एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्कदा चालणार्या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.

पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.

.

तात्पर्य :मुलांनो, एकीत खूप मोठे बळ असते!