माझा मराठाचि बोलु

 

माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके

ऐसीं अक्षरें रसिकें | मेळवीन ||1||

 

जिये कोंवळिकेचेनि पाडें | दिसती नादींचे रंग थोडे |

वेधें परिमळाचें बीक मोडे | जयाचेनि ||2||

 

ऐका रसाळपणाचिया लोभा | कीं श्रवणींचि होती जिभा |

बोलें इंद्रियां लागे कळंभा | एकमेकां ||3||

 

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा | परि रसना म्हणेरसु हा आमुचा |

घ्राणासि भावो जाय परिमळाचा | हा तोचि होईल ||4||

 

नवल बोलतीये रेखेची वाहणी | देखतां डोळयांही पुरों लागे धणी |

ते म्हणती उघडली खाणी | रुपाची हे ||5||

 

जेथ संपूर्ण पद उभारे | तेथ मनचि धांवे बाहिरें |

बोलुं भुजांहीं आविष्करे | आलिंगावया ||6||

 

ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं | झोंबती परि तो सरिसेपणेंचि

बुझावी | जैसा एकला जग चेववी | सहस्त्रकरु ||7||

 

तैसें शब्दाचें व्यापकपण | देखिजे असाधारण |

पाहातयां भावज्ञां फावती गुण | चिंतामणीचे ||8||

 

हें असो तया बोलांची ताटें भलीं | वरी कैवल्यरसें वोगरिलीं |

ही प्रतिपत्ति मियां केली | निष्कामासी ||9||

 

ज्ञानेश्वर

 

 

मराठी

माझी बोली असे मराठी                   माझी बोली असे मराठी

जी शिवबाच्या फुलली ओठीं              झुंज झुंजली सत्यासाठी

ज्ञानेशाला त्या तुकयाला                   परचक्राच्या घोर संकटी

नाचविले नित भक्तीसाठी – 1            अन्यायाची फोडून छाती – 2

 

माझी बोली असे मराठी                    माझी बोली असे मराठी

जिने सोसले प्रहार पाठीं                    जिने शिकविला स्वाभिमानही

पचवुन हलाहल; अमृत ओठीं              ज्या बोलीस्तव रणांत मेले

तीच असे मम माय मराठी – 3           शूर-वीर ते लाखो गणती – 4

 

माझी बोली असे मराठी                   माझी बोली असे मराठी

उभी राहिली संतांपाठी                   जीस्तव झिजले कविवर शाहिर

शूरांची, नरवीरांची जी                     भाष्यकार ते निबंधकार

फुलवित, उजळित छाती छाती – 5            नाटककर्ते किती मातब्बर – 6

 

माझी बोली असे मराठी                 असोत बोली कितीक सुंदर

प्राणाहुन ती प्रियतम मजला            परि श्रेष्ठचि मज माय मराठी

महाराष्ट्राची पवित्र भूमी                अभंग उज्वल ही मम बोली

करिते मंगल वेळोवेळी – 7             देह जळो हा तिचियासाठी – 8

 

मा.रा.पोतदार

 

 

आमुची लिपी

 

लिपी आमुची नागरी                      नसे उच्चारांची व्याधी

स्पष्ट उच्चारांचे वर्ण                         नसे लेखनात अढी

महाराष्ट्रीयां लाभली                      जात धोपट मार्गाने

वाणी तैसी ही संपूर्ण ||1||               स्वर-व्यंजनांची जोडी ||2||

 

अहो, हिची जोडाक्षरे                    जैसे लिहू तैसे वाचू

तोड नाही त्यांना कुठे                   जैसे बोलू तैशा खुणा

उच्चारातली प्रचीती                      जे जे लेखी तेच मुखी

जशी ओठांवरी उठे ! ||3||             ऐसा मराठीचा बाणा ||4||

 

सर्व उच्चारांचे शोधा                     नाद-ध्वनी उच्चारांना

शास्त्रज्ञांनो, यंत्र एक                    देत सदा आवाहन

तेच दिसेल तुम्हाला                    लिपी ऐसी ही प्रभावी

महाराष्ट्रीयांचे मुख ! ||5||            माझ्या भाषेचे वाहन ||6||

 

 सोपानदेव चौधरी

 

 

माझी मराठी

माझ्या मराठीची गोडी          ज्ञानोबांची-तुक्यांची

मला वाटते अवीट                मुक्तेशाची-जनाईची

माझ्या मराठीचा छंद            माझी मराठी चोखडी

मना नित्य मोहवीत !– 1       रामदास-शिवाजीची –- 2

 

‘ या रे या रे अवघेजण ‘          डफ-तुण्तुणें घेऊन

हाक माय मराठीची               उभी शाहीर मंडळी

बंध खळाळा गळाले               मुजऱ्याची मानकरी

साक्ष भीमेच्या पाण्याची !– 3  वीरांची ही मायबोली — 4

 

नांगराचा चाले फाळ              नव्या प्राणाची ‘तुतारी’

अभंगाच्या तालावर               कुणी ऐकवी उठून

कोवळीक विसावली              ‘मधुघट’ अर्पी कुणी

पहाटेच्या जात्यावर ! — 5       कुणी ‘माला’ दे बांधुन ! – 6

 

लेक लाडका एखादा               हिचें स्वरुप देखणें

गळां घाली ‘वैजयंती’             हिची चाल तडफेची

मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा           हिच्या नेत्रीं प्रभा दाटे —

कुणी नजराणा देती – 7          सात्विकाची-कांचनाची ! – 8

 

कृष्णा-गोदा-सिंधुजळ            माझ्या मराठीची थोरी

हिची वाढविती कांती           नित्य नवें रुप दावी

आचार्यांचे आशीर्वाद            अवनत होई माथा

हिच्या मुखीं वेद होती – 9    मुखीं उमटते ओवी ! — 10

 

वि.म.कुळकर्णी

 

 

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी

 

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !

नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी !

तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला

अगे भक्तिसोपान सोपा भला

दुजा वेद तूं ! धन्य तूं वैखरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 1

 

 

प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें

मराठी स्वराज्या असे स्थापिलें

अशी धन्य तूं वीरधात्री खरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 2

 

तुझी माधुरी मोदमात्रावहा

फुलांनी, मुलांनी खुले गे अहा !

कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 3

 

तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा

नमो कृष्ण-रामा नमो भास्करा

तुझे लाडके हे धरावे शिरीं

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 4

 

रा.अ.काळेले

 

 

मराठी

जशी मायभूमी तशी मातृभाषा असे वंद्य आम्हांस त्रैलोकिंही

नव्या भारताचा नकाशा पहा तो असे आद्यभूमी महाराष्ट्र ही !

अहा ! ही मराठी किती रम्य मंजूळ वाणी असे प्राण गे जीवनीं

जिने घेतला वारसा ज्ञानदेवे मुखांतून गीर्वाण भाषेंतुनी !!

 

अये आज आम्ही तुला भूषवाया पुढें ठाकलो एक होऊनिया

अता ना कुणाची अम्हां रोधण्याला पहा छाति होईल येऊनिया |

अम्हाला हवी राजभाषा तशी राजभूमी अखंडीत या हिंदवी

जिची गर्जना ऐकुनी ज्ञानराजा-तुकाबादि येतील पुन्हां महीं !!

 

मयूरासनी मान होता तुझा गे, परी विश्वविद्यालयीं ये अता

तुझें भाग्य तें लोकशाहीं उदेलें, किती उच्च स्वातंत्र्य लाभे मतां !

मराठीचिया मंदिराला झराळे नवद्वार दाही दिशेला पहा –

नवें ती अलंकार-वृत्तादि-जाती, कला-शास्त्र येईल घेऊनिया !!

 

मराठी, मराठी ! मराठाच बाणा ! महाराष्ट्र पुत्रास शोभा जनी !

महाराष्ट्र पुत्रां ! मराठी गिरा ही सदा वाहु द्या सह्यशैलाहुनी !!

 

तु.ना.काटकर

 

 

मराठी अभिमान गीत

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

 

आमुच्या मनामनात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी

 

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रंगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी

 

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

 

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी

 

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

 

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्याच घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

 

दंगते मराठी, रंगते मराठी

स्पंदते मराठी, गर्जते मराठी

गुंजते मराठी ,गर्जते मराठी

सुरेश भट

 

 

परिमळांमाजी कस्तुरी…

 

जैसे हरळांमाजी रत्नकिळा ।

कि रत्नांमाजि हिरा निळा ।

तैसी भाषांमाजी चोखळा ।

भाषा मराठी ।।

 

जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी ।

किं परिमळांमाजि कस्तुरि ।

तैसी भाषांमाजि साजिरी ।

भाषा मराठी ।।

 

पखियांमध्ये मयोरु ।

ब्रुखियांमध्ये कल्पतरु ।

भाषांमध्ये मानु थोरु ।

मराठियेसी ।।

 

तारांमध्ये बारा रासी ।

सप्तवारांमध्ये रवि-शशि ।

या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी ।

बोली मराठीया ।।

फादर स्टिफन्स

 

खरा स्वधर्म हा आपुला

जरी का कठीणु जाहला

तरी हाची अनुष्ठीला, भला देखे

 

स्वराज्य तोरण चढे

गर्जती तोफांचे चौघडे

मराठी पाउल पडते पुढे !

 

माय भवानी प्रसन्न झाली

सोनपावली घरास आली

आजच दसरा, आज दिवाळी

चला, सयांनो, अंगणि घालू

कुंकुमकेशर सडे

मराठी पाउल पडते पुढे !

 

बच्चे आम्ही वीर उद्याचे

बाळमुठीला बळ वज्राचे

वारस होऊ अभिमन्यूचे

दूध आईचे तेज प्रवाही

नसांतुनी सळसळे

मराठी पाउल पडते पुढे !

 

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे

पिटावे रिपूला रणी वा मरावे

तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई

तदा संकटी देव धावून येई !

जय जय रघुवीर समर्थ

 

शुभघडीला शुभमुहूर्ती

सनई सांगे शकुनवंती

जय भवानी, जय भवानी

दश दिशांना घुमत वाणी

 

जयजयकारे दुमदुमवू हे

सह्याद्रीचे कडे !!

 

– शांता शेळके

 

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान

कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान

 

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान

तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण

तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण

तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान

 

मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण

मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान

पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान

ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

 

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !

काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान

मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान

पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान

 

गीत – चकोर आजगावकर

 

 

 

“सलाम कवि कुसुमाग्रजाना!!”

 

म्यानातुनि उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले

सरदार सहा सरसावुनि उठले शेले

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना

छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,

समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

गीत – कुसुमाग्रज

 

 

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्या एक तो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

 

आमुच्या मनामानात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी

 

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी

 

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

 

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी

 

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

 

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

 

~सुरेश भट

(कवी)

 

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |

शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||

शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |

शब्द वाटे धन जनलोका ||

तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |

शब्देचि गौरव पूजा करु ||

 

संत तुकाराम

—————————————————————————————————————————-

 

 

भारत अमुचा देश

 

भारत अमुचा देश, भारत अमुचा देव

 

‘भारत अमुचा सत्यधर्म’ हा मंत्र जपू हा एक

 

भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक

 

आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, माळी हिंदी

 

प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठाचि सर्वांमधी

 

दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ

 

धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू

 

उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू

 

विशाल भारत स्वपूनीपनी त्याचा साकारु आलेख

 

प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, जुजु या मानवतेला

 

मित्र जगाचे सारया होऊ, मित्र करु या त्याला सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेश

 

विनायक रहातेकर

 

 

भारती सृष्टीचे सौंदर्य

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे

 

दावीत सतत रुप आगळे

 

वसंत वनांत जनांत हासे

 

सृष्टीदेवी जाणू नाचे उल्हासे

 

गातात संगीत पृथ्वीचे भाट

 

चैऋ-वैशाखाचा ऐसा हा थाट

 

ज्येष्ठ-आषाढात मेघांची दाटी

 

कडाडे चपला होतसे वृष्टी

 

घालाया सृष्टीला गंगल स्नान

 

पूर अमृताचा सांडे वरुन

 

गगनी नर्तन कृष्ण मेघांचे

 

भूतली मयूर उत्तान नाचे

 

श्रावणी पाऊस हास्याचा पडे

 

श्रीकृष्ण-जन्मताची दंग उडे

 

बांधिती वृक्षांना रम्य हिदोंळे

 

कामिनी धरणी वैभवी लोळे

 

सृष्टीदेवी

 

शांताराम आठवले

 

उभवू उंच निशाण

 

उभवू उंच निशाण !

 

नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

 

दीन दीन जे, दलित दलित जे

 

त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान

 

उभवू उंच निशाण !

 

अंध अमानुषा रुढी घालिती अखंड जगी थैमान

 

त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान

 

ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान

 

शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

 

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान

 

पुसुनी आसवें मानवतेची होती बुध्द महान

 

हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान

 

हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण

 

वि.स.खांडेकर

 

 

तिरंगी आमचा भारतीय झेंडा

 

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू

 

प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ||

 

कित्येक लढले याच्यासाठी

 

कितीकानी दिधले प्राण

 

यांच्याचसाठी कितीकांनी

 

फासात घातली मान

 

देवासमान हा आम्हास

 

त्याचा मान आम्ही राखू ||1||

 

क्रांतीकारी अन समाजसेवक

 

हाती घेवून जातसे चालत

 

शत्रूच्याही उरात बसती

 

उंच पाहून याला धडकी

 

न राहू मागे आपण

 

चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||2||

 

युध्द जरी हो आज नसले

 

भय देशावरी रोजच कसले

 

दहशत घालती दहशतवादी

 

फुकाची करती वादावादी

 

झाला तिरंगा निमीत्त केवळ

 

वाद सारे आता बाजू सारुन देवू ||3||

 

 

पाषाणभेद