गणपतीचा पाळणा
जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्वर सुखवदना ।
निद्रा करि बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥धृ॥
गंडस्थळ शुन्डा ते सरळी । सिदुंर चर्चुनि भाळी ।
कानी कुंडले ध्वजजाळी । कौस्तुभ तेज झळाळी ॥१॥
पालख लावियला कैलासी । दाक्षयणिचे कुशी ।
पुत्र जन्मला हॄषकेशी । गौरिहाराचे वंशी ॥२॥
चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ।
दुरिते निरसिली अपार । विष्णूचा अवतार ॥३॥
लंबोदर म्हणता दे स्फुर्ति । अद्भुत ज्याची किर्ती ।
जीवनसुत अर्ची गुणमुर्ती । सकळिक वांछा पुरती ॥४॥
जो जो जो जो रे गजवदना । पतीतपावना ।
निद्रा करि बाळा गजवदना । मुत्युंजय नदंना ॥धृ॥
पाळणा बांधियला जाडिताचा । पालख या सोन्याचा ।
चांदवा लाविला मोत्यांचा । बाळ निजवी साचा ॥१॥
दोर धरुनिया पार्वती । सखियांसह गीत गाती ।
नानापरी गुण वर्णाती । सुस्वर आळवीती ॥२॥
निद्रा लागली सुमुखाला । सिंदुर दैत्य आला ।
त्याते चरणाने ताडिला । दैत्य तो मारिला ॥३॥
बालक तान्हे हे बहुकारी । दैत्य वधिले भारी ।
करिती आश्चर्य नरनारी । पार्वती कोण उतरी ॥४॥
ऎसा पाळणा गाईला । नानापरी आळविला ।
चिंतामणि दास विनविला । गणनाथ निजविला ॥५॥
—
विष्णूचा पाळणा
जो जो जो जो रे व्यापका । सृष्टीच्या पालका ।
निज निज निज बा तू बालका । तान्हुल्या सात्विका ॥धृ॥
धावसि दासाच्या संकटाला । म्हणवुनि श्रमली काया ।
श्रम सांडुनिया निज ध्येया । हलविते पाळणिया ॥१॥
शीते व्यापिले तुज भारी । निजता सागर जठरी ।
आला काळीमा शरीरी । फणिवर धुधु:कारी ॥२॥
अद्भुत तव महिमा श्रुतिनिगमा । न कळे तुझी सीमा ।
तो तू स्त्रीकामा घनश्यामा । अंतरी धरुनी कामा ॥३॥
तुजला कैसी बा लाज नसे । कैसे झाले पिसे ।
त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसे । येत असे रे हासे ॥ जो जो ॥४॥
परशुरामाचा पाळणा
जो जो जो जो रे सुखधामा । भक्तपूर्ण कामा ॥धृ॥
क्षत्रिय संहारी रणांगणी । उग्र स्वभाव करणी ।
भारी श्रमलासी खेळणी । उद्धरिता हे धरणी ।
धेनुद्विजांचे पाळणा । करिता अवतारणा ।
तुजला निजवीता पाळता । दीनावरि करी करुणा ॥१॥
देव अवतरले हृषीकेशी । भृगु ऋषीच्या वंशी ।
संगे घेऊनिया विधि हरिसी । रेणुकेचे कुशी ।
सागर सारुनिया वसविले । कोकण जन पाळिले ।
दुष्टा चरणाते दवडिले । यश हे प्रसिद्ध केले ॥२॥
स्वस्थानी जावे भार्गवा । अखंडित चिरंजीवा ।
योगमाया ते करि सेवा । परशुराम देवा ।
हालवी रेणुका पाळणा । गाई त्या सगुणा ।
सखया रामाच्या आभरणा । चुकवी जन्ममरणा ॥३॥
—
रामाचा पाळणा
बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥
पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥
रन्तजडित पालख । झळके अलौकिक ।
वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥
हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥
विश्वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया ।
तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥
येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।
राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥
याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥
पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।
रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥
सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा ।
त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥
समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।
देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥
राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।
दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥
कृष्णाचा पाळणा
बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥
जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।
पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥
बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।
जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥
मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।
शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥
रत्नजडित पालख । झळके आमोलिक ।
वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥
हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥
विश्वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।
तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥
गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥
विश्वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।
प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥
विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।
शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥
उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।
यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥
गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।
दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥
इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।
गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥
कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।
खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥
ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।
पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥
—
शिवाजीचा पाळणा
तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।
मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥
झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।
बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥
तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।
पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।
नीज रे नीज लडिवाळा ॥१॥
चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।
झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥
नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥
बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥
कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।
आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।
नीज रे नीज लडिवाळा ॥२॥
—
पांडुरंगाचा पाळणा
पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदं
गाचा गजर केला ॥
चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥
दुसर्या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥
तिसर्या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।
आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥
चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।
चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥
पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।
संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥
सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।
संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥
सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।
विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥
आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।
वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥
नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।
युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥
दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।
महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥
अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।
रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥
बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥
नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥