पारोळ्याचा भुईकोट

जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा तालुका आहे. पारोळा हे गाव तेथील भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पारोळा हे तालुक्याचे ठिकाण जळगाव, धुळे, मालेगाव, अमळनेर, एरंडोल, भडगाव आदी गावांशी गाडीमार्गाने जोडले गेलेले आहे.

 
पारोळ्यामधील भुईकोट किल्ला उत्तम बांधणीचा आहे. जळगाव जिल्ह्यात एवढ्या चांगल्या बांधणीचा दुसरा भुईकोट किल्ला नाही. पारोळा किल्ला साधारण १६० मी. लांबीला असून रुंदीला १३० मी. एवढा आहे. याची तटबंदी खणखणीत बांधणीची असून भोवताली रुंद असा खंदक आहे. खंदकामधे पाणी भरल्यावर किल्ल्याचे दुर्गमत्व अजोड आहे.
 
पारोळ्याच्या बाजारपेठेमधूनच किल्ल्यामधे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर खंदकावर पूल असून पुढे दरवाजा आहे. किल्ल्यामधे दगडी बांधकामाचा मजबुत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात. आत मधे काही विहीरी आहेत. तसेच जहागीरदाराचा महाल आहे. येथिल एका भव्य बुरुजाच्या आतला भाग एका झाडामुळे ढासळून गेला असून त्याभोवती बुरुजाच्या बाहेरील भाग शिल्लक राहीला आहे.
 
किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी केलेली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून ८ कि. मी दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगतात. या भुयारातून घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे ते भुयार असल्याची समजूत आहे.
 
बाहेरच्या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या (छिद्रे) केलेल्या आहेत. तटबंदीवरुन बाहेरील खंदक पहाता येतो. खंदक काही ठिकाणी जास्त रुंद आहे. त्यात पाणीही भरलेले असते. किल्ल्याभोवतालीच गावाची वस्ती आहे. या वस्तीच्या रेट्यामुळे किल्ल्याचे देखणेपण नाहीसे झाले आहे. गावची बाजारपेठ ही किल्ल्याला लागून आहे. दरवाजा जवळील खंदकामधे काही टन प्लॅस्टीकचा कचरा तरंगताना दिसतो.
 
हा देखणा भुईकोट किल्ला झाशीच्या राणीने बांधला अशी अनेक स्थानिकांची समजूत आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव तांबे होते. ते पारोळ्याचे असून तांबे यांचे वंशज अजून पारोळ्यात वस्ती करुन असल्याचे सांगतात.
 
पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ. स. १७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे.