समाजाच्या दातृत्वावर विश्वास ठेवून रोजची रात्र काढायची. ती संतोष गर्जेची आता सवय झाली आहे. ४२ अनाथ मुलांच्या आयुष्यातील पोरकेपण त्यांना जाणवू द्यायचेच नाही, हा त्यांचा ध्यास. तब्बल १२ वर्षांपासून संतोष हेच काम करतात.
बीड जिल्ह्य़ात गेवराईत, शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर ते सहारा अनाथालय चालवितात. तेथील प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना हसू आणायचे असते. त्यांच्या आनंदासाठी, पोरकेपणाची सावली त्या मुलांवर पडू नये, हा त्यांच्या जगण्याचा ध्यास आहे. त्यांना मदत करणारे हात दिवसागणिक वाढताहेत, पण भ्रांत काही संपत नाही. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय महिन्याला दीड लाख रुपये उभे करताना होणारी दमछाक काही थांबत नाही. वेश्या वस्तीतील काही अनाथ मुले, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरकी झालेली मुले आणि वेगवेगळ्या कारणाने आई-वडील नसणाऱ्या मुलांचा समावेश त्यांच्या अनाथालयात आहे. दररोजच्या अडचणींवर मात करत नव्या संकल्पासह संतोष रोज बाहेर पडतात तेव्हा मदतीसाठी रोज अनेकांना भेटतात. हे सगळे का करतात, कारण स्वत:च्या आयुष्यात आलेले पोरकेपण दुसऱ्याला जाणवू नये यासाठीच.
किमान १०० मुलांच्या आयुष्याला सहारा द्यायचा, असा त्यांचा नवा संकल्प आहे. त्यासाठी आवश्यक असणारे मुलींचे वसतिगृह सुरू करणे ही त्यांची नवी गरज आहे. या उपक्रमांसाठी संस्थेला आर्थिक आधाराची गरज आहे.