बळकट फौजेची गरज आहे श्रीमंत फौजेची उपेक्षा करतात, श्रीमंतांनी शिलेदारांचा बहुजुरातीचा पुष्कळ भरणा करून जागोजागी फौजा पाठवून जेथल्या तिथे दहशत पडेल असे करावे. भिल्लांस व गुलजरखानास अभय पत्रे दिली, तर ते वाटा बंद करतील’’ आहिल्याबाईंना इंग्रज वसई घेण्याचा विचार करीत आहेत, असे समजताच त्या लिहितात, ‘‘सरकारी फौज व फ्रान्सीसी मुंबईस लावावे. फौज व आंग्रे याना वसईची पुस्त पन्हाई करावी. या तरतुदी श्रीमंतानी केल्याच असतील’’ मुंबई व सुरत येथील इंग्रजास एकत्र येऊ देऊ नये, ही त्यांची मुत्सद्देगिरी दिसते. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या न्यायाने फ्रेंचांना हाताशी धरण्याचा मार्ग त्यांनी सुचविला होता.
वरील काही प्रमुख स्त्रियांखेरीज इतर अनेक स्त्रियांची पत्रे उपलब्ध आहेत; पण त्या सर्वाचा किंबहुना आणखी काहींचा परामर्श घेणे अतिव्याप्त होईल. तथापि छत्रपती रामराजांना सांभाळणारी एक सामान्य स्त्री-दर्याबाई निंबाळकर हिच्या पत्राचा उल्लेख तत्कालीन राजकारणात त्याही कशा सामील असत, याचे उत्तम उदाहरण होय. दर्याबाई निंबाळकरने १७५० मध्ये नानासाहेब पेशव्यांना लिहिलेले हे पत्र असून या मराठमोळा बाई आपल्या भावना कशा व्यक्त करतात याची कल्पना येईल, ‘‘पत्री आज्ञा निरोपिली की, तुमचे आमचे इमान उजवल, इतकिया उपरी आम्हांवर शब्द न ठेवणें. त्यास आम्ही कायवाचा मन तुमचे पक्षीचे म्हणवितो.. आमचें नाव तुफान तेथील कारभारी आपणास लिहिताती’’